बंदी मनुची विद्या घेण्या होती ती उठली !
ज्ञानदाते इंग्रज आले विद्या शिकुनि घ्या रे
ऐसी संधी आली नव्हती हजार वर्षे रे !
असे गर्जूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा
परंपरेच्या बेड्या तोडुनि शिकण्यासाठी उठा !
-- सावित्रीबाई फुले
अलिकडे मातंग समाजातील काही विद्वतजनांना पेशवाईचा फार पुळका आलेला दिसतो. वस्ताद लहुजी साळवेंचे पुर्वज पेशव्यांच्या बाजुने होते म्हणून पेशवाई खतम करणाऱ्या इंग्रजांवर आणि त्यांच्या सैन्यात असणाऱ्या महारांवर मातंग बांधवांचा विशेष राग आहे. वस्तुतः या सैन्यात मराठे, महार , मांग व पठाण सुद्धा होते. किंबहुना मातंग असलेल्या लहुजींनी लो. टिळक, सावरकर, चाफेकरादी पुढाऱ्यांना लाठीकाठी शिकवून इंग्रजांविरुद्ध उभे केल्यामुळे " आम्ही " देशभक्त व महार लोक देशद्रोही असा नथीतून तीर मारण्याचा उपदव्याप काही मातंगांनी चालविलेला आहे. हा केवळ देशभक्त व देशद्रोही असा खेळ नसून सनातनी उग्रवादी कट्टर ब्राह्मणी धर्माच्या पाठीशी मातंगांना उभे करण्याचा डाव आहे. त्यासोबतच ब्राह्मण्यवादाच्या विरोधात वैचारिक लढा उभारणाऱ्या बौद्धांच्या विरुद्ध त्यांच्याच मातंग बांधवांना उकसंविण्याचे षडयंत्र आहे. या उठाठेवीतून संघपरिवार, बदनाम व अमानुष पेशव्यांना हिरो ठरविण्याचा प्रयास करताना दिसत आहे. गोडसेच्या बाबतीत हा खटाटोप सुरूच आहे.
या पेशव्याला सावित्रीबाईंनी " मनु पेशवा " असे संबोधित केले आहे. तर लहुजींची पुतणी मुक्ता साळवे पेशवाई संपल्याने काय काय बदल झाला व कशाकशाची बंदी झाली ते सांगते. " शुरपना दाखविणारे व् गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे,त्रिकमजी, आंधळा, पांसरा, काळ, बोहार इत्यादि मांग महारांवर स्वारया घालून विहिर भरित होते, व गरोदर बायकांसाहि देहांत शासन करीत होते, ती बंदी झाली आणि पुणे प्रांती मांग महारांचे कल्याण करणारे दयालु बाजीराव महाराजांच्या राज्यात असि अंधाधुंधी होती, कि ज्याच्या मनास वाटेल त्याने मांग महारांवर नाना प्रकारची तूफ़ाने घेवून शेंदाड़ शिपायासारखा जुलुम करीत होते, ती बंदी झाली (किल्ल्याच्या ) पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंश ही वाढत चालला मांग महार यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता, ते म्हणत कि याने चोरी करुण आणिले हे पांघरूण तर ब्राह्मणानिच पांघरावे जर मांग महार पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारित, पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकानी (चा ) अपराध केला असता मांगाचे किंवा महारांचे डोके मारित होते ती बंदी झाली. जुल्मी बिगारी गेली अंगाचा स्पर्श होवू देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू डांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. " -- आता बोला , हा घरचा आहेर मातंगांसाठी झणझणीत अंजन ठरणार नाही काय ? पेशव्यांची कड घेउन इंग्रजांशी खेटे घेणाऱ्या लहुजींसोबत जोतिबा सावित्रींचे कसे पटले असेल ? केवळ लहुजी जोतीबांच्या पाठीशी नव्हते तर दक्षिणा कमिटीच्या वादाच्या ( हा वाद फार मजेशीर आहे ) वेळेस २०० महार , मांग, चांभार जोतीबांच्या दिमतीला सशस्त्र उभे होते. जोतीबांच्या शाळेत मुलींना आणण्याचे काम जसे लहुजींनी केले तसे तेवढ्याच हिंमतीने मर्दगडी राणबा महारानेही केले. ज्या धर्मशास्त्रांनी मांगामहारांची दुर्गती केली त्या धर्मशास्त्राच्या बाजूने लहुजी कसे उभे राहतील ? जोतीबा, सावित्री व मुक्ता ज्या पेशवाईचे धिंडवडे काढतात ती पेशवाई लहुजींना कशी प्रिय असेल ? दोन भावात तेढ निर्माण करून एकमेकांना आपसात लढविण्यासाठी वस्ताद लहुजींना जाणीवपूर्वक तसे रंग तर देण्यात आले नसावे ना ? प्रबोधनकार ठाकरे या पेशव्यांना " पायपोस किमतीचे " म्हणतात. मुक्ता साळवे , पेशवाईनंतर जी संधी आली तिचा फायदा घ्यायला सांगते, इंग्रज सरकार मुळे काही मोजके ब्राह्मण बंधू मांगामहारांना शिकवायला तयार झालेत , ते जोतीबांनाही मदत करायचे, याचा उल्लेख करून ती पुढे म्हणते , "आमच्या प्रिय बंधूनी मांग महारांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व या शाळांना दयालु इंग्रज सरकारही मदत करतात, म्हणून या मांडलेल्या शाळाना फारच सहाय आहे. अहो दरिद्राणी व् दुःखानि पिडलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला द्यानरूपी औषद दया, म्हणजे तुम्ही चांगले दयानी होवून तुमच्या मनातील कुकल्पना जावून तुम्ही नीतिमान व्हाल ,तर तुमच्या रात्रदिवस ज्या जनवाराप्रमाणे हजरया घेतात त्या बंद होतील तर आता अभ्यास करा म्हणजे तुम्ही दयानी व्हाल कुकल्पना करणार नाही. "
सन १८१३ मध्ये इंग्रजांनी शिक्षण खुले केले होते. मांगामहारांना मात्र ब्राह्मणांचा जीवघेणा विरोध होता. इंग्रजी अंमल असल्यामुळे जोतीबा शिकू शकलेत. अस्पृश्यांंना शिक्षण घेण्यासाठी ज्या दिव्यातून जावे लागले ते वाचून अंगावर काटा उभा राहतो. इंग्रजी अंमलातच लहानग्या भीमरावने अक्षर गिरवले. ज्ञानाच्या अत्युच्च टोकावर भीमराव पोहचला आणि स्वतेजाने जग दिपवून टाकले. कुणी कुणाला महान बनवित नाही , व्यक्ती स्वकर्तृत्वाने मोठा होतो. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर , बाबासाहेब झालेत ; या नावाने अनेकांच्या लाठ्याकाठ्या, दांडपट्टे , गोलंदाजी, कलमबाजी , पोपटपंची व गांधीगिरी गळून पडली. बाबासाहेबांनी केवळ महारच नाही तर अखिल अस्पृश्यांच्या भल्यासाठी सनातनी हिंदूशी दोन हात करताना तटस्थ असलेल्या इंग्रजांनाही खडे बोल सुनावले तर स्वतःला मांगाचा भावी पुढारी समजणार्या देविदास कांबळेचेही कान उपटले. तसेच अस्पृश्यांचा कट्टर दुश्मन असलेल्या भोपटकरांच्या नेतृत्वात मातंग परिषद घेणाऱ्या के.के.सकटाचा बॅन्ड, बाबासाहेबांना आपला नेता मानणाऱ्या मातंगांनीच कसा वाजविला ...? ते पुढील भागात पाहू !
- आनंद गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा