कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!
क्रिकेट विषयी बरेच जण बोटं मोडताना दिसतात. मोजकेच देश हा खेळ खेळतात. मला क्रिकेट हा खेळ आवडतो, हे सांगायला काही लाज वाटण्याचे कारण नाही. अगदी विद्यार्थी दशेपासून मी क्रिकेट पाहिले.( खेळलो सुद्धा ). क्रिकेट मधील काही क्षण मला फार भावले. विश्वनाथ सारख्या कोवळ्या बुटक्या पोराने शतक ठोकल्या बरोबर त्याच्या पेक्षा दीडपट उंच असणाऱ्या टोनी ग्रेग ने त्याला कवट्यात धरून वर उचलले तो क्षण मला जागतिक सौहार्दाचा क्षण वाटला. दिवसभर वन डे खेळून फक्त ३६ धावा काढून नाबाद राहणाऱ्या सुनील गावसकरची चीडही आली. चंद्रा बेदी प्रसन्नाच्या फिरकीचे वादळ पाहिले. सैय्यद किरमानीचे लाजवाब यष्टिरक्षण. एकनाथ सोलकरचे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. डॉन ब्रॅडमनच्या शतकांशी सुनील गावसकरच्या शतकांची स्पर्धा. कपिलदेवचे मुंगूस बॅटने मारलेले आडवे फंटे आणि त्याच्याच कप्तानीमध्ये टीम इंडियाने जिंकलेला विश्वकप हा कळस होता. कपिलदेव क्रिकेट मधील माझा आवडता खेळाडू. विश्वचषकातील झिम्बाब्वे विरुद्ध ठोकलेल्या त्याच्या नाबाद १७५ धावा व अंतिम सामन्यातील व्हिव्हियन रिचर्ड्सचा अशक्यकोटीतील झेल आपल्या हातात विश्वचषक देऊन गेला. या विश्वविजयासाठी आम्ही बॅंड लावून मोहल्ल्यात फेरी मारली होती. नंतरच्या काळातील अब्दुल कादर सारख्या फिरकी पटुला मनमुराद ठोकणारा सचिन पाहिला. चेतन शर्माला अंतिम चेंडूवर सामना जिंकून देणारा जिद्दी जावेद मियांदाद, अझहरची लागोपाठ तीन शतके, विनोद कांबळीचा वादळी खेळ, सेहवागचे त्रिशतक, मायकल होल्डींग, अँडी रॉबर्ट्स, डेनिस लिलीची तुफानी गोलंदाजी, व्हिव्हियन रिचर्ड्स, ब्रायन लाराचा झंझावात, चेंडूवर लागलेला माईक गॅटिंगच्या नाकाच्या हाडाचा चिपोरा, रमण लांबाचा मैदानावरील मृत्यू......असे असंख्य क्षण स्मृतीत आहेत. फुटबॉल सुद्धा मला आवडतो. दिएगो मॅराडोना, नेयमार, मॅस्सी, रोनाल्डो, बॅकहॅम, जिनेदीन झिदान यांचा खेळ मी पाहिला. नेयमार माझा आवडता खेळाडू. मला लॉन टेनिसही आवडते, अगदी पुर्वी पासून. जॉन मॅकेन्रोची सर्विस तुफानच. जिमी कॉनर्स, बोरीस बेकर, एडबर्ग, फेडरर, नदाल, जोकोविच,मरे यांचे पदलालित्य व फटके म्हणजे मेजवानीच.बियान बोर्ग व बिली जीन किंगचे सामने पाहायला मिळाले नाहीत पण मार्टीना नवरातिलोवा विरुद्ध गॅब्रिएला सॅबाटिनी विरुद्ध सौंदर्यवती स्टेफी ग्राफ यांच्या सामन्यात चुरस असायची,ॲना कुर्निकोव्हा पाहिली. ग्रॅन्ड स्लॅम मध्ये पहिल्यांदा अपसेट घडवून आणून विंबल्डन जिंकणारे मायकेल चँग व अरांझा सांचेज अजूनही लक्षात आहे माझ्या. खेळ माणसाला जवळ आणतो. देशालाच नव्हे विश्वालाही मिठीत घेतो. बाळू पालवणकर या चांभार समाजातील कर्तबगार क्रिकेटपटूचा सत्कार खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. खेळात जात धर्म पाहिला जात नाही पण पालवणकर बंधूंच्या बाबतीत तो पाळल्या गेला. भारतीय खेळाडू जातीधर्माच्या प्रभावाखाली असायचे. अलिकडे हा प्रकार कमी झाला. पण क्रिकेट मध्ये लॉबिंग चालतेच आणि क्रिकेट शिवाय इतर खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही ही खंत आहेच. छोटासा क्रोएशिया फुटबॉल वर्ल्डकप फायनल मध्ये पोहचतो आणि १३५ करोड लोकसंख्या असलेल्या देशात एक सक्षम टीम तयार होत नाही हेही दुःख आहे. ऑलिम्पिक मध्ये आपला नन्नाचा पाढा आहे. भोयाचा पोरगा मासळी सारखा पोहतो, भिल्लाची तिरंदाजी व भालाफेक लाजवाब असते, पारध्याच्या पोरासारखं कुणी धावतं का ? रबर सारखे लवचिक शरीर असलेली डोंबारीची पोरगी तारेवर कसरत करताना आपण पाहतो ना? अशा अनेक जाती आहेत ज्यांच्या जीन्स मध्येच खेळ आहे. फक्त त्यांना प्रशिक्षण हवंय. पण असा " जातीचा " विचार कुणी करीत नाही. सरकार तर नाहीच नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे खेळ देशभावनेला पुरक आहे. मुसलमान मोहम्मद सिराज जेव्हा हिंदू ऋषभ पंतच्या पाठीवर हर्षातिरेकाने बसतो तेव्हा एक अतूट भारत जन्म घेतो. देश जिंकल्याचा आनंद तुमच्या जातीधर्माच्या पलिकडचा असतो हे ' पंत - सिराज ' च्या फोटोवरून आपल्या लक्षात येईल. ज्यांना असा एकजीव झालेला देश नको आहे ते सतत जयकारे लावून एकमेकांना टार्गेट बनवत असतात. सद्यःस्थितीत हिंदू-मुस्लीम-दलित असा हंगामा सुरू आहे. तरीही देशबुडव्यां टिनपाट लोकांना, पक्षपाती मिडियाला व फडतूस राजकीय धेंडांना भीक न घालता देशावर प्रेम करणाऱ्यांनी आपले देशहिताचे कार्य सुरूच ठेवले पाहिजे. आज आपल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकासाठी कपिलदेवच्या नेतृत्वातील टिमला सलाम! कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!
जयभीम !
- आनंद गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा