चैतन्य अहिंसा सत्य दयेचे,
तूच मूर्त रूप हो !
- आनंद गायकवाड
भारतीय संस्कृतीत विविध तत्त्वज्ञान पाहायला मिळतात. कधीकाळी श्रमण आणि ब्राह्मण परंपरा सामंजस्याने सोबत चालताना तर कधी एकमेकांशी भिडताना दिसतात. ब्राह्मणी अध्यात्मातील ईश्वरवाद व नास्तिक मतानुकूल निरीश्वरवाद असे दोन प्रवाह भारतीय भूमीत रूजलेले दिसून पडतात. साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः काव्य व गीतांच्या बाबतीत मात्र ईश्वरवादी लेखन अत्याधिक झालेले आहे. फिल्मी व गैर फिल्मी गीतांचा विचार केला तर ईश्र्वराच्या नानाविध रूपांना साकडे घातलेले दिसेल. ईश्वर, प्रभू, मालिक, दाता, भगवान, देव, अल्ला, खुदा ,रब यांना काही मागण्यासाठी केलेली याचना गीतांमध्ये आहे. केवळ बुद्धगीतेच तेवढी निरीश्वरवादी समूहात मोडतील.
बृहदारण्यकोपनिषद् मध्ये एक प्रार्थना आहे.
असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ।
अर्थात मला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल। मला अन्धाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल। मला मृत्यू कडून अमरत्वाकडे घेऊन चल॥.... " तू माझ्यासाठी हे कर " अशी याचना या मंत्रात आहे.
ही प्रार्थना अनेक गीतांची प्रेरणा व आधार आहे. भरत व्यास रचित " ऐ मालिक तेरे बन्दे हम, ऐसे हों हमारे करम नेकी पर चलें और बदी से टलें ताकि हंसते हुए निकले दम " हे गीत एकेकाळी फार लोकप्रिय होते. यात " जब जुल्मों का हो सामना तब तू ही हमें थामना वो बुराई करे हम भलाई भरें , नहीं बदले की हो कामना , बढ़ उठे प्यार का हर कदम और मिटे बैर का ये भरम ".... तब तू ही हमे थामना , असे साकडे ईश्वराला घातले आहे.
साहीर लुधियानवीचे हमदोनो मधील एक गाजलेले प्रार्थना गीत " अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान " यात 'भगवान व दाता' ला याचना केली आहे.
हिंदी कवींमध्ये मला गुलज़ार फार आवडतो, त्यांच्या काव्यात फार खोली असते. पुरोगामित्वाशी त्यांच्या कवितेची नाळ जुळलेली आहे. गुड्डी चित्रपटातील त्यांचे एक गीत " हम को मन की शक्ति देना मन विजय करें दूसरों की जय से पहले खुद को जय करें " शाळेच्या पार्श्र्वभूमीवर हे प्रार्थना गीत चित्रीत केले आहे. " इतनी शक्ती हमे देना दाता " अंकुश मधील अभिलाष यांच्या गीताची इथे आठवण येते. या गीतात कुण्यातरी अदृश्य शक्तीला साद घातलेली आहे.
" मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें "
मराठीतही ईश्र्वराला साकडे घालणाऱ्या अनेक कविता व फिल्मी - गैर फिल्मी गीते आहेत. वंदना विटनकरांचे " शोधिसी मानवा राउळी मंदिरी , नांदतो देव हा आपुल्या अंतरी" हे गीत अत्यंत लोकप्रिय झाले. ईश्र्वराचे अस्तित्व मान्य करूनही देवळात देव नसतो व पुजा अर्चना करून देव मिळत नाही, निसर्गाची विविध रूपे हेच ईश्वरीआहेत अशी काहीशी सुधारवादी झलक या गीतात पाहायला मिळते.
हिंदीत अत्यंत गाजलेले एक बुद्ध गीत आहे. भरत व्यास यांनी हे गीत अंगुलीमाल चित्रपटासाठी लिहीले होते. " घबराए जब मन अनमोल और हृदय हो डाँवाडोल तब मानव तू मुख से बोल बुद्धम सरणम गच्छामी."
केवळ नामोच्चार केल्याने दुःखमुक्ती होत नाही. या गीताच्या मुखड्यात नामाचे महात्म्य दिसत असले तरी या गीताचा सार बुद्ववचनांवरच बेतलेला आहे.
जिसकी एक किरण को छूकर चमक उठा ये जग सारा "
बुद्धाने आपल्या ज्ञानांमृताने दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला असे ध्वनित करून गीत सत्यकथन करते.
सुख शांति की छाया में, जन-गन-मन का प्रेम पले
भारत के भगवान बुद्ध का, गूंजे घर-घर मंत्र अमोल.
हे मानव नित मुख से बोल, बुद्धम सरणम गच्छामी."
बुद्धगीते हिंदी पेक्षा मराठी भाषेत अधिक आलीत.
एक अंगुलीमाल सोडला तर हिंदी चित्रपटांनी बुद्ध गितांकडे पाठच फिरविली. मराठी हलाहल मध्ये प्रभाकर रचित " वंदन करूया शांतीदूताला " हे गीत स्वरबद्ध करण्यात आले. मात्र गैर फिल्मी असंख्य बुद्ध गीते म्हटल्या गेलीत. वामनदादा कर्डक, उत्तम मुळे ते सुरेश भट, रंगराज लांजेवार यांच्यापर्यंत अनेक गीतकार, कवींनी बुद्धगीते लिहिली. यात स्तुतीपर वंदनगीतांचे प्रमाण जास्त आहे. बुद्धांनी तत्त्वज्ञानातून आचरणाची महती कथन केली आहे. बुद्ध तत्त्वज्ञान सांगणारे व " तमसो मा ज्योतिर्गमय " शी विपरीत मत मांडणारे बुद्धगीत ,
" अत्त दीप भव स्वयंदीप हो, दया धर्म शांतीच्या पथाचा पथिक तुझा तूच हो " मला फार आवडते. गीतांचे बोल व शब्दांचे अलंकरण आशयाच्या आकलनात कुठेच अडथळा निर्माण करीत नाही. अत्यंत कर्णमधूर हे गीत असून मनुष्याने स्वतःच संकटे, दुःखावर मात करण्यासाठी सिद्ध व्हावे यासाठी आवाहन करते. " चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो "........ केवळ ' तूच ' म्हणजे मनुष्य हा या गीताचा केंद्रबिंदू आहे. साजेसे संगीत, उत्तम चाल आणि धीरगंभीर आवाजामुळे हे गीत अत्यंत श्रवणीय झालेलं आहे. हे गीत ऐकल्यावर मनाचा कोपरा न कोपरा शांत होतो, रोमारोमात उर्जा प्रवाहित होते. शांताराम नांदगावकर यांनी हे गीत लिहिले व गायिलेही. शांतारामांनी अनेक मराठी फिल्मी गैर फिल्मी गीते लिहिली. भक्तीगीत असो कि भावगीत त्यांच्या रचना फार लोकप्रिय झाल्यात. मग ' बिलनशी नागीण निघाली ' ' अश्विनी ये ना ' ' चंदेरी वाळूत ' असे अनेक गीतं शांतारामांनी लिहिली. शांताराम कोण जातधर्माचे, त्यांनी काय लिहिले यांचेशी मला काही देणेघेणे नाही. पण " अत्त दीप भव स्वयंदीप हो " लिहून त्यांनी मला प्रभावित केले. याचा अर्थ बुद्धांची इतर गाणी दुय्यम आहेत असे नव्हे !
आज शांताराम नांदगावकर यांचा जन्मदिवस. ते आज हयात नसले तरी गीत रूपाने त्यांचा दीप तेवत आहे. त्यांचे खालील गीत इथे देऊन कवी या नात्याने त्यांना विनम्र अभिवादन करतो...
अत्त-दीप-भव
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
दया धर्म शांतीच्या पथाचा,
पथिक तुझा तूच हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो
कोसळोत वर्षा, उठू दे झंजावात
आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात
धावूदे दिशांना, करुनिया आकांत
पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
मानव्य जपाया, हो तू मानव आधी
तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी
बोधिसत्त्व फुलु दे, तुझिया ओठावरती
निथळू दे तयातून, सिद्धार्थाची नीती
तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग
हो हृदय तयांचे, सोड सुखाचा संग
जळताना दे तू, मंत्र जगा जळण्याचा
दु:खाच्या तिमिरा, सदैव संपविण्याचा
चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो
कोसळोत वर्षा, उठू दे झंजावात
आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात
धावूदे दिशांना, करुनिया आकांत
पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
मानव्य जपाया, हो तू मानव आधी
तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी
बोधिसत्त्व फुलु दे, तुझिया ओठावरती
निथळू दे तयातून, सिद्धार्थाची नीती
तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग
हो हृदय तयांचे, सोड सुखाचा संग
जळताना दे तू, मंत्र जगा जळण्याचा
दु:खाच्या तिमिरा, सदैव संपविण्याचा
चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
---शांताराम नांदगावकर
सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख, हिंदी आणि मराठी गीतांचा मेळ त्यातही बुद्ध गीतांबाबत आपला अभ्यास... अप्रतिम..
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवाअप्रतिम, खूप दिवसांनी यातील गीते आठवत गेले ,मस्तच
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा