वैशिष्ट्यीकृत पोस्ट

निपून सभी शस्त्रों में हम !

  ना मशीनगन में ही कौशल  निपून सभी शस्त्रों में हम ! डिसेंबर १९४७ : पुंछ,कोटली,झांगर, राजौरी,माचोई आणि नौशेरा उंच हिमालय पर्वतावरील एक ब...

रविवार, २५ जून, २०२३

कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!

 कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!



                क्रिकेट विषयी बरेच जण बोटं मोडताना दिसतात. मोजकेच देश हा खेळ खेळतात. मला क्रिकेट हा खेळ आवडतो, हे सांगायला काही लाज वाटण्याचे कारण नाही. अगदी विद्यार्थी दशेपासून मी क्रिकेट पाहिले.( खेळलो सुद्धा ). क्रिकेट मधील काही क्षण मला फार भावले. विश्वनाथ सारख्या कोवळ्या बुटक्या पोराने शतक ठोकल्या बरोबर त्याच्या पेक्षा दीडपट उंच असणाऱ्या टोनी ग्रेग ने त्याला कवट्यात धरून वर उचलले तो क्षण मला जागतिक सौहार्दाचा क्षण वाटला. दिवसभर वन डे खेळून फक्त ३६ धावा काढून नाबाद राहणाऱ्या सुनील गावसकरची चीडही आली. चंद्रा बेदी प्रसन्नाच्या फिरकीचे वादळ पाहिले. सैय्यद किरमानीचे लाजवाब यष्टिरक्षण. एकनाथ सोलकरचे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. डॉन ब्रॅडमनच्या शतकांशी  सुनील गावसकरच्या शतकांची स्पर्धा. कपिलदेवचे मुंगूस बॅटने मारलेले आडवे फंटे आणि त्याच्याच कप्तानीमध्ये टीम इंडियाने जिंकलेला विश्वकप हा कळस होता. कपिलदेव क्रिकेट मधील माझा आवडता खेळाडू. विश्वचषकातील झिम्बाब्वे विरुद्ध ठोकलेल्या त्याच्या नाबाद १७५ धावा व अंतिम सामन्यातील व्हिव्हियन रिचर्ड्सचा अशक्यकोटीतील झेल आपल्या हातात विश्वचषक देऊन गेला. या विश्वविजयासाठी आम्ही बॅंड लावून मोहल्ल्यात फेरी मारली होती. नंतरच्या काळातील अब्दुल कादर सारख्या फिरकी पटुला मनमुराद ठोकणारा सचिन पाहिला. चेतन शर्माला अंतिम चेंडूवर सामना जिंकून देणारा जिद्दी जावेद मियांदाद, अझहरची लागोपाठ तीन शतके, विनोद कांबळीचा वादळी खेळ, सेहवागचे त्रिशतक, मायकल होल्डींग, अँडी रॉबर्ट्स, डेनिस लिलीची तुफानी गोलंदाजी, व्हिव्हियन रिचर्ड्स, ब्रायन लाराचा झंझावात, चेंडूवर लागलेला माईक गॅटिंगच्या नाकाच्या हाडाचा  चिपोरा, रमण लांबाचा मैदानावरील मृत्यू......असे असंख्य क्षण स्मृतीत आहेत. फुटबॉल सुद्धा मला आवडतो. दिएगो मॅराडोना, नेयमार, मॅस्सी, रोनाल्डो, बॅकहॅम, जिनेदीन झिदान यांचा खेळ मी पाहिला. नेयमार माझा आवडता खेळाडू. मला लॉन टेनिसही आवडते, अगदी पुर्वी पासून. जॉन मॅकेन्रोची सर्विस तुफानच. जिमी कॉनर्स, बोरीस बेकर, एडबर्ग, फेडरर, नदाल, जोकोविच,मरे यांचे पदलालित्य व फटके म्हणजे मेजवानीच.बियान बोर्ग व बिली जीन किंगचे सामने पाहायला मिळाले नाहीत पण मार्टीना नवरातिलोवा विरुद्ध गॅब्रिएला सॅबाटिनी विरुद्ध सौंदर्यवती स्टेफी ग्राफ यांच्या सामन्यात चुरस असायची,ॲना कुर्निकोव्हा पाहिली. ग्रॅन्ड स्लॅम मध्ये पहिल्यांदा अपसेट घडवून आणून विंबल्डन जिंकणारे मायकेल चँग व अरांझा सांचेज अजूनही लक्षात आहे माझ्या. खेळ माणसाला जवळ आणतो. देशालाच नव्हे विश्वालाही मिठीत घेतो. बाळू पालवणकर या चांभार समाजातील कर्तबगार क्रिकेटपटूचा सत्कार खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. खेळात जात धर्म पाहिला जात नाही पण पालवणकर बंधूंच्या बाबतीत तो पाळल्या गेला. भारतीय खेळाडू जातीधर्माच्या प्रभावाखाली असायचे. अलिकडे हा प्रकार कमी झाला. पण क्रिकेट मध्ये लॉबिंग चालतेच आणि क्रिकेट शिवाय इतर खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही ही खंत आहेच. छोटासा क्रोएशिया फुटबॉल वर्ल्डकप फायनल मध्ये पोहचतो आणि १३५ करोड लोकसंख्या असलेल्या देशात एक सक्षम टीम तयार होत नाही हेही दुःख आहे. ऑलिम्पिक मध्ये आपला नन्नाचा पाढा आहे.  भोयाचा पोरगा मासळी सारखा पोहतो, भिल्लाची तिरंदाजी व भालाफेक लाजवाब असते, पारध्याच्या पोरासारखं कुणी धावतं का ? रबर सारखे लवचिक शरीर असलेली डोंबारीची पोरगी तारेवर कसरत करताना आपण पाहतो ना? अशा अनेक जाती आहेत ज्यांच्या जीन्स मध्येच खेळ आहे. फक्त त्यांना प्रशिक्षण हवंय. पण असा " जातीचा " विचार कुणी करीत नाही. सरकार तर नाहीच नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे खेळ देशभावनेला पुरक आहे.  मुसलमान मोहम्मद सिराज जेव्हा हिंदू ऋषभ पंतच्या पाठीवर हर्षातिरेकाने बसतो तेव्हा एक अतूट भारत जन्म घेतो. देश जिंकल्याचा आनंद तुमच्या जातीधर्माच्या पलिकडचा असतो हे ' पंत - सिराज ' च्या फोटोवरून आपल्या लक्षात येईल. ज्यांना असा एकजीव झालेला देश नको आहे ते सतत जयकारे लावून एकमेकांना टार्गेट बनवत असतात.  सद्यःस्थितीत हिंदू-मुस्लीम-दलित असा हंगामा सुरू आहे. तरीही देशबुडव्यां टिनपाट लोकांना, पक्षपाती मिडियाला व फडतूस राजकीय धेंडांना भीक न घालता देशावर प्रेम करणाऱ्यांनी आपले देशहिताचे कार्य सुरूच ठेवले पाहिजे. आज आपल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकासाठी कपिलदेवच्या नेतृत्वातील टिमला सलाम! कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!
जयभीम !

- आनंद गायकवाड

गुरुवार, १५ जून, २०२३

बलिदानाचं कफन डोक्याला बांधून

बलिदानाचं कफन डोक्याला बांधून
झेंड्यासह दांडा हातात घेऊन आम्ही !


- आनंद गायकवाड

--------------------------------------------------------------------------

कार्यकर्ते कधी निराश होतात तर  काही तग धरून राहतात, पण ये जीना भी क्या जीना है यार,असं टोचून त्याचंच आयुष्य त्याला बोलतं असतं. जगावं तर लागते, चार घासाची सोय करण्यात त्याची फरफट होते.  मजुरीच्या भरोशावर कधीतरी तो आपला परिवार उभा करतो. बायकोसह धबधब्याच्या फव्वाऱ्यात चिंब भिजण्याचा आनंद त्याला मिळत नाही मात्र फुटलेल्या कवेलूतून , टिनपत्र्यातून गळणारे धबधबे घरातल्या भांड्यात जमा करण्याची कवायत त्यांना करावी लागते. कमी अधिक प्रमाणात कार्यकर्ते असेच जगतात आणि या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर लाथ देऊन नेते पद, प्रतिष्ठा व पैशाचे पहाड बनतात.
--------------------------------------------------------------------------

दोस्ता ! आजही तू रस्त्यात उभा आहेस
झेंडा हातात घेऊन
म्हणून मी शीतल हवेत बसून
कविता लिहितोय.

अरुण काळे या पँथर ,मास मुव्हमेंट असा चळवळीचा प्रवास करून नोकरीत स्थिरावलेल्या कार्यकर्त्या कवीच्या खंत या कवितेतील ही कबुली आहे. अरुण आता नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा झेंडा हातात घेऊन शासन, प्रशासन व जातियवादी मनोवृत्तीच्या समूहाला भिडणारा हा कार्यकर्ता नावाचा प्राणी सर्वबाजूंनी टोचून टोचून मारल्या जाताना आज दिसतोय.

दोस्ता ! तुझ्यामुळे निर्विघ्न सावली भोगणारे
कृतघ्नपणे तुला बोल लावतात.

ही बोलकी ओळ कार्यकर्त्यांची अवस्था विशद करायला पुरेशी आहे. कुणी त्याला वर्गणीचोर म्हणतो तर कुणी मवाली. कुणी दलाल म्हणतो तर कुणी सेल्समन. कुणी भाकऱ्या तर कुणी बेवडा म्हणून त्याचा उद्धार करतो. कार्यकर्त्यांच्या अश्रू, घाम, रक्त सांडण्यातून ज्यांचे जीवन सुखमय व गाल गुलाबी झाले ते लेखणीबहाद्दर सुद्धा लेखणीने त्याची चामडी सोलतात. त्याचा दोष एवढाच की ऐन तारुण्यात त्याचा ट्रॅक बदलला. आपल्या बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठताना त्याला आपल्या भविष्याचेही भान राहिले नाही. शिक्षण सुटले, नोकरी नाही, दिवसरात्र समाज... समाज... समाज. शेजारची मधुबाला, तेरी दो टकियाँ दी नौकरी में मेरा लाखों का सावन जाये , म्हणत म्हणत कायमची दूर जाते. कार्यकर्ता आपली शबनम लटकवून पुन्हा सडकेवर उतरतो आणि आकाशात समग्र क्रांतीचे स्वप्न रंगवत बसतो. जशी गरिबी बालपण मोडीत काढते तसे आंदोलनही तारुण्य हिरावून घेते. कार्यकर्त्याला चालता फिरता मिळणाऱ्या शेकडो जयभीमची कमाई सोडली तर जयभीम करता करता टाचा घासून मरणे त्याच्या वाट्याला आलेले मी पाहिले आहे.

पॅंथर दिवे लागण्या आधी
घरी परतलेलं बरं !
कुठल्या चौकात;
केव्हा दगडफेक होईल
सांगता येत नाही.

अनिल कांबळे या कार्यकर्त्या कवीची ही भीती आणि खबरदारीही. पँथरच्या कार्यकर्त्यांचे बलिदान आपल्या सर्वांना माहिती असेलच. त्यासाठी पँथर भागवत जाधव आठवावा लागेल. कार्यकर्ते कधी निराश होतात तर  काही तग धरून राहतात, पण ये जीना भी क्या जीना है यार,असं टोचून त्याचंच आयुष्य त्याला बोलतं असतं. जगावं तर लागते, चार घासाची सोय करण्यात त्याची फरफट होते.  मजुरीच्या भरोशावर कधीतरी तो आपला परिवार उभा करतो. बायकोसह धबधब्याच्या फव्वाऱ्यात चिंब भिजण्याचा आनंद त्याला मिळत नाही मात्र फुटलेल्या कवेलूतून,टिनपत्र्यातून गळणारे धबधबे घरातल्या भांड्यात जमा करण्याची कवायत त्यांना करावी लागते. कमी अधिक प्रमाणात कार्यकर्ते असेच जगतात आणि या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर लाथ देऊन नेते पद, प्रतिष्ठा व पैशाचे पहाड बनतात. 

       काही दुसऱ्या प्रकारचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या उपकारामुळे अनेक बाबुसाहेब जन्माला आलेत. आयुष्यभर नोकरी चाकरी करतांना जे कधी समाजाकडे ढुंकूनही पाहत नाही. जात लपवतात, सामाजिक कार्यासाठी श्रम व पैसाही देत नाहीत ते निवृत्त झाल्यावर कोणत्यातरी धार्मिक संघटनेशी जुळवून घेतात आणि गुडघेदुखीच्या या वयात शूभ्र वस्त्र घालुन गुडघ्यावर वाकून नमो तस्स करताना आढळतात. किंवा राजकीय संधान साधून थेट पदाधिकारी होतात. हे कार्यकर्ते अलिकडे मोठ्या प्रमाणात आढळतील. 

मुरलीधर जाधवांनी जो कार्यकर्ता रेखाटला तो आपल्याला पँथर चळवळीपासून ते खैरलांजी हत्याकांड विरोधी आंदोलनात पाहायला मिळतो. नामांतर आंदोलनात हे कार्यकर्तेच कवी,लेखक सुद्धा होते. बरेचदा कवी आणि कार्यकर्ता एकच असतो. तो जे जगतो ते कवितेत मांडतो. 

त्याच्यासाठी.............

कविता होत असते
पावसात गळणाऱ्या झोपडीचं मजबूत छप्पर
शेवटी कविता असते.
पोटाला पालवं बांधून खडी फोडणारे असंख्य हात

अनिल कांबळे या कार्यकर्त्या कवीची ही रचना आहे. वाशीम जिल्ह्यातील पारडी टकमोर या गावात झोपडी नंबर बारा मध्ये तो मजुरी करणाऱ्या मायबापाच्या पोटी जन्माला आला. शिकताना दलित पँथरच्या प्रवाहात सामील झाला. जिंदाबाद मुर्दाबाद चे नारे द्यायला शिकला. नामांतराच्या आंदोलनात लाॅंगमार्च मध्ये सहभागी झाला. तुरुंगात गेला. पक्का कार्यकर्ता झाला. पेटलेल्या वर्तमानाचा पलिता हातात घेऊन खांद्यावरची शबनम सांभाळत मार्गस्थ झाला. आंबेडकरी चळवळीची वाट चालताना स्वतःचे भविष्य पायाखाली कधी दबले याची जाणीवच अनिलला झाली नाही. पोट भरण्यासाठी गुजरात मधील खाणीतील दगडं फोडतानाही जातियतेचे चटके बसलेच. तिथूनच अनिलच्या कवितेचा प्रवास सुरू झाला.

मी एक दरवेशी, आयुष्याचं अस्वल
घेऊन दारोदार फिरणारा
अनुभूतीची कविता उधारीत वाटणारा.

आपलं आयुष्य विषाचा प्याला झालंय याची खंत कवितेत व्यक्त करताना आपल्या सहचारिणी मुळे फाटलेलं आयुष्य शिवता आलं असं अनिल म्हणतो. उसवलेल्या  कार्यकर्त्यांच्या वाट्याला सुई दोरा घेऊन उभी ठाकलेली पत्नी नावाची एक माऊली असते ही एक जमेची बाजू म्हणायची. अनिलच्या कविता उशिरा प्रकाशित झाल्यात. मित्रांनी पुस्तक प्रकाशनासाठी दिलेले पैसे अनिल ने कविता नावाच्या मुलीच्या लग्नासाठी कामी लावले. कविता कागदावरच राहिली. ज्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला ते भराभर व भाराभार लिहिते झाले. पण माझी भाकरीचा प्रश्न सोडविण्यात अर्धी जिंदगी बर्बाद झाली. अशी खंत ते व्यक्त करतात. झोपडी नंबर बारा, हा अनिलचा काव्यसंग्रह अखेर प्रकाशित झाला. कार्यकर्ते कसे जगतात , कार्यकर्त्यांचा वापर करून नेते कसे मोठे झालेत यावर प्रकाश टाकताना स्वतःच्या आयुष्याचा आलेखही ते कवितेतून चितारतात. आंबेडकरी चळवळीशी निष्ठा ठेवून ते प्रतिक्रियावाद्यांवरही तुटून पडतात. 

गांधीजींच्या काठीला धरून
संघवाल्याची चड्डी सांभाळत बसणारा
या ग्लोबलायझेशनच्या काळात
मी अविरत चालतच जाणार
मनुच्या पिलावळीला पायाखाली तुडवत.

असा निर्धार अनिलची कविता व्यक्त करते. ब्राह्मणवाद व भांडवलशाहीच्या अनैतिक संबंधातून जन्माला येऊ घातलेली चड्डीवाल्यांच्या स्वप्नातील महासत्ता वांझ ठरली असून ही महासत्ता कुणाची रखेल आहे असा जळजळीत सवाल अनिल करतो. या कवितेला वर्तमानातील धोके माहीत आहेत तर भविष्यातील संकटांची चाहूल लागलेलीच आहे म्हणून ती मुक्याचे सोंग घेऊन मख्खपणे रिलायन्सच्या टॉवरवर उभ्या असलेल्या वांझ महासत्तेवर शरसंधान करते. स्वतःच्या आयुष्याशी दोन हात करताना , खांद्यावरची शबनम व हातात पकडलेला चळवळीचा झेंडा सांभाळून अनिल कांबळे शब्दांचे भीमास्त्र चौफेर फेकतो. या माऱ्यात कार्यकर्त्यांचा वापर करून मोठे झालेले नेतेही सुटत नाही. नेत्यांना कार्यकर्ते मिळतच असतात. वर्षानुवर्षे नेत्यांचे आदेश शिरोधार्य मानून कार्यकर्ता आंदोलनात उतरतो, झेंडा घट्ट धरून ठेवतो, शत्रूंवर दांडाही चालवतो, प्रसंगी पोलिसांचे दंडुके खातो, तुरुंगात जातो, घरात चूल पेटली की नाही याकडे दुर्लक्ष करतो. नेता एकदिवस त्याला घराचा रस्ता दाखवतो.  अनिल गेला की नेत्याला अशोक मिळतो, अशोक सुटला की सिद्धार्थ मिळतो. कार्यकर्ते असे बर्बाद होत राहतात. आंबेडकरी म्हटल्या जाणाऱ्या संघटनेचा/ राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असा वाळीत पडतो. कार्यकर्ता निराशेच्या पेल्यात बुडतो तरी शत्रूंच्या झुंडीवर फेकण्यासाठी दगड हातात घेतो. नव्यानेच शुभ्र वस्त्र परिधान करून धम्ममय झालेली नीतीमान व शीलवान मंडळी कार्यकर्त्याला बेवडा संबोधून बौद्ध मानण्यासही नकार देते. दलितांच्या उद्योगपतींनी उभी केलेली संघटनाही उद्योजक कार्यशाळेकरिता  कार्यकर्त्यांसाठी दारे बंद करते. सगळीकडून टाकल्या गेलेला हा कार्यकर्ता नवा अस्पृश्य म्हणून आकार घेऊ लागतो. आयुष्यात गमावलेल्या वेळकाळाचे गणित जुळवत शिल्लक राहिलेल्या बाकीतील शून्य, शून्यात पाहत पाहत शून्यातच विलीन होऊन जातो. कार्यकर्त्यामुळे नेत्यांचं जीवन बदलते, आंबेडकरी कार्यकर्ता बदललेल्या नेत्याला कवितेच्या कठड्यात उभा करतो, अनिलने ही तसेच केले....बघा ! 

बदल


आमच्या अस्तित्वाला छेद देऊन
तुमच्या खिशासह पोटाचा आकार वाढत गेला
आम्ही आमच्या पोटाचा
विचार न करता
तुमच्या पाठीमागं
बलिदानाचं कफन डोक्याला बांधून 
झेंड्यासह दांडा हातात घेऊन.

जागतिकीकरणाच्या रेट्यानं
वाढला तुमचा वेग.
लयभारी तुमची क्रेझ, बिझी तुमचं नेटवर्क
वेबसाईट तुमची होत नाही ओपन
सदानकदा असता तुम्ही नाॅट रिचेबल
कधीतरी मला मॅसेज येतो
नाऊ आय एम अनेबल

कालपरवा तुमच्या वाढदिवसाचा 
डिजिटल बॅनर चौकात झळकला
ईमेल ॲड्रेसवर तुमच्या 
बेस्ट कॉम्प्लीमेन्ट्स आल्याच असतील 
मी पोस्टानं पाठवलेल्या पत्राची
पोच मात्र आलीच नाही, नेव्हर माईन्ड

तुमची आठवण कायम राहावी म्हणून
वाढदिवसाचं डिजीटल बॅनर
मी आणलं घरी
आडवं बांधलं घराच्या कमजोर छतावर 
पावसाळ्यात आधार मिळावा म्हणून.

- अनिल कांबळे


शनिवार, १० जून, २०२३

जातिश्रेष्ठत्वाची स्पर्धा ? भाग चार !

             हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने आचरण अनुभव घेऊ.परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे. तो व त्यांच्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत. व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनांत देखील न येवो. -- मुक्ता साळवे       

           बौद्ध अथवा महारांच्या विरुद्ध ज्या पोस्ट मी फेसबूकवर पाहिल्यात त्यांचे प्रोफाईल तपासले असता त्यातील बहुतांश व्यक्ती मला जय श्रीरामवाले  भाजपाई आढळलेत. हिंदू मांग असण्याचा गर्व सांगून हे व्यक्ती महारांवर घसरलेत. सोबतच ते बाबासाहेबांना प्रश्नांकित करू लागलेत. बाबासाहेबांमुळे आम्हाला शिक्षण मिळाले नाही असा त्यांचा कांगावा पहायला मिळाला. बाबासाहेबांना कुणी शिकवले असा प्रश्नही ते नाक वर करून विचारतात. जणू हिंदू ब्राह्मणांनी मातंग समाजाला विशेष वागणूक देऊन शिक्षित केले असा या काही मातंगांचा समज असावा. ब्राह्मण वर्ग शुद्रांनाच शिक्षणाता हक्क द्यायला तयार नव्हता तिथे अस्पृश्यांना काय शिक्षण मिळणार ? पेशव्यांच्या काळात तर मनुस्मृतीचाच अंमल होता. हाच प्रभाव पुढे इंग्रजांच्या काळातही होता. पुढारलेल्या जाती आपल्या विरोधात जातील म्हणून ब्रिटीशही वचकून होते त्यामुळे १८१३‌ ते १८५४ पर्यंत दलितांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला नव्हता. १८५५ ला पहिली शाळा इंग्रज सरकारने उघडली ती अहमदनगर मध्ये. सैनिकी कॅम्पात शिक्षण घेणारी सैनिकांची मुले असायची पण सार्वजनिक शिक्षण खुले झाले ते १८२३ नंतर. इंग्रज सरकार दलितांना शिक्षण देण्यास मागेपुढे पहात असताना, दलितांना शिक्षण दिले ते ख्रिश्चनांच्या मिशनरी शाळांनी. या शाळांना पुर्वी अनुदान सुद्धा मिळत नव्हते तरीही या शाळांनी अस्पृश्यांना विद्यादान दिले. हे अस्पृश्य लाभार्थी केवळ महारच नव्हते.  हिंदू मांग म्हणण्याचा ज्यांना गर्व वाटतो त्यांनी अस्पृश्य वर्गाच्या शैक्षणिक वाटचालीचा इतिहास वाचावा. १८८१-८२ मध्ये उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणारा एकही दलित व आदिवासी विद्यार्थी नव्हता. ८० टक्क्यांच्या वर ब्राह्मणादी पुढारलेल्या जाती प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणात अग्रेसर होत्या. केवळ ०.८७ टक्के दलित वर्ग प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणात होता. १९८२ ला म. फुलेंनी हंटर कमिशन ला दिलेली साक्ष व बाबासाहेबांनी १९२८ ला संवैधानिक आयोगाला दिलेले निवेदन, काही उपटसुंभ मांग बंधुंच्या मेंदुची कवाडे उघडायला पुरेशी आहेत, पण ते वाचतील तेव्हा ना!  सैनिकी कॅम्पातील शाळेत बाबासाहेबांनी शिक्षणाची सुरुवात केली. पुढे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातील योजनेच्या मदतीने बाबासाहेबांनी आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली. आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग त्यांनी दलितोद्धारासाठी करून घेतला. ब्रिटीश हे त्रयस्थ आहेत त्यांच्याकडून जितका लाभ मिळवता येईल तितका दलितांच्या पदरात पाडून घेतला. प्रसंगी ते ब्रिटीशांशी भांडलेत. पहिल्या गोलमेज परिषदेत त्यांनी ब्रिटीश पंतप्रधानासमोर सरकारची कानउघाडणी केली. या भाषणामुळे सयाजीराव फार समाधानी झालेत. आपल्या मदतीचे सार्थक झाल्याचे त्यांनी आपल्या  राणीला सांगितले. सयाजीरावांचे सामाजिक कर्ज असे फेडले बाबासाहेबांनी. केवळ शिक्षणच दलितांना या गर्तेतून बाहेर काढू शकेल असे बाबासाहेबांचे मत होते. फक्त भाषणे वा निवेदने देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी, मांग महारवाड्याच्या निरुत्साही वातावरणाच्या बाहेर येऊन दलितांनी शिकावे म्हणून धारवाड, मुंबई व अहमदाबादला वसतिगृहे उघडलीत.  हे वसतिगृह केवळ महारांसाठी नव्हते. धारवाडच्या वसतिगृहात पैसा नसल्यामुळे तीन दिवस विद्यार्थी उपाशी आहेत हे कळताच आजारी असलेल्या रमाईने स्वतःच्या चार सोन्याच्या बांगड्या हनमंतराव वराळेंना तोडायला दिल्या. त्या रकमेतून विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली. कसे फेडाल हे उपकार कृतघ्न झालेल्या हरामखोरांनो ? या वसतिगृहात महार , चांभार, मांग , भंगी असे सर्व अस्पृश्य जातीचे विद्यार्थी असायचे.  आपल्या बुद्धीवैभवाच्या जोरावर बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कांसाठी कर्मठ हिंदूच्या विरोधात लढे दिलेत. केवळ महार सक्षम व्हावा व मांग वंचित राहावा असा या लढ्याचा उद्देश होता काय ? महारांनाच या लढ्याची गरज होती व मांगांना सवर्ण हिंदू मांडीवर घेऊन सोन्याचा घास भरवत होते काय? पाण्याचा हक्क साबीत करण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी, शैक्षणिक अधिकारासाठी सतत संघर्षशील राहून बाबासाहेबांनी समतेचा मार्ग दलितांच्या पायाखाली खेचून आणला. सवर्ण व काँग्रेस विरुद्ध असताना सायमन कमिशन समोर दलितांच्या मागण्या हिरिरीने मांडल्यात. पुढे इधूनच राखीव जागांची वाट खुली झाली. पुणे कराराच्या काळात जो विरोध बाबासाहेबांना झाला तो कल्पनातीत आहे. अखिल अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क खेचून आणताना जर बाबासाहेबांना काही दगाफटका झाला असता तर महारांवर कुऱ्हाड कोसळली असती, मांग चांभार नामानिराळे राहिले असते. व्यक्ती तावून सुलाखून कोहिनूर बनतो, कष्ट उपसावे लागतात, त्याग करावा लागतो, कबीरांचा संयम, अशोकाचा निश्चय,  शिवरायाचा करारी बाणा, जोतीबांचा आसूड, शाहुंचा बेडरपणा आणि बुद्धाची करुणा अंगी जो बाणवतो तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतो. नेता बनायला देविदास कांबळेही निघाला होता, के.के. सकटाने भोपटकरांच्या नेतृत्वात पुण्यात मातंग परिषद भरवून बाबासाहेबांना विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला पण काही मातंग बांधवांनी या परिषदेचा फोलपणा दर्शविणारे पत्र दीनबंधू वृत्तपत्राकडे पाठविले, त्यात ते म्हणतात, " त्या ठिकाणी आमच्या नावावर पोट भरणारे वायदंडे हे भटाच्या वतीने चालून‌आमचा मातंग समाज रसातळास जावा असा एक त्यांचा अंदाज दिसत आहे. तरीपण आमच्या मातंग वीरांनी थोडक्यात सावध राहून लोकांच्या भरवशावर न राहाता, आपल्या पायावर उभे रहावे हे आद्य कर्तव्य होय. "  या पत्रात वायदंडे व सकट यांना मातंग समाज फुकटही विचारत नाही, असे नमूद करून आपणच आपली गळकी घरे शाकारून घ्यावी मात्र दुसऱ्यांवर विसंबून राहू नये असा सल्लाही या पत्रात देण्यात आला आहे. या पत्रावर सिताराम‌ बाबाजी लांडगे, जानो बाबाजी भिंगारदेव, श्रीनाथ सदाशीव वैराठ, तुकाराम लक्ष्मण ढकपाळ व भिकाजी रामजी गायकवाड यांच्या सह्या आहेत. या पत्राच्या शेवटी हे मातंगवीर म्हणतात, "आमचे विद्वान रा.रा. डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची गदा नकली वीरांचे मांडीवर बसल्याखेरीज राहणार नाही. "    
           काल जे भोपटकरांचे होते ते आज गोळवलकरांचे नकली वीर बनून बौद्ध व मातंगात भांडणे लावण्याचे कृष्णकृत्य  करण्यासाठी  भुंकताहेत त्यांची मांडीच नव्हे तर पार्श्वभाग  फोडण्यासाठी अनेक मातंगवीर पुढे सरसावतील. माझ्या जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सारखणी गावामधील दीडशे मातंग कुटुंबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हेच खरे दुखणे आहे, या दुखण्यावरचा उपाय संघपरिवार शोधतो आहे. वस्ताद लहुजी साळवे यांना ते उपाय बनवू पाहताहेत पण लहुजींचा दांडपट्टा त्यांची शेंडी कापल्याशिवाय राहणार नाही, जोतीबांना सहकार्य करून आधीच त्यांनी शेंडीची वासलात लावली व मुक्ता ला लेखणी देऊन " आमचा धर्म कोणता ?" असा खणखणीत सवाल विचारायला लावला. मी हिंदू मांग आहे असे म्हणणाऱ्या नकली मातंगांना हा मुक्ताचा सवालच नंगा करील. पुढील भागात पाहू !

 -- आनंद गायकवाड 

वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील ?

वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील ?

सफाई कामगार अर्थात भारतातील भंगी समाज. हजारो वर्षापासून उच्चवर्णीयांच्या घाणीला साफ करण्याचे काम करताहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सफाईच्या कामाची निंदा केली आहे. " भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील . त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की , त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात पसरून ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील " [ बहिष्कृत भारत : २३ डिसेंबर १९२७ ] …. या विधानात त्यांचा धंदा " नीच ' आहे असा शब्द वापरण्यात आलेला आहे. यावरून असे म्हणता येईल कि बाबासाहेब सफाईच्या या धंद्याला उच्च मानीत नव्हते . महार वतनामध्ये गावात स्वच्छता ठेवण्याचे काम जे महारांच्या शिरावर ठेवण्यात आले होते ते कसे बेकायदेशीर आहे हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात ठराव क्र. ६ … " गावात स्वच्छता ठेवणे हे महारांचे एक काम आहे असे ता. २८ जून १८८८ च्या ४२७३ च्या सरकारी ठरावाने ठरविण्यात आले. परंतु वतनदार कामदारासंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमाशी हा ठराव विसंगत आहे , तरी तो सरकारने ताबडतोब रद्द कारवां , अशी या परिषदेची आग्रहपुरःसर सुचना आहे " …ठराव क्र ७ …. " हे वतनदार कामदारासंबंधांच्या कायद्याच्या चौथ्या कालमावरून व सदरील ठरावावरून स्पष्ट होते . तरी महारांना रयतेच्या खाजगी कामाच्या जबाबदारीतून मुक्त करणे अवश्य आहे. असे या परिषदेचे मत आहे " [ बहिष्कृत भारत : २ सप्टेंबर १९२७ ] ' ठराव ताबडतोब रद्द करावा ' आणि " जबाबदारीतून मुक्त करणे " हे वाक्य सफाई कामाच्या निषेधाचे द्योतक आहे. सफाई काम अथवा भंगी काम , ' भंगी काम करणाऱ्या गर्भवती महिलेला आपल्या मुलासाठी सफाई कामगाराच्या पदाची भूल पडते ' अश्या आशयाचे उदगार बाबासाहेबांनी काढले आहे. हजारो वर्ष उच्चवर्णीयांची घाण साफ करण्याची भंगी समाजाची मानसिकता महात्मा गांधींना प्रिय होती. म्हणून त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाईच्या कामाचे उदात्तीकरण केले. भंगी समाजाने हे काम कधीच सोडू नये या साठी गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन भंगी समाजाला मानसिकरीत्या 'ब्लॅकमेल ' केले. नरेंद्र मोदी तेच करताहेत. हा कट्टर मनुवादी संघीय माणूस भंगी समाजाला उच्च पदे देऊ शकत नाही कारण त्याचा धर्म तशी मुभा देत नाही. त्याची धर्मसंसद समस्त दलितांच्या उत्थानाच्या विरुद्ध आहे. म्हणून तो भंगीकामाचे उदात्तीकरण करतोय. आमच्या गृहिणी किंवा आम्ही सफाई काम घरात करतोच पण …समाजकार्य म्हणजे फॅशन समजणारे , अंबानी , आमीर , अमिताभ इत्यादी गर्भश्रीमंत माणसे मोदीच्या या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या आणि भंगीकामाच्या पावित्र्याच्या जातीयवादी कामात हातभार लावताहेत. फक्त एक दिवस सफाई करून ही माणसे पुन्हा शेकडो वर्ष भंगीलोकांना त्याच कामात गुंतवून ठेवण्याच्या कामात लागले आहेत. नरेंद्र मोदी म्हणतात … कलम को झाडू बनावो , आणि बाबासाहेब झाडूला कलम बनवायला सांगतात …. हाच फरक आहे गांधी, मोदी आणि बाबासाहेबांमध्ये. बाबांना झाडूवाला जज पाहायचा आहे आणि गांधी व मोदीला झाडूवाला भंगी जगाच्या अंतापर्यंत हवा आहे …कारण हाच हिंदू धर्मशास्त्रांचा संकेत व कायदा आहे जो कोणताही हिंदू स्वप्नातही तोडू शकत नाही आणि धर्ममार्तंड ते तोडू देत नाही. ज्या दिवशी वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील तेव्हा गांधी व मोदी जमीनदोस्त होतील. - आनंद गायकवाड

शुक्रवार, ९ जून, २०२३

जातिश्रेष्ठत्वाची स्पर्धा ? भाग तीन !

गेले मेले मनु पेशवे            आंग्लाई आली 
बंदी मनुची विद्या घेण्या      होती ती उठली ! 
ज्ञानदाते इंग्रज आले          विद्या शिकुनि घ्या रे 
ऐसी संधी आली नव्हती      हजार वर्षे रे ! 
असे गर्जूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा 
परंपरेच्या बेड्या तोडुनि      शिकण्यासाठी उठा ! 

-- सावित्रीबाई फुले     


      अलिकडे मातंग समाजातील काही विद्वतजनांना पेशवाईचा फार पुळका आलेला दिसतो. वस्ताद लहुजी साळवेंचे पुर्वज पेशव्यांच्या बाजुने होते म्हणून पेशवाई खतम करणाऱ्या इंग्रजांवर आणि त्यांच्या सैन्यात असणाऱ्या महारांवर मातंग बांधवांचा विशेष राग आहे. वस्तुतः या सैन्यात मराठे, महार , मांग व पठाण सुद्धा होते. किंबहुना मातंग असलेल्या लहुजींनी लो. टिळक, सावरकर, चाफेकरादी पुढाऱ्यांना लाठीकाठी शिकवून इंग्रजांविरुद्ध उभे केल्यामुळे " आम्ही " देशभक्त व महार लोक देशद्रोही असा नथीतून तीर मारण्याचा उपदव्याप काही मातंगांनी चालविलेला आहे. हा केवळ देशभक्त व‌ देशद्रोही असा खेळ‌ नसून सनातनी उग्रवादी कट्टर ब्राह्मणी धर्माच्या पाठीशी मातंगांना उभे करण्याचा डाव आहे. त्यासोबतच ब्राह्मण्यवादाच्या विरोधात वैचारिक लढा उभारणाऱ्या बौद्धांच्या विरुद्ध त्यांच्याच मातंग बांधवांना उकसंविण्याचे षडयंत्र आहे.  या उठाठेवीतून संघपरिवार, बदनाम व अमानुष पेशव्यांना हिरो ठरविण्याचा प्रयास करताना दिसत आहे. गोडसेच्या बाबतीत हा खटाटोप सुरूच आहे.    

    या पेशव्याला सावित्रीबाईंनी " मनु पेशवा " असे संबोधित केले आहे. तर लहुजींची पुतणी मुक्ता साळवे पेशवाई संपल्याने काय काय बदल झाला व कशाकशाची बंदी झाली ते सांगते.  " शुरपना  दाखविणारे व् गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे,त्रिकमजी, आंधळा, पांसरा, काळ,  बोहार इत्यादि मांग महारांवर स्वारया  घालून विहिर भरित होते, व गरोदर बायकांसाहि देहांत शासन करीत होते, ती  बंदी झाली  आणि पुणे प्रांती मांग महारांचे कल्याण करणारे दयालु बाजीराव महाराजांच्या राज्यात असि अंधाधुंधी होती, कि ज्याच्या मनास वाटेल त्याने मांग महारांवर नाना प्रकारची तूफ़ाने घेवून शेंदाड़ शिपायासारखा जुलुम करीत होते, ती  बंदी झाली (किल्ल्याच्या ) पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंश ही वाढत चालला मांग महार यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता, ते म्हणत कि याने चोरी करुण  आणिले हे पांघरूण तर ब्राह्मणानिच पांघरावे जर मांग महार  पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारित, पण  आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकानी (चा ) अपराध केला असता मांगाचे किंवा महारांचे डोके मारित  होते ती  बंदी झाली. जुल्मी बिगारी गेली अंगाचा स्पर्श होवू देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू डांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. " -- आता बोला , हा घरचा आहेर मातंगांसाठी झणझणीत अंजन ठरणार नाही काय ?   पेशव्यांची कड घेउन इंग्रजांशी खेटे घेणाऱ्या लहुजींसोबत जोतिबा सावित्रींचे कसे पटले असेल ? केवळ लहुजी जोतीबांच्या पाठीशी नव्हते तर दक्षिणा कमिटीच्या वादाच्या ( हा‌ वाद फार मजेशीर आहे ) वेळेस २०० महार , मांग, चांभार जोतीबांच्या दिमतीला सशस्त्र उभे होते. जोतीबांच्या शाळेत मुलींना आणण्याचे काम जसे लहुजींनी केले तसे तेवढ्याच हिंमतीने मर्दगडी राणबा महारानेही केले. ज्या धर्मशास्त्रांनी मांगामहारांची दुर्गती केली त्या धर्मशास्त्राच्या बाजूने लहुजी कसे उभे राहतील ? जोतीबा, सावित्री व मुक्ता ज्या पेशवाईचे धिंडवडे काढतात ती पेशवाई लहुजींना कशी प्रिय असेल ? दोन भावात तेढ निर्माण करून एकमेकांना आपसात लढविण्यासाठी वस्ताद लहुजींना जाणीवपूर्वक तसे रंग तर देण्यात आले नसावे ना ? प्रबोधनकार ठाकरे या पेशव्यांना " पायपोस किमतीचे " म्हणतात. मुक्ता साळवे , पेशवाईनंतर जी संधी आली तिचा फायदा घ्यायला सांगते, इंग्रज सरकार मुळे काही मोजके ब्राह्मण बंधू मांगामहारांना शिकवायला तयार झालेत , ते जोतीबांनाही मदत करायचे, याचा उल्लेख करून ती पुढे म्हणते , "आमच्या प्रिय बंधूनी  मांग महारांच्या मुलांच्या शाळा  मांडल्या  आहेत व या शाळांना दयालु इंग्रज सरकारही मदत  करतात, म्हणून या मांडलेल्या शाळाना  फारच  सहाय आहे. अहो दरिद्राणी व् दुःखानि  पिडलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात,  तर तुमच्या बुद्धीला द्यानरूपी औषद दया,  म्हणजे तुम्ही चांगले दयानी होवून तुमच्या मनातील कुकल्पना जावून  तुम्ही नीतिमान व्हाल ,तर तुमच्या रात्रदिवस  ज्या  जनवाराप्रमाणे हजरया घेतात त्या  बंद होतील तर आता अभ्यास करा म्हणजे तुम्ही दयानी व्हाल कुकल्पना करणार नाही. "     

सन १८१३ मध्ये इंग्रजांनी  शिक्षण खुले केले होते. मांगामहारांना मात्र ब्राह्मणांचा जीवघेणा विरोध होता. इंग्रजी अंमल असल्यामुळे जोतीबा शिकू शकलेत. अस्पृश्यांंना शिक्षण घेण्यासाठी ज्या दिव्यातून जावे लागले ते वाचून अंगावर काटा उभा राहतो. इंग्रजी अंमलातच लहानग्या भीमरावने अक्षर गिरवले. ज्ञानाच्या अत्युच्च टोकावर भीमराव पोहचला आणि स्वतेजाने जग दिपवून टाकले. कुणी कुणाला महान बनवित नाही , व्यक्ती स्वकर्तृत्वाने मोठा होतो. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर , बाबासाहेब झालेत ; या नावाने अनेकांच्या लाठ्याकाठ्या, दांडपट्टे , गोलंदाजी, कलमबाजी , पोपटपंची व गांधीगिरी गळून पडली.  बाबासाहेबांनी केवळ महारच नाही तर अखिल अस्पृश्यांच्या भल्यासाठी सनातनी हिंदूशी दोन हात करताना तटस्थ असलेल्या इंग्रजांनाही खडे बोल सुनावले तर स्वतःला मांगाचा भावी पुढारी समजणार्‍या देविदास कांबळेचेही कान उपटले. तसेच अस्पृश्यांचा कट्टर दुश्मन असलेल्या भोपटकरांच्या नेतृत्वात मातंग परिषद घेणाऱ्या के.के.सकटाचा बॅन्ड,  बाबासाहेबांना आपला नेता मानणाऱ्या मातंगांनीच कसा वाजविला ...? ते पुढील भागात पाहू !

- आनंद गायकवाड 


जातिश्रेष्ठत्वाची‌ स्पर्धा ? भाग दोन !

तुमच्या मनातील अभिमान कोणत्या सैताना ने काढून नेला असेल.......? - मुक्ता साळवे ‌‌‌‌‌     


            देशभक्त लाला लजपतराय यांचे घराणे आर्य समाजिस्ट होते. त्यांचे भारतीय क्रांतिकारकांशी जवळचे संबंध होते तर हिंदी राजकारणातही त्यांचे मोठे नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट लालाजींसोबत अमेरिकेत झाली. लालाजींनी बाबासाहेबांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी विनम्रपणे त्यांना नकार देऊन आपले शिक्षण पूर्ण करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. त्यावेळी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पुढे समाजपरिवर्तनाची स्वतंत्र वाट चोखाळावी असे बाबासाहेबांचे मत होते. ही धारणा पक्की व्हायला , अमेरिकेच्या राज्यघटनेत गुलामगिरी प्रथेला मुठमाती देणारी  १४ वी दुरुस्तीची घटना घडणे व पीडित निग्रो समाजाचा तारणहार बुकर टी वाशिंग्टन याचे निधन या घटना कारणीभूत ठरल्या. बाबासाहेब व म. जोतीबा फुले यांच्यात साम्य दर्शविणारी बाब गुलामगिरी या ग्रंथातून जोतीबांनी मांडली. जोतीबा कसरत करायचे, दांडपट्टा व गोळी निशाण मारण्याचे शिकायचे त्यावेळेस " सुधारले भट " त्याना इंग्रजांविरुद्ध दंड थोपटण्यासाठी उकसावित होते. या प्रकारातून जोतीबांनी स्वतःची सोडवणूक करून घेतली. गुलामगिरी मध्ये धोंडिबा जोतीबांना प्रश्न करतो व त्याचे उत्तर जोतीबा देतात. हा संवाद मुळातूनच वाचला पाहिजे. 

धों. : --- तर मग तुम्ही लहानपणी दांडपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरिता करीत होता ? 

जो. :--- आपल्या दयाळू सरकारास पालथे घालण्याकरिता . 

धों. :--- परंतु तुम्ही असली दुष्ट मसलत कोठून शिकला..? 

जो. :--- चार सुधारल्या भट विद्वानांपासून. 
( हा संवाद लांबलचक आहे, जिज्ञासुंनी तो ग्रंथात पाहावा ) या संवादात जोतीबांनी सुधारल्या भटांचे वाभाडे काढले. टॉम्स पेन्स यांच्या ग्रंथांचा हवाला देऊन जोतीबांना इंग्रजांविरुद्ध चिथावण्याचा प्रयत्न भटांनी करून पाहिला. काही दिवस मी तसे वेडेचारही केले ,असे जोतीबा सांगून पुढे म्हणतात ," परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलो तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतींचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला." पुढे जोतीबा म्हणतात " इंग्रज लोकांच्या आणि तसल्या परोपकारी लोकांस म्हणजे आपल्यास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या लोकांस , आपल्या देशातून हाकून देण्याविषयी त्या विद्वानांची मसलत कोणाच्याने घेववेल ? असा कोण मूर्ख आहे की,ज्याच्याने आपल्या तारणाऱ्यावर आपला हात उगारवेल ? परंतु मी तुला सांगतो की, इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहीत, ते आपल्या जन्मास पुरतील म्हणोन कोणाच्याने खास करून सांगवत नाही. यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे , तोच आपण सर्व शुद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे. " इतकी स्पष्ट भूमिका जोतीबांची होती.  सामाजिक समतेच्या बाबतीत टिळकांची भूमिका कचखाऊच नव्हे तर कट्टर धर्माभिमानी होती.  इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंडाचे बोधामृत पाजणारे लोकमान्यपंथी, गुलामीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांच्या जीवनात ( अस्पृश्यच नव्हे तर अखिल शुद्रांच्याही ) जीवनात सुधार व्हावा यासाठी कोणतेच पाऊल उचलत नव्हते म्हणून जोतीबांनी सुधारल्या भटांना नाकारले. १८५७ च्या बंडाला जोतीबांनी भटपांड्याचे व भटनानांचे बंड म्हटले. हे बंड अयशस्वी झाले म्हणून ईश्वराचे आभारही मानले. साहजिक आहे, गाय व डुकराच्या चरबीचे निमित्त करून धर्म बुडाल्याची बोंब ठोकून सशस्त्र उठाव करणाऱ्यांनी ढोराडुकरांपेक्षाही नरकातले जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांकडून काय अपेक्षा ठेवावी ? अस्पृश्यांचा खरा पाठीराखा हा धन्य जोतीबा कसा भटशाहीला चिरंजीव होऊ देणार? महाड आंदोलनात अस्पृश्यांना मरेस्तोवर मारणाऱ्या स्पृश्यांना जेव्हा तुरुंगवासाची‌ शिक्षा झाली तेव्हा बाबासाहेब म्हणालेत " पेशवाई असती तर यांना शिक्षा झाली असती का ? उलट त्यांना निर्दोष सोडल्या गेले  असते व त्यांचा धर्मवीर म्हणून सत्कार झाला असता." आज लोकतंत्र असूनही साध्वी प्रज्ञा ठाकूर व तत्सम धर्मवीरांना सत्ताधारी कशी सन्मानजनक वागणूक देताहेत हे दिसतच आहे.  जर इंग्रजांचे राज्य नसते तर?    
   प्रत्येक आक्रमकांच्या दरबारी ज्यांच्या पूर्वजांनी आपल्या पोटापाण्याच्या सोयी करून घेतल्या, सर, रावबहादूर, दीवान बहादूर सारख्या प्रतिष्ठित पदव्या मिळवल्या, प्रत्येक परकीय सत्तेकडून सोयी सवलती पदरात पाडून आपल्या उद्योगांचे साम्राज्य उभे केले ते देशभक्त व हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्तता करून घेण्यासाठी धडपडणारे ते इंग्रजधार्जिणे ही बनवाबनवी आता चालणार नाही. म्हणून भिमा कोरेगाव घडविणारेही देशभक्तच व इंग्रज सरकारला दयाळू म्हणणारेही देशभक्तच ! वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे आपल्या " मांग महाराचे दुःख " या निबंधात म्हणतात,"हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ! हा जुलुम विस्तराने लिहू लागले तर मला रडू  येते. या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळु  इंग्रज सरकारास इथे पाठविले!"  जो कोणी वीर लहुजींचा आधार घेऊन शुद्रातिशुद्रांच्या संघर्षमय चळवळीला नख लावण्याचा प्रयत्न करेल तो निश्चितच उताणा पडेल. मुक्ता साळवे पुढे काय म्हणतात हे वाचून , पेशवाई म्हणजे केवळ महारांना जाचक पण मांगांना नाही असे म्हणणाऱ्यांची जीभ घश्यातच जाईल....पुढील भागात पाहू..

- आनंद गायकवाड 


जातिश्रेष्ठत्वाची‌ स्पर्धा ?

 जातिश्रेष्ठत्वाची‌ स्पर्धा ?



सद्या महार‌आणि मांगाच्या जातिश्रेष्ठत्वाची‌ स्पर्धा चाललेली दिसते ती दोन्ही जातीगटांना घातक आहे. फार पूर्वी " सोबत " नावाच्या ग. वा. बेहेरे यांच्या नियतकालिकाने  " हा कसला महात्मा " या आशयाचा लेख‌ लिहून म. जोतीबा फुलेंना घाणीचं बोचकं म्हटलं होतं.  त्यावेळेस या लेखाचा प्रतिवाद फुलेंच्या कुळवाडी किंवा कुळंबी या जातीगटाने केला नाही , यासाठी आंबेडकरी माणसांनीच सोबतकारांचा धिक्कार केला होता.  याच सोबत मध्ये विठ्ठल साठे नावाच्या मातंग सद्गृहस्थाने बाबासाहेब व आंबेडकरी चळवळीच्या विरोधात अनेक लेख लिहिले होते.  पुढे याच बेहेरे नावाच्या ब्राह्मण विद्वानाने " झाला बुद्ध महार " नावाचे पुस्तक काढून  हे लेख प्रकाशात आणले होते. त्यात दलित साहित्य म्हणजे महारांचे साहित्य , धर्मांतर ही आंबेडकरांची पर्वताएवढी चूक , बुद्धापेक्षा श्रीकृष्णाचे दर्शनशास्त्र महान आहे , अशा आशयाचे हे लेख होते . प्रश्न असा आहे की, ब्राह्मणी विचारघारा मानणारे लोक सदैव आंबेडकरी माणसांच्या वा विचारधारेच्या विरोधात उभे ठाकतात याचे कारण एकच आहे की , बाबासाहेबांच्या विचाराने भारलेला समाज ब्राह्मणी धर्माच्या प्रतिष्ठापनेच्या आडवा येतो. म्हणून महाराष्ट्रात दलित समाजातील बौद्धानंतर संख्येने मोठा असलेल्या मातंग समाजाला हे ब्राह्मणी धर्माधिकारीं हाती धरून बौद्धांना आव्हान देण्यासाठी वापर करतात. अलिकडे हे प्रकार वाढीस लागले आहेत. बाबासाहेबांच्या काळात काही महार लोकंही बाबासाहेबांना विरोध करायचेत पण असंख्य महारांपुढे ते हतबल व्हायचे. के. के. सकट नावाचा एक मातंग गृहस्थ सदैव बाबासाहेबांवर गरळ ओकायचा. हा माणूस हिंदू महासभेच्या प्रथम कार्यकारिणीचा सदस्य होता. भोपटकरादी प्रभृतिंच्या प्रभावाखाली हा सकट बाबासाहेबांवर टीका करायचा.  अनेक मातंग व चांभार बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले पण हा सकट मरेपर्यंत हिंदू धर्माभिमानी राहिला. असे अनेक सकट आज सुद्धा पहायला मिळत आहेत व अशा सकटांना सोबतकार बेहेरेंसारखे ब्राह्मणवादी संघीय चड्डीवाले समोर करताहेत. बौद्धांना  विरोध करण्यासाठी समांतर व्यक्तिमत्व उभे करावे म्हणून मातंग समाजातील लो.अण्णाभाऊ साठे यांना संघाने पडताळून पाहिले. पण अण्णा हाडाचे कम्युनिष्ट व त्यातल्यात्यात " फकिरा " कादंबरी बाबासाहेबांना त्यांनी अर्पण केलेली. इतकेच नव्हेतर " जग बदल घालूनी घाव , सांगून गेले मला भीमराव "या कवितेने संघाच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले. इथे दोन मुख्य जातीत तेढ निर्माण होत नाही हे पाहून त्यांनी आपला मोर्चा  वस्ताद लहूजी साळवेंकडे वळविला.या संघियांनी जय लहूचा नारा जन्मास घातला. हे लहूजी कोण होते ? लहुजी हे राघोजींचे पुत्र. हे राघोजी पेशव्यांच्या बाजूने लढल्याचे सांगितले जाते. त्याच काळात राघोजीच्या इतकाच जवामर्द #सिदनाक पेशव्यांच्या बाजूने पठानांच्या विरुद्ध लढला. त्याच्या कर्तबगारीचे बक्षीस म्हणून माधवराव पेशव्यांनी कळंबी हे गाव सिदनाकाला पुरस्कारादाखल दिले. यानंतर पेशवा व ब्राह्मणशाहीने जे केले त्याचा आलेख लोकहितवादी गोपाळ देशमुख व न्यायमुर्ती रानडे  यांनी आपल्या ग्रंथात कोरला.  #१_जानेवारी_ १८१८ रोजी ५०० महार व काही मांग सैनिकांनी पेशवाईचा खात्मा केला. या लढ्यात लहुजी साळवे यांचे पुर्वज धारातिर्थी पडले त्याचा राग लहुजींना होता म्हणून ते ब्रिटीशांच्या विरोधात होते. व त्यांनी तालीमखाना उभा करून क्रांतिकारक लो. टिळक , सावरकर , चाफेकर आदींना प्रेरित केले असे अलीकडे काही " लहुवादी " लोकं बोलताहेत. पण या तालीमखान्यात कसरत करणारे  सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतीबा फुले या तालीमखान्यातील षडयंत्राचा पर्दाफाश करतात. तो कसा....हे पुढील भागात पाहू !

- आनंद गायकवाड 


सोमवार, ५ जून, २०२३

एखादा प्रोफेसर लास्की या नेत्यांना चळवळ समजून सांगेल काय ?

एखादा प्रोफेसर लास्की या नेत्यांना चळवळ समजून सांगेल काय ?


आंबेडकर भवन पाडण्यास रामदास आठवले , राजेंद्र गवई , सुलेखा कुंभारे आणि जोगेंद्र कवाडे हे अनुकूल होते हे रत्नाकर गायकवाड यांनी सांगितले . हे ऐकून धक्काच बसला . जेव्हा चळवळ आणि पोटभरू अधिकारी यांच्यात लढाई सुरू होते तेव्हा चळवळीतल्या आठवले , कवाडे , कुंभारे आणि गवई यांनी चळवळीची बाजू घेतली पाहिजे पण हे राजकारणी फार विरुद्ध वागताहेत, अश्या प्रसंगी या आंदोलकांनी जनभावनेची कदर करून आणि लोकशाहीला सशक्त करण्यासाठी आपापले मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवून या फ्लॅशमारू अधिकाऱ्यांना धारेवर धरणे गरजेचे असतांना हे तकलादू नेते चळवळीच्या विरोधात गेले हा त्यांच्या बेअकली आणि मूर्खपणाचा पुरावा आहे . या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार मला महत्वाचे वाटतात , बाबासाहेब लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी म्हणतात ", दुसरे एक उदाहरण मी देतो . आठव्या एडवर्डची कहाणी तुम्हाला माहीत असेल . गोलमेज परिषदेसाठी मी लंडनला गेलो होतो . राजाने त्याला हव्या असलेल्या स्त्रीशी लग्न करावे की नाही , आणि त्याने तसे लोकमताच्या व ठरलेल्या संकेतांच्या विरुद्ध जाऊन लग्न केल्यास त्याला सिंहासनावर ठेवायचे की नाही या प्रश्नावर त्या देशात त्यावेळी मोठे रण माजले होते . लग्नाच्या बाबतीतील हे एवढे वैयक्तिक स्वातंत्र्यही द्यायचे की नाही ? हाही प्रश्न उपस्थित झाला होता. मि. बाल्डविन [ त्यावेळेचे हुजूर पक्षीय पंतप्रधान ] अर्थातच राजाच्या ह्या लग्नाविरुद्ध होते . तो राजाला म्हणत होता , तू जर माझे ऐकले नाहीस तर तुला राजपद सोडावे लागेल . " मि. चर्चिल हे राजा एडवर्डचे मित्र होते व त्याच्या पाठीशी उभे राहण्यास तयार होते . लेबर पार्टी [ मजूर पक्ष ] विरोधी पक्ष म्हणून त्यावेळी होता . मला पक्के आठवते की हुजूर पक्षातील ह्या प्रश्नावरील फाटाफुटीचा फायदा उचलून बाल्डविनचा पराजय करायचा की नाही या बद्दल मजूर पक्षात विचार चालू होता कारण हुजूर पक्षातील कित्येक सभासद राजनिष्ठेमुळे एड्वर्डची बाजू घेण्यास तयार होते . त्यावेळी प्रोफेसर लास्की [ मजूर पक्ष ] ' हेराल्ड ' या नियतकालिकांत लेखामागून लेख लिहून मजूर पक्षाने तसे करू नये म्हणून बजावीत होते, अशा हालचालींचा निषेध करीत होते . ते म्हणत होते , " आपण घटनात्मक संकेताने एक गोष्ट मान्य केली आहे की , पंतप्रधानांचा सल्ला राजा मानील , आणि त्याने तसा तो न मानल्यास पंतप्रधान राजाला घालवून देऊ शकेल. हा असा संकेत असल्याने, ज्यायोगे राजाचे अधिकारक्षेत्र वाढेल अशी वर्तणूक करून या प्रश्नावर बाल्डविनचा पराजय करणे चुकीचे ठरेल . " मजूर पक्षाने हा सल्ला मानला . संकेत खिलाडू वृत्तीने पाळलेच पाहिजेत असे त्यांनी ठरविले. इंग्लंडचा इतिहास वाचताना अशी कित्येक उदाहरणे तुम्हाला आढळतील की, जेथे तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकास, मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधीपक्ष म्हणून काम करीत असोत, कैचीत पकडण्याचे प्रसंग संविधानाची [ घटनेची ] व लोकशाहीची हानी होऊ नये म्हणून कटाक्षाने टाळले आहेत . " 

---- यावरून असे दिसते किती जेव्हा न्यायाची बाजू व चळवळीच्या सशक्ततेची भूमिका घेतांना तकलादू नोकरशाही हावी होतांना दिसते तेव्हा रामदास आणि समस्त कवाडे, गवई कंपूंनी बाळासाहेब आंबेडकरांची बाजू घेतली पाहिजे अन्यथा उद्या हीच पाळी त्यांच्यावर येऊ शकते. तेव्हा त्यांना हीच नोकरशहा चमको मंडळी त्रास देऊ शकते हे या राजकीय मुखंडांनी लक्षात घेणे गरजेचे आहे , सत्याच्यासाठी यांनी आपले फडतूस राजकारण बाजूला ठेवावे . आणि लोकशाहीसाठी व चळवळीसाठी बाळासाहेबांना समर्थन द्यावे हीच समृद्ध आंबेडकरी चळवळीची वर्तमानातील विजयाची नांदी ठरेल, एखादा प्रोफेसर लास्की या नेत्यांना चळवळ समजून सांगेल काय ????

केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला ?

 

केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला ?


महाराष्ट्रातील केवळ महार लोकांनीच बुद्ध धम्म स्वीकारला असा अनेकांचा गैरसमज आहे . मोठ्या प्रमाणात नसेलही पण, अनुसूचित जातींच्या ५९ जातीगटापैकी तब्बल ५३ जातीगटांनी बुद्धधम्म स्वीकारला आहे . हे २०११ ची जनगणना सांगते .  महाराष्ट्रात अनुसूचित जातींची विविध धर्मातील एकूण लोकसंख्या १ कोटी ३२ लाख ७५ हजार ८९८ आहे . यात हिंदू [ अजा ] ८० लाख ६० हजार १३० , शीख [ अजा ] ११ हजार ४८४ आणि बौद्ध [ अजा ] ५२ लाख ४ हजार २६४ एवढी आहे .
यातील जाती अश्या ज्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला आहे , आणि त्यापुढील संख्या धम्मदीक्षा घेणाऱ्यांची आहे.

➡ २०११ ची जनगणना सैर करताना मी कर्नाटकात घुसलो . तिथे अनुसूचित जाती १ कोटी ४ लाख ७४ हजार ९९२ आहेत . त्यापैकी १ कोटी ४ लाख १८ हजार ९८९ हिंदू आहेत , शीख २१०० तर बौद्ध ५३ हजार ९०३ आहेत . इथे महार , तराळ , धेगुमेगु ६६ हजार ६८ आहेत . पण यापैकी केवळ ५ हजार ७०१ बौद्ध आहेत तर हिंदू [ ज्यांनी बौद्ध नोंदविले नाही ते ] ६० हजार ३४८ असून शीख फक १९ आहेत . माझ्यासाठी धक्कादायक बाब अशी की , इथे सर्वाधिक धम्म स्वीकारणारी जात महार नसून , होलया , होलेर , होलेया ही आहे . यांची संख्या ७ लाख ९२ हजार ७८५ असून हिंदू ७ लाख ५५ हजार २६६ , शीख १६१ आणि बौद्ध ३७ हजार ३५८ आहे . आदी कर्नाटका या जातीच्या २ हजार ३४९ लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला . आदी द्रविडा २८७ / भोवी ओड , ओद्डे , वड्डर २१९ तर जेनेरिक जाती ४०६४ बौद्ध आहेत.

➡ गुजरात मध्येही महार , तराळ , धेगुमेगु ही जात आहे . ती २८ हजार ४१७ असून हिंदू [ बौद्ध न नोंदविलेली ] २० हजार ६८२ आहे , शीख १०८ तर बौद्ध ७ हजार ६२७ आहे . इथे भाम्बी , भाम्भी व चमार ह्या जातीगटातील १०२४ लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

➡ पश्चिम बंगाल मध्ये महार ही जात आहे . ३४ हजार ७९३ पैकी हिंदू [ ज्यांनी बौद्ध नोंदविले नाही ते ] ३४ हजार ४५५ , शीख १७ तर बौद्ध केवळ ३२१ आहे . नामशुद्र ही सर्वात मोठी जात असून ३५ लाख ४ हजार ६४२ आहे . त्यात फक्त ३१० बौद्ध आहेत.

 ➡ गोवा राज्यात सुद्धा महार आहेत , त्यांची एकूण संख्या १२ हजार ८१८ आहे त्यापैकी १२ हजार ६७७ हिंदू असून बौद्ध केवळ १४० नोंदलेले आहेत.

➡ मध्य प्रदेशात एकूण १ लाख ९९ हजार ४२६ बौद्धांपैकी महार , मेहरा व मेहर या जातीतून आलेले १ लाख ६० हजार ६२२ लोक आहेत . त्याबरोबर चमार , चमारी या जातीगटातील २८ हजार २५६ / डोहोर मधून ३ हजार ७०९ , बलाही , बलाई २९५ / भंगी, मेहतर, बाल्मिकी २९२ / खनगर , कनेरा , मिर्धा १२५ / मांग , मांग गारोडी ३१३ / पासी ५७ / कोली , कोरी ३१० / डोम , डूमार ८४ / बसोर , बुरुड , बंसोर ८४ , बरहर , बसोड ७१ / होलीया ९१ / कटिया , पठारीया ९९ व जेनेरिक जाती ४६६८ आदी बौद्ध आहेत.

➡ पंजाबात आदी धर्मी १८ हजार ७७८ / बाल्मिकी , चुहडा १५८८ / मझबी , मजहबी शीख १६० हे बौद्ध आहेत . कबीरपंथी , जुलाहा ३९ / कोरी . कोली २२ / डुम्मा , महाशा , डुर २७ / बाजीगर ३९ / खाटिक १० / बौरिया बावरिया १० / पासी १८ / सांसी , भेडकुल १८ / महत्तम , राय सिख ६० इत्यादी बौद्ध आहेत.

➡ आंध्र प्रदेशात महार ३६ हजार २३८ आहेत त्यापैकी ११ हजार २६० जणांची बौद्ध म्हणून नोंद आहे . त्यापेक्षा माला या जातीतून १२ हजार ७२९ बौद्ध झालेत , माले साले , नेटकनी ४६८ / मादिगा १००३ / मांग ९७ / मेहतर ५३ बौद्ध आहेत.
ती माणसे मूर्ख आहेत जी समजतात केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला.


क्रूरकर्माच संत म्हणून मिरवतायेत या बुद्धाच्या देशात.

क्रूरकर्माच संत म्हणून मिरवतायेत या बुद्धाच्या देशात.


- आनंद गायकवाड


------------------------------------------------------------------------

ही दिशा कोण आहे ? अस्पृश्यांच्या जगण्याशी समांतर असलेले जीवन जगणे वाट्याला आलेल्या एका उपेक्षित समाजाचा घटक असलेली पण मी जन्मतः स्वतंत्र आहे असा उदघोष करणारी बंडखोर दिशा एक हिजडा आहे. हिजडा असणे हे दिशासाठी गौरवास्पद आहे. लिंगाधारित भेद नाकारून माणसाला माणूस म्हणून पाहणारा आणि घातक रुढी परंपरेच्या चौकटी तोडून वेगळी वाट चोखाळणारा व्यक्ती हिजडा (हिज़रा ) असतो, हे ती ठामपणे सांगते. यासाठी अरबी शब्दार्थांचा आधार ती घेते.

--------------------------------------------------------------------------

               १९३५, " मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथील परिषदेत केली. कोट्यवधी माणसांची माणुसकी हिरावून घेणाऱ्या धर्माला मूठमाती देण्याची घोषणा १४ ऑक्टोबर १९५६ ला मूर्त स्वरूपात साकार झाली. युगानुयुगे पायदळी तुडवलेला समाज येवला मुक्कामी निकराची लढाई लढण्यास सज्ज होतो, त्या भूमीतील माती किती बंडखोर असेल ? ही बंडखोरी तमाम शोषितांच्या रक्तातून उसळ्या मारू लागली. ही क्रांतिकारक घोषणा पददलित माणसांच्या दास्यत्वाच्या शृंखला तोडून त्याला नवजीवन प्रदान करणारी ठरली. नवचैतन्याचे वारे गलितगात्र समाजातून वाहू लागले. ही येवल्याची माती समाजव्यवस्थेतेने अस्पृश्य ठरविलेल्या माणसांना स्वाभिमानाचे आकाश खुले करून गेली. या आकाशात धर्म,रुढी, परंपरा, कर्मकांड व भेदाभेदाने सतावलेले पक्षी मुक्तपणे विहार करू लागले. कोणत्याही भेदाभेदांच्या सीमा असो, त्या तोडण्याची प्रेरणा येवल्याच्या बंडखोर मातीने दिली ही प्रेरणा आपल्या ललाटावर लेवून अनेक शोषितांपैकी एक ' दिशा ' बोलू लागली. तिचेही शोषण हजारो वर्षांपासून होतेय. शोषणाच्या वरवंट्याखाली ती क्षणाक्षणाला चिरडल्या गेली. येवल्याच्या मातीतली बंडखोरी आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ती पुन्हा जन्माला आली. म्हणून ती म्हणते ,

 " उमेदीच्या पहाटे साठी ,
स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी
परत ती नव्याने जन्माला आली
पण आता ती सहस्रावधी वर्षाच्या
या शोषणाच्या यज्ञात
आहुती द्यायला नकार देते."

ही दिशा कोण आहे ? अस्पृश्यांच्या जगण्याशी समांतर असलेले जीवन जगणे वाट्याला आलेल्या एका उपेक्षित समाजाचा घटक असलेली पण मी जन्मतः स्वतंत्र आहे असा उदघोष करणारी बंडखोर दिशा एक हिजडा आहे. हिजडा असणे हे दिशासाठी गौरवास्पद आहे. लिंगाधारित भेद नाकारून माणसाला माणूस म्हणून पाहणारा आणि घातक रुढी परंपरेच्या चौकटी तोडून वेगळी वाट चोखाळणारा व्यक्ती हिजडा (हिज़रा ) असतो, हे ती ठामपणे सांगते. यासाठी अरबी शब्दार्थांचा आधार ती घेते. समाजात ज्यांची ओळख भटक्या म्हणून आहे त्या समूहात येवला येथे जन्मलेली दिशा आज आपल्या कविता आणि समाजकार्याच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनासाठी सिद्ध झालेली आहे. दिशा पिंकी शेख हे तिचे धर्मनिरपेक्ष नाव.

     दिशाचा गुरू एक मुस्लिम व्यक्ती , त्यांचाही गुरू मुसलमानच म्हणून दिशा शेख बनली. कुटुंब आणि समाजाने तिला समजून घेतलं नाही. समाजमान्य तकलादू संकेतांचे कुंपण तोडून गुरू-शिष्यांची परंपरा असलेल्या परिवारात ती दाखल झाली. ही एकलव्याचा अंगठा मागणारी गुरू परंपरा नव्हे तर हरेक क्षणी ठामपणे शिष्याच्या पाठीशी उभी राहणारी बंडखोर जमात आहे. दिशाने इथेच वैचारिक उंची गाठली. अभ्यास , चिंतन , मननाने दिशाला बुद्ध बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली आणून ठेवले. तिथे नवी दृष्टी गवसली. मनुवादाने , भांडवलशाहीने वा पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीचे केलेले शोषण, या सर्वांचा ती ताकदीने विरोध करते. अन्याय सहन करणे व अन्याय करणे या दोन्ही बाबींचा ती खरपूस समाचार घेते. ती म्हणते,

" मी शोषण सहन करणारी बाई नाही, शोषण करणारा पुरुष नाही आणि मी या सर्व शोषणकर्त्या वा करवित्यांच्या छातीवर पाय ठेवून स्वतःचे अस्तित्व उभे करणारा हिजडा आहे."

दिशाची कविता समाजव्यवस्थेतील कुरुपता अधोरेखित करते. ज्या समाजाने दिशाच्या परिवाराचे जगणे कुरूप म्हणून निश्चित केले त्या बेगडी समाजाच्या पुढ्यात काही प्रश्न ठेवते. त्या समाजाचा दोगलेपणा, ढोंग आणि विकार ती उघड करते. तिचा कुरूप नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध होत आहे. कुरूप या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक, जे सुंदरतेच्या विरुद्ध आहे. दुसरा, जी जखम सुकून गेली पण दुरुस्त झाली नाही, जखमेतील ठसठस अजूनही बाकी आहे व ती क्षणाक्षणाला उमळत असते.. याला हिंदीत नासूर असा समानार्थी शब्द आहे. धर्म, वर्ग,जात, लिंगाच्या आधारावर या देशात भेदभाव केला जातो, किंबहुना एका समूहाचे शोषण केले जाते. ही शोषणाची कुरुपस्थळं आणि सौंदर्याचा आव आणणारी व्यवस्थेची कुरूपता यावर दिशाच्या कविता प्रकाश टाकतात. दिशाला हिजडा या अल्पसंख्याकांच्या जीवनातील कुरूपताही अस्वस्थ करीत असली तरी ती वर्तमानातील बलदंड व साधनसंपन्न वर्गाची मुजोरी आणि साधनवंचितांची हतबलता यातील द्वंद्व प्रकाशित करते. दिशाची कविता सर्वहारा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या पिळल्या गेलेल्या तमाम दुःखितांच्या वेदना तिला स्व-वेदना वाटतात. कठुआ - उन्नाव मध्ये बलात्कारात बळी पडलेली चिमुरडी आसिफा, संस्थात्मक पातळीवर बळी गेलेला रोहित वेमुला, खैरलांजी मधील उद्ध्वस्त भैयालाल, फासावर लटकलेला गरीब शेतकरी, मुलतत्ववाद्यांच्या श्रीरामी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले अस्पृश्यतेचे जीवन जगणारे घटक, भांडवलशाहीने दुषित केलेले पर्यावरण, कुपोषण आणि धर्मांधांकडून मारल्या गेलेला निर्भीड पत्रकार यातील समान संवेदना दिशाची कविता व्यापून आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या समस्त घटना विविध ठिकाणी घडल्या तरी त्या समान दुःखाने रूपकात्मक गुंफल्या जाऊन त्याची माळ तयार झाली आहे. पण ही माळ गळ्यात घालून मिरवण्यासाठी नव्हे हे कवयित्री जाणून आहे. म्हणून ती स्वतःसह समाजमाध्यमांवर कविता घासणाऱ्या स्थितप्रज्ञांना आडव्या हाताने घेते. ती दलाल माध्यमं व चाळीस पैसेवाल्या अंधभक्तांनाही ठोकून काढते. हे सगळं विपरीत घडत असताना मन की बात करणाऱ्यांना लोकांचे मन कसे कळत नाही आणि लोकंही अशा मिजासखोरांवर हल्लाबोल का करीत नाही असा सवाल दिशाच्या कवितेतून ध्वनित होतो. म्हणून तिची कविता आणि हक्काची लढाई अधुरी राहते. ही अर्धवट कविता एका संपूर्ण क्रातीची पृष्ठभूमी तयार करते, शोषितांच्या समस्त प्रस्तराला जोडते आणि ऐक्याची हाळी देऊन शोषकवर्गाविरुद्ध शोषितांना संगरासाठी रणभूमीवर उभं करते, पुढील आक्रमणासाठी ! पाहुयात ही काळजात घुसणारी दिशाची कविता, अगदी सोप्या भाषेत.....!


कविता


असिफा उन्नाव मध्ये न्यायासाठी कोर्टाच्या चकरा मारत असताना ट्रक खाली चिरडल्या गेली,

तिला वाचवता वाचवता माझा बाप भैय्यालाल भोतमांगे

कोर्टाच्या पायरीवरच मेला,

त्याचं प्रेत उचलायला खांदेकरी सापडत न्हवते कारण तो अस्पृश्य होता,

मग त्याचं मढं माझ्याच एका नातलगानं सायकलवर काही कोस नेलं,

वाटेत जातीव्यवस्थेनं बांधलेला डिजिटल पूल बाटु नये म्हणून त्या माझ्या मढं वाहणाऱ्या नातलगाला अडवण्यात आलं,

कसंतरी मढं एका गटारी शेजारी जाळून तो जेव्हा घराकडं फिरला, काही देशभक्तीचा वारसा सांगणाऱ्या भक्तांनी त्याला घेरला

'जय श्रीराम' म्हणायला लावून

चिंधड्या चिंधड्या करून मारला,

बातमी करायला गेलेल्या पत्रकाराला घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या, 

त्याच्या मृत्यूकडे पाहून बाकीच्यांनी समोर टाकलेली पाकीटं उचलली 

आणि दिवसभर लोकांना 'मन कि बात' सांगितली,

मग विकास होतोय या भ्रमात लोकं राहू लागले

पण, 

माझा भाऊ रोहित बंडखोर होता

त्याला शिकायचं होतं, 

खोट्या रूढी परंपरांचं ओझं नाकारायचं होतं,

आमच्या समोर ताठ मान करून चालतोय म्हणून त्याला छळण्यात आलं,

एव्हडे केले त्याचे हाल कि त्यानं मरण कवटाळलं,

त्याचं प्रेत विद्यापीठाच्या पायात पुरण्यात आलं,

तेव्हा कळलं एकलव्यापासून सगळे रोहित असेच मेले,

माझी माय गेलती त्याला शोधायला अजून घरी वापस नाही आली.

शेतकरी दादा सांगत होते, 

सत्य शोधणारे, प्रश्न विचारणारे, आणि कष्ट करणारे या देशात फासावर लटकावून मारले जातात,

उरलेले भुकेने मरतात.

त्यातलाच एक लहान मुलगा सरकारी दवाखान्यात ऍडमिट केला,

बिचारा तो कुपोषित मुलगा

आपल्या सारख्याच हजारो भावंडासह औषध पाण्यावाचून तडफडून मेला.

हजारो आकडा लहान होता 

म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी मनातली सल घालवण्यासाठी,

त्यांच्या सोयीने गंगेचा विशिष्ट कप्पा फिल्टर करून गंगास्नान केले.

बाकीच्या गंगेत आजही मोक्षाच्या नावावर मढे,

विकासाच्या नावावर कंपन्यांच्या केमिकलचे झरे सोडण्यात आलेत.

भांडवलदारांच्या मलमूत्राचे तीर्थ लाखो भक्त पितात या देशात श्रद्धेने आणि आणतात भरून कलशात पूजेसाठी.

शिक्षणाच्या बाजारात निजवली जातेय गरिबी राजरोस आणि 

तिच्या दलालीवर शिक्षण सम्राट कमवतायत भरघोस.

दलालांच्या टोळ्या भाड खाण्यासाठी लेकीबाळीच्या टिरिवर पोलिसांनी मारलेल्या दांड्यांचंही समर्थन करतायेत,

इथे कितीतरी रोज पत्करतात गुलामी आता काहीच होऊ शकणार नाही म्हणून,

आणि जिवंतपणीच मरतायेत..

क्रूरकर्माच संत म्हणून मिरवतायेत या बुद्धाच्या देशात,

इथे कसायांनी दुकानं लावलीयेत रखवालदाराच्या वेशात,

मी नेभळट फेसबुकवर कविता लिहितेय विभत्स, क्रूर, अवहेलनेने भरलेले व्हिडिओ शेअर करतेय,

किंवा चालवते हॅश टॅग एखादा,

हॅश टॅग वरून एक आठवलं बघा,

सो कॉल्ड पुरोगामी सुद्धा चालवतायेत माझ्या बचावाचे, समर्थनाचे हॅश टॅग,

त्यांच्या नावातील,जातीतील सरंजामीच लेबल कायम ठेवत, 

सेक्युलर इझमचं समर्थन करत..

काही बिचारे ४० पैशे एका खेपेवर आहेत खुश,

त्यांच्यातले आणि काही माझ्यातलेही.

माझ्या बापाच्या नावाचा वापर निरोधासारखा करतात,

आणि क्रांतीचे शुक्राणु शोषितांच्या गर्भात जाण्याऐवजी टाकतात कचरा कुंडीत,

स्वतःसकट समाजालाही कुजवून मारतात उतरंडीत, वाड्यावर मुजरा करणारे देशभक्ती, गरिबी, विषमता यांच्या विरोधात गातात, 

स्वतःच्या जातीवर आलं की लोकांच्या तोंडात देतात मुताने भरलेल्या धरणातील

पाण्याची गुळणी,

माझ्यातले काही त्यातही आयोडीन शोधतात.

आणि माझ्यासारखे हतबल करतात कविता उबळ काढण्यासाठी 

बहुतेक ह्या निराशेची, ह्या शोषणाची शेवटची ओळ मी लिहू शकणार नाही म्हणून माझी ही कविता अर्धवट सोडत आहे.


- दिशा पिंकी शेख...

चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो !

चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, 
तूच मूर्त रूप हो !

- आनंद गायकवाड 


भारतीय संस्कृतीत विविध तत्त्वज्ञान पाहायला मिळतात. कधीकाळी श्रमण आणि ब्राह्मण परंपरा सामंजस्याने सोबत चालताना तर कधी एकमेकांशी भिडताना दिसतात. ब्राह्मणी अध्यात्मातील ईश्वरवाद व नास्तिक मतानुकूल निरीश्वरवाद असे दोन प्रवाह भारतीय भूमीत रूजलेले दिसून पडतात. साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः काव्य व गीतांच्या बाबतीत मात्र ईश्वरवादी लेखन अत्याधिक झालेले आहे. फिल्मी व गैर फिल्मी गीतांचा विचार केला तर ईश्र्वराच्या नानाविध रूपांना साकडे घातलेले दिसेल. ईश्वर, प्रभू, मालिक, दाता, भगवान, देव, अल्ला, खुदा ,रब यांना काही मागण्यासाठी केलेली याचना गीतांमध्ये आहे. केवळ बुद्धगीतेच तेवढी निरीश्वरवादी समूहात मोडतील. 

बृहदारण्यकोपनिषद् मध्ये एक प्रार्थना आहे.

असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय ।

  अर्थात मला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल। मला अन्धाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल। मला मृत्यू कडून अमरत्वाकडे घेऊन चल॥.... " तू माझ्यासाठी हे कर " अशी याचना या मंत्रात आहे.

        ही प्रार्थना अनेक गीतांची प्रेरणा व आधार आहे. भरत व्यास रचित " ऐ मालिक तेरे बन्दे हम, ऐसे हों हमारे करम नेकी पर चलें और बदी से टलें ताकि हंसते हुए निकले दम " हे गीत एकेकाळी फार लोकप्रिय होते. यात " जब जुल्मों का हो सामना तब तू ही हमें थामना वो बुराई करे हम भलाई भरें , नहीं बदले की हो कामना , बढ़ उठे प्यार का हर कदम और मिटे बैर का ये भरम ".... तब तू ही हमे थामना , असे साकडे ईश्वराला घातले आहे. 

साहीर लुधियानवीचे हमदोनो मधील एक गाजलेले प्रार्थना गीत " अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान " यात 'भगवान व दाता' ला याचना केली आहे.

हिंदी कवींमध्ये मला गुलज़ार फार आवडतो, त्यांच्या काव्यात फार खोली असते. पुरोगामित्वाशी त्यांच्या कवितेची नाळ जुळलेली आहे. गुड्डी चित्रपटातील त्यांचे एक गीत " हम को मन की शक्ति देना मन विजय करें दूसरों की जय से पहले खुद को जय करें " शाळेच्या पार्श्र्वभूमीवर हे प्रार्थना गीत चित्रीत केले आहे. " इतनी शक्ती हमे देना दाता " अंकुश मधील अभिलाष यांच्या गीताची इथे आठवण येते. या गीतात कुण्यातरी अदृश्य शक्तीला साद घातलेली आहे.

" मुश्किलें पड़ें तो हम पे इतना कर्म कर साथ दे तो धर्म का, चलें तो धर्म पर खुद पे हौसला रहे, बदी से ना डरें " 

  मराठीतही ईश्र्वराला साकडे घालणाऱ्या अनेक कविता व फिल्मी - गैर फिल्मी गीते आहेत. वंदना विटनकरांचे " शोधिसी मानवा राउळी मंदिरी , नांदतो देव हा आपुल्या अंतरी" हे गीत अत्यंत लोकप्रिय झाले. ईश्र्वराचे अस्तित्व मान्य करूनही देवळात देव नसतो व पुजा अर्चना करून देव मिळत नाही, निसर्गाची विविध रूपे हेच ईश्वरीआहेत अशी काहीशी सुधारवादी झलक या गीतात पाहायला मिळते.  

      हिंदीत अत्यंत गाजलेले एक बुद्ध गीत आहे. भरत व्यास यांनी हे गीत अंगुलीमाल चित्रपटासाठी लिहीले होते. " घबराए जब मन अनमोल और हृदय हो डाँवाडोल तब मानव तू मुख से बोल बुद्धम सरणम गच्छामी."

केवळ नामोच्चार केल्याने दुःखमुक्ती होत नाही. या गीताच्या मुखड्यात नामाचे महात्म्य दिसत असले तरी या गीताचा सार बुद्ववचनांवरच बेतलेला आहे. 

" दूर किया जिस ने जन-जन के व्याकुल मन का अंधियारा
जिसकी एक किरण को छूकर चमक उठा ये जग सारा " 

बुद्धाने आपल्या ज्ञानांमृताने दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला असे ध्वनित करून गीत सत्यकथन करते.

" दीप सत्य का सदा जले, दया अहिंसा सदा फले
सुख शांति की छाया में, जन-गन-मन का प्रेम पले
भारत के भगवान बुद्ध का, गूंजे घर-घर मंत्र अमोल.
हे मानव नित मुख से बोल, बुद्धम सरणम गच्छामी."

    बुद्धगीते हिंदी पेक्षा मराठी भाषेत अधिक आलीत. 

एक अंगुलीमाल सोडला तर हिंदी चित्रपटांनी बुद्ध गितांकडे पाठच फिरविली. मराठी हलाहल मध्ये प्रभाकर रचित " वंदन करूया शांतीदूताला " हे गीत स्वरबद्ध करण्यात आले. मात्र गैर फिल्मी असंख्य बुद्ध गीते म्हटल्या गेलीत. वामनदादा कर्डक, उत्तम मुळे ते सुरेश भट, रंगराज लांजेवार यांच्यापर्यंत अनेक गीतकार, कवींनी बुद्धगीते लिहिली. यात स्तुतीपर वंदनगीतांचे प्रमाण जास्त आहे. बुद्धांनी तत्त्वज्ञानातून आचरणाची महती कथन केली आहे. बुद्ध तत्त्वज्ञान सांगणारे व " तमसो मा ज्योतिर्गमय " शी विपरीत मत मांडणारे बुद्धगीत , 

" अत्त दीप भव स्वयंदीप हो, दया धर्म शांतीच्या पथाचा पथिक तुझा तूच हो " मला फार आवडते. गीतांचे बोल व शब्दांचे अलंकरण आशयाच्या आकलनात कुठेच अडथळा निर्माण करीत नाही. अत्यंत कर्णमधूर हे गीत असून मनुष्याने स्वतःच संकटे, दुःखावर मात करण्यासाठी सिद्ध व्हावे यासाठी आवाहन करते. " चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो "........ केवळ ' तूच ' म्हणजे मनुष्य हा या गीताचा केंद्रबिंदू आहे. साजेसे संगीत, उत्तम चाल आणि धीरगंभीर आवाजामुळे हे गीत अत्यंत श्रवणीय झालेलं आहे. हे गीत ऐकल्यावर मनाचा कोपरा न कोपरा शांत होतो, रोमारोमात उर्जा प्रवाहित होते. शांताराम नांदगावकर यांनी हे गीत लिहिले व गायिलेही. शांतारामांनी अनेक मराठी फिल्मी गैर फिल्मी गीते लिहिली. भक्तीगीत असो कि भावगीत त्यांच्या रचना फार लोकप्रिय झाल्यात. मग ' बिलनशी नागीण निघाली ' ' अश्विनी ये ना ' ' चंदेरी वाळूत ' असे अनेक गीतं शांतारामांनी लिहिली. शांताराम कोण जातधर्माचे, त्यांनी काय लिहिले यांचेशी मला काही देणेघेणे नाही. पण " अत्त दीप भव स्वयंदीप हो " लिहून त्यांनी मला प्रभावित केले. याचा अर्थ बुद्धांची इतर गाणी दुय्यम आहेत असे नव्हे !

आज शांताराम नांदगावकर यांचा जन्मदिवस. ते आज हयात नसले तरी गीत रूपाने त्यांचा दीप तेवत आहे. त्यांचे खालील गीत इथे देऊन कवी या नात्याने त्यांना विनम्र अभिवादन करतो...



अत्त-दीप-भव


अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो

दया धर्म शांतीच्या पथाचा, 
पथिक तुझा तूच हो

तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो
कोसळोत वर्षा, उठू दे झंजावात
आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात
धावूदे दिशांना, करुनिया आकांत
पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो
तू स्वयं दीप हो

अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
मानव्य जपाया, हो तू मानव आधी
तेवता जळूदे,आसक्तीची व्याधी
बोधिसत्त्व फुलु दे, तुझिया ओठावरती
निथळू दे तयातून, सिद्धार्थाची नीती
तू कळ्या फुलातील कोमलता हो, सुगंध आनंद हो
तू स्वयं दीप हो

अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो
तू जळणारांचे, हो अवघे सर्वांग
हो हृदय तयांचे, सोड सुखाचा संग
जळताना दे तू, मंत्र जगा जळण्याचा
दु:खाच्या तिमिरा, सदैव संपविण्याचा
चैतन्य अहिंसा सत्य दयेचे, तूच मूर्त रूप हो
तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव,स्वयंदीप हो

---शांताराम नांदगावकर




रविवार, ४ जून, २०२३

 यवतमाळचे मूळ !



  - आनंद गायकवाड


माला या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो हार म्हणजे फुलांचा वगैरे. माळ असा शब्द संस्कृत मध्ये दिसत नाही त्याऐवजी माला असा शब्दप्रयोग केला जातो. मराठी मध्ये माळ असा शब्द आहे. त्याचा अर्थ खडकाळ किंवा नापीक असा भूमीचा उंच व विस्तृत प्रदेश;मैदान;डोंगरमाथा; सपाटी; पठार असा अर्थ होतो. संस्कृत पूर्वी या देशात प्राकृत भाषांचा प्रभाव होता. पाली प्राकृत मध्ये माळ शब्द नसून माला हा शब्द आहे. त्याचा माळा अथवा मजला असा अर्थ आहे. माळ या शब्दाचा अर्थ जंगल किंवा पठार असा केवळ मराठी मध्येच आहे. संस्कृत मध्ये जंगल करिता वन अथवा कानन असे शब्द आहेत. माळ म्हणजे जंगलातील पठारी भाग हा अर्थ मी सांगितलाच आहे फक्त त्याची उत्पत्ती कुठून झाली यावर मी भर दिला. अनेक गावांच्या मागे नगर हा शब्द लागलेला आहे. नगर या शब्दाची उत्पत्ती नाग या गणांच्या लोकांपासून झाली आहे. त्यांनी अनेक गावे बसवली. नाग हे अनार्य होते. तर पूर हा शब्दही अनेक गावांमागे आहे. या शब्दाचा थेट संबंध अनार्य संस्कृतीशी येतो. आदिवासी गणांचा अभ्यास केला तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. जंगल आणि डोंगरी भागात आदिवासी लोकांशिवाय आणखी कोणत्या जमाती वास करायच्या ? गोंड पासून गण या शब्दाची निर्मिती आहे.मराठी पूर्वी गोंडी बोलीभाषा गोंडवाना भागात बोलली जायची तसेच विदर्भ, छत्तीसगढ,मध्यप्रदेश इथे मोठ्या प्रमाणात गोंड समाज ही भाषा बोलतो. त्यांची स्वतंत्र लिपी सुद्धा आहे.पण कालौघात ती मागे पडली. जिथे जिथे गोंड आदिवासी समाज राहतो तिथे तिथे गोंडी बोली बोलल्या जायची. माळ या शब्दाचा उगमच गोंडी भाषेतून झालेला दिसतो.गोंडीत मरा, मळा, मडा, माड असे शब्द आहेत. त्यांचा अर्थ वृक्ष असा होतो.गोंडीच नव्हे तर सर्व आदिवासी समाज वृक्षाला देवतूल्य मानतो. वृक्षांपासून जंगल हा अर्थ ध्वनित होतो. अबुझमाड(नारायणपूर,छत्तीसगढ+महाराष्ट्र +आंध्रप्रदेश) हे नाव आपण ऐकले असेल. अगदी तसेच यवतमाळ हे नाव.माळ याचा अर्थ आपण मराठी वा गोंडीतून समजून घेतल्यावर प्रश्न उरतो तो "यवत" या शब्दाचा. असा शब्द मराठीत नाही. यावत याचा अर्थ जेवढा तेवढा असा होतो. उदा. यच्चयावत.       यव असा शब्द मराठीत नाही. यंवत्यंव असं आपण बोलतो म्हणजे असेतसे पण यानेही यवतमाळचा अर्थबोध होत नाही. प्रत्येक गावाच्या नावाला अर्थ असतो.जर ते गाव फार प्राचीन वा मध्ययुगीन काळातील असेल तर निश्चितच अर्थ आहे. यवन असा एक शब्द आहे ज्याचा अर्थ सरस्वती कोशात ग्रीक, मुसलमान किंवा अनार्य असा दिलेला आहे. पण यवन मुळे यवतमाळ हे नाव आकाराला आले नसावे, असे वाटते. यवतमाळ हा जिल्हा आदिवासी जमातींचा जिल्हा आहे. यवतमाळच्या ( आजच्या शहरी भागात ) या जंगली भागात पूर्वी गोंड व इतर आदिवासी मोठ्या प्रमाणात असतील. गोंडांना कुयव, कुयवत, कोई,कोया, कोईतूर या शब्दाने ओळखले जाते. कुयव गोंडाचा उल्लेख ऋग्वेद या प्राचीन ग्रंथामध्ये आलेला आहे.

शुष्णं पिप्रुं कुयवं वृत्रं इंद्र यदावधी विपुरः शंबरस्य । तन्नोमित्रो वरूणोमास हन्तामदिति : सिंधू पृथिवी उत द्यौ ।। ( ऋग्वेद ऋचा १/१०३/८)

हे इन्द्रा । शुष्ण,पित्रु(विपु),कुयव,वृत्र इत्यादींचा वध करून शंबराची गढयुक्त नगरे उद्ध्वस्त केली तेव्हा आमची प्रार्थना सफल झाली. मित्र ,वरूण,अदिती, समुद्र,धरा व क्षितिज आमच्या प्रार्थनेचे अनुमोदन करावे. या ऋचेतील शंबर हा गोंडांचा आद्यदेव यालाच आदिवासी शंभू ,शंभो,शंभूशेक, बडादेव, महादेव म्हणतात. कुयव, कोया, कोई, कोईतूर ही गोंडांचीच संबोधने होत. ऋग्वेदात कुयव हा शब्द अनेकदा आला आहे. हे यासाठी मी सांगतो की,कोईतूर अथवा कुयवत + माळ मिळून कुयवतमाळ झालेला आहे. काही काळानंतर पहिले अक्षर लोप पावले असावे त्यामुळे यवतमाळ हेच नाव रूढ झाले असावे. अर्थ होतो गोंडांचे जंगल. तसे माळ हा शब्द गोंडी भाषेत विपूल प्रमाणात आहे. या शब्दाचे अंत्यप्रत्यय लावून गोंडीतील क्रियापदे तयार होतात. मराठी भाषेवरही गोंडीचा फार प्रभाव आहे. पाल्हाळ/ हुकमाळ/वामाळ/आमाळ/लेस्कमाळ /उस्कमाळ/वारमाळ/उममाळ/नांदमाळ/उचमाळ/ताडकमाळ/दलिमाळ/बोळस्माळ/मुहुचमाळ/जकमाळ/तारमाळ/अस्कमाळ/ वारमाळ/करीदमाळ इत्यादी अनेक क्रियापदे गोंडीत आहेत. वल्लाआमाळ म्हणजे पुष्कळ होणे.जिथे गोंड भरपूर आहेत ती जागा म्हणजे(कुयव+आमाळ)कुयवामाळ,कोयामाळ अर्थात गोंडसदृश्य होणे असे म्हणता येईल. जसे अहमदनगर ला केवळ नगर या नावाने ओळखले जाते तसेच कुयवचे 'कु' लोप पावले. मुंबई चे बंबई वा बाॅम्बे असा अपभ्रंश होतो, हिंदीत यावतमल झाले तसे कुयवमाळ, कुयवतमाळ, कोईआमाळ,कोईतूरमाळ यातूनच यवतमाळ झाले असावे. आईने अकबरीत " योत लोहारा" असे नाव आहे. तो हा यवतचा अपभ्रंश आहे. यवतमाळला प्राचीन नसेलही पण इतिहासच नाही असे म्हणणे धाडसाचे होईल. आइने अकबरी मध्ये योत-लोहारा  चा उल्लेख आहे. हे पुस्तक इ.स. १६०० च्या शतकात लिहिण्यात आले. त्याही पेक्षा या लेखाच्या वरील फोटोत केदारेश्वर व कमलेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे, जे किमान ८०० ते १००० वर्षापुर्वीचे आहे. विस्तीर्ण पाण्याचे टाके असलेले एक महादेव मंदिर यवतमाळच्या मध्यभागी आहे. दुसऱ्या महादेव मंदिरात विहीर आहे.आदिवासी समाज शिकार व कंदमुळे खाऊन दऱ्याखोऱ्यात राहायचा त्याला सुपीक जमीनीची काय गरज ? राहिला पाण्याचा प्रश्न तर त्याला मंदिराच्या आसपास पाणी कुठेही मिळत असावे. विदर्भात यवतमाळ पर्यंत कधीकाळी समुद्र होता हे अलिकडच्या संशोधनातून पुढे आले आहे. कुणाला माहीत होते की कोलमणार खडकांचे खांब जिल्ह्यात सापडतील. यवत हे नाव फार पूर्वीपासून असावे असे वाटते. ( हे माझे स्वतःचे मत आहे. मतभेद असू शकतात. चर्चा करायला आवडेल. आपली मते स्वागतार्हच )                 

निपून सभी शस्त्रों में हम !

 ना मशीनगन में ही कौशल

 निपून सभी शस्त्रों में हम !

डिसेंबर १९४७ : पुंछ,कोटली,झांगर, राजौरी,माचोई आणि नौशेरा उंच हिमालय पर्वतावरील एक बर्फाच्छादित रणक्षेत्र.पाकी टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घातला होता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महार बटालियनच्या विविध तुकडींनी पराक्रमाची शर्थ केली. झांगर या रणक्षेत्री ६००० हजार पाकिस्तानी शत्रू सैन्याचा मुकाबला केवळ ५० महार सैनिकांनी केला. शत्रू सैन्याच्या तावडीतून आपल्या सहकाऱ्यांची सुटका व्हावी म्हणून हवालदार रावू कांबळे आणि नाईक बारक्या कांबळे यांनी मोर्चा सांभाळला. आपले सहकारी शत्रूंच्या तावडीत सापडू नये म्हणून त्यांनी गोळ्यांचा वर्षाव सुरू ठेवला. पण अनेक सहकारी धारातिर्थी पडल्यावर उरलेल्या या दोन वीरांना पकडून शत्रू सैनिकांनी त्यांचा शिरच्छेद केला. अशाही परिस्थितीत त्या दोन वीरांची मशीनगन चार पाच सेकंद धडधडत राहिली. या दोन वीरांची नावे बटालियनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.    ६ फेब्रुवारी १९४८ ला नौशेरच्या लढाईत झांगरचा बदला घेतल्या गेला. या लढाईतील तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या नाईक कृष्णा सोनवणे आणि पुंडलिक महार यांच्या अंगात शत्रूंच्या गोळ्या घुसल्या असतानाही त्यांनी शत्रूंचे १०००  सैनिक ठार मारलेत. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित भागात सतत १७ महिने शत्रू सैन्याचा मुकाबला करून त्यांना परास्त करणाऱ्या महार बटालियनच्या शूर शिपायांना विविध किताब देऊन गौरविण्यात आले. शौर्याची कमाल केलेल्या या महार सैनिकांविषयी अनेकांनी गौरवोद्गार काढले. या वीरांमध्ये कृष्णा नाईक सोनवणे यांना "महावीर चक्र" आणि हविलदार अमृत गंबरे, धोंडू जाधव, नाईक आबा किरतकुडे, नाईक बळीराम साळवी, पुंडलिक महार या पाच सैनिकांना "वीर चक्र" बहाल करण्यात आले. हा किस्सा बटालियन क्रमांक १ महार मशीनगन रेजिमेंटच्या बहादुर शिपायांचा आहे.    
         महार बटालियनने अनेक मोहिमा फत्ते केल्यात. त्याविषयी इथे सविस्तर मांडतो म्हटलं तर हे पेज कमी पडेल. तरीही थोडं सांगावं म्हणून, १९४२ मध्ये इटालियन कैद्यांना रांचीहून बंगलोरला नेण्याचे धोकादायक काम या सैनिकांनी यशस्वीपणे पार पाडले.  १९४३ मध्ये कडाक्याच्या थंडीत वजिरीस्तान मध्ये वजिरी टोळ्यांना परतवून लावले. या कामी मलप्पा वाघमारे व बळवंत मोरे या जवानांनी स्वतःचे बलिदान दिले. ११ सप्टेंबर १९४७ ला  दिल्लीतील २५-३० हजार मुसलमानांना पाकिस्तानात सुरक्षितपणे पोहोचविण्याचे काम महार बटालियनच्या मिडियम गन च्या सुभेदार गायकवाड आणि दुसरीकडे सुभेदार के.मोरे यांनी हल्लेखोरांवर बंदूका रोखून पुर्णत्वास नेले. तब्बल २२ आगगाड्या भरून हे महार सैनिक मुस्लिमांना नेत होते. उक्रल, इंफाल व भीष्मपूर तसेच अक्याब व ब्रह्मदेशातील युद्ध आघाडीवर महार बटालियनच्या शूर जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. चार महारवीरांना विशेषत्वाने गौरविण्यात आले.त्यात सगन सोनवणे, संपत भिसे, जमादार रघुनाथ मोरे आणि नाईक सखाराम चौरे यांचा समावेश होता.इराक मध्ये महार बटालियनच्या जवानांनी अतुलनीय पराक्रम केला.शस्त्रास्त्रे भरलेले ट्रक्स लुटणाऱ्या टोळ्यांना खतम करण्याचे काम सुभेदार मेजर बळवंत बंदसोडे व त्यांच्या दोन शिपायांनी केले. " या वीरांनी महार जातीचे नाव गाजविले " असे उद्गार फिल्ड मार्शल सर क्लॉड ॲचिनलेक यांनी काढले होते.      
            क्वेट्टा भागात मुसलमान आणि पठाणी टोळ्यांनी हिंदूंना ठार मारण्यासाठी मोहीमच उघडली होती. या भागात बटालियनच्या सैनिकांनी परिस्थिती आटोक्यात आणली. शेकडो हिंदू कुटुंबांना महार बटालियनच्या संरक्षणात दिल्लीला आणण्यात आले होते. हिस्सार पंजाब येथे मुस्लिमांच्या टोळ्यांनी जवानांच्या ट्रकवर हल्ला केला तेव्हा  मुख्य सुभेदार बनसोडे यांनी यांनी मशीनगन चालवून हल्लेखोरांना पिटाळून लावले त्यात काही ठारही झालेत. हिस्सार मधील एक लाख हिंदू व मुसलमान यांना निर्वासित केंद्रावर नेण्याचे बिकट कार्य बटालियनने पार पाडले. फाळणीनंतरच्या उद्भवलेल्या अडचणींवर मात करीत महार बटालियनच्या सैनिकांनी रात्रंदिवस प्रवास करून पाच लाख मुसलमानांना पाकिस्तानात नेले तर मुलतान, मुझफ्फरगड आणि डेरा गाझीखान या पंजाब मधील जिल्ह्यातून सुमारे तीन लाख मुसलमानेतर अर्थात हिंदू व शीख लोकांना भारतात आणले. विशेष म्हणजे ज्या केंद्रात या निर्वासितांना ठेवण्यात आले त्यांची संपूर्ण जबाबदारी महार बटालियनकडे होती. ले. जनरल के.एस. थिमय्या यांनी या जवानांचा गौरव केला.       
          महात्मा गांधी यांचा नाथुराम गोडसे याने खून केला त्यावेळी दिल्लीत महार बटालियनच्या सैनिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा सांभाळला.इतकेच नव्हे तर खुद्द पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू व इतर मंत्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी महार बटालियनच्या सैनिकांवर सोपविण्यात आली. राष्ट्रकुलातील देश आणि तुर्कस्तान यांच्या वकिलातींच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा या बटालियनच्या सैनिकांवर सोपविण्यात आली आणि ती त्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. पंडित नेहरू यांनी या सैनिकांविषयी गौरवोद्गार काढले. अनेक मोहिमा महार बटालियनने फत्ते केल्यात. पाकिस्तान व चीन सोबतच्या युद्धात महार सैनिकांनी सुद्धा पराक्रमाची शर्थ केली. चीनच्या आक्रमणाच्या वेळी नेफामधील लढाईत हवालदार गोविंद कांबळे यांच्या कडे मिडियम मशीनगन तुकडीचे नेतृत्व होते. त्यांच्या पायात गोळ्या घुसल्या असताना ते धडपडत खंदकात परतले, कंपनीला माघार घेण्याचा आदेश होता पण इतर जवानांना परत जाता यावे म्हणून गोविंद कांबळे यांनी आपला गोळीबार सुरू ठेवला. इतर जवान सुखरूप परतले परंतु हा भारतमातेचा सुपुत्र जखमांमुळे धारातिर्थी पडला. गोविंद कांबळे यांच्या असामान्य शौर्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र बहाल केले. कच्छ युद्धातील वीर हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांना वीरचक्र जाहीर झाले.      
             केवळ पाच वर्षांच्या काळात या बटालियनच्या कामगिरीवर अनेक लष्करी अधिकारी व राजनितीज्ञांनी गौरवपूर्ण उद्गार काढले. फ्लॅन्डर्स , मेसोपोटेमिया, पॅलेस्टाईन, आफ्रिकेतील जंगले आणि गॅलिपोलीच्या टेकड्या असो की कोरियात लढल्या गेलेल्या युद्धात महार बटालियनच्या सैनिकांनी मर्दुमकी गाजविली. शिस्त, खेळ व परेड मध्ये नेहमी अव्वल स्थानावर राहणाऱ्या या महार बटालियनचे अनेकांनी कौतुक केले. "वीर शिवाजी के बालक हम,है महार सैनिक हम हम ना मशीनगन में ही कौशल,निपुण सभी शस्त्रों में हम" हे मार्चिंग सॉंग गात गात जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित शिखरांवर " जयभीमच्या "जयघोषात शत्रूसैन्याला पाणी पाजणाऱ्या या वीर महार बटालियनला कोटी कोटी कुर्निसात !     
         डॉ. बाबासाहेब आंबेडकर महार समाजाला मार्शल रेस म्हणजे योद्ध्यांचा वंश म्हणायचे. भारतीय सैन्यात भरीव कामगिरी करणाऱ्या या योद्ध्यांची नाळ,आर्यांशी थेट भिडणाऱ्या नाग वंशाशी जुळलेली आहे. एका भीषण युद्धात पराभूत झालेल्या नागांना तथागत गौतम बुद्धाच्या काळात पुनश्च वैभव प्राप्त झाले. पुष्यमित्र शृंगाने कपटनीतीने बृहद्रथाचा खून केला या प्रतिक्रांतीच्या काळात नागवंशी बौद्धांनी ब्राह्मणी चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेत  शूद्र व्हायचे नाकारले म्हणून त्यांना अस्पृश्य बनविले गेले.    शौर्य, चिवटपणा आणि प्रामाणिकता हे सद्गुण अंगी असणाऱ्या अस्पृश्य महारांना शस्त्र धारण करण्याची संधी मिळाली ती मुस्लिम आक्रमणाच्या वेळेस. मुगल, मुसलमान राज्यकर्त्यांनी आपली राजसत्ता कायम करण्यासाठी चारी बाजूंनी घेराबंदी झालेल्या व संधीची वाट पाहत असलेल्या अस्पृश्यांना आपल्या सैन्यात जागा दिली परंतु या सैनिकांना उच्च पदावर न नेमता खालची पदे दिली. कारण भारतातील उच्चवर्णीयांची सामाजिक व धार्मिक दहशत त्यांना माहीत होती. अस्पृश्यांना उच्च पदे दिली तर आपली राजसत्ता धोक्यात येऊ शकते याची जाणीव त्यांना होती. महार,मांग,चांभार आदी अस्पृश्यांनी आपल्या अस्तित्वासाठी व रोजीरोटीसाठी मुस्लिम राज्यकर्त्यांना साथ दिली. मात्र उच्चवर्णीयांनी परकीय आक्रमकांना आपल्या मुली देऊन नातेसंबंध प्रस्थापित करून आपले राज्य अबाधित ठेवले. ब्राह्मणांनी राजाला विष्णूचा अवतार घोषित करून परकीय राजांच्या राजदरबारी अनेक पदे आणि पैसा पदरात पाडून घेतला. हा दोन वर्गातील फरक नजरेत भरण्यासारखा आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा अस्पृश्यांना हिंदू समाजात योग्य दर्जा मिळावा म्हणून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत.उलट अस्पृश्यांना मुसलमान बनविण्यासाठी मोहीम राबवली.आणि हिंदू धर्माभिमानी लोकांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून असंख्य अस्पृश्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला सुद्धा !     
         छ.शिवाजी महाराजांच्या काळात अस्पृश्यांना सैन्यात स्थान मिळाले. मराठा साम्राज्यात वैराटगड जिंकून देणारा नागनाक, खर्ड्याच्या लढाईत पठाणांच्या तावडीतून  परशूरामभाऊ पटवर्धनांचा जीव वाचवून पेशवाईचे संरक्षण करणारा सिदनाक व बाजीप्रभू सारखी खिंड लढवून शिवरायांसाठी धारातिर्थी पडणारा रायनाक तसेच कोंडनाक, तुकनाक व माणिक महार या योद्ध्यांचे किस्से प्रसिद्ध आहेत. परंतु याही काळात अस्पृश्यांना योग्य दर्जा मिळाला नाही. छ. शिवाजी महाराजांच्या काळात किमान अस्पृश्यांची स्थिती ठीक होती पण पेशव्यांच्या काळात अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक मिळाली. यावर काय बोलणार? आपल्या सर्वांना भीमा कोरेगावचा संग्राम माहीत आहे.   इंग्रज भारतात आले. त्यांनी अस्पृश्यांचा प्रामाणिकपणा व लढाऊ वृत्ती हेरली. त्यांना आपल्या सैन्यात स्थान दिले. मशीनगन चालविण्यासाठी कोण सक्षम आहेत याची जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने चाचणी घेतली तेव्हा महार माणूस अगदी योग्य आहे असे त्यांना आढळले. शहीद रावू व बारक्या कांबळेच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते. परंतु त्यांनीही अस्पृश्यांचा केवळ वापरच केला. सैनिकी पेशा मुळे महारांची सांपत्तिक स्थिती सुधारली होती. सैन्यात जातीनिहाय आरक्षण नव्हते, केवळ लढाऊ वृत्तीच्या गुणांमुळे महार, मांग व चांभार आदींना सैन्यात स्थान मिळाले.मात्र सवर्ण हिंदुंच्या जातीभेदामुळे व ते अस्पृश्य अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणे कमीपणाचे मानू लागल्यामुळे इंग्रजांना १८५७ च्या बंडाची पुनरावृत्ती होईल याची भीती वाटल्याने त्यांनी अस्पृश्यांची भरती बंद केली. अस्पृश्य अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले व जवानांना पेन्शनीत काढले गेले. पलटणीची पुनर्रचना रजपूत, शीख, मराठा, अशा सवर्ण जातीच्या पायावर केली. सैन्यातून काढल्यामुळे महार सैनिकांचे परिवार पार उद्ध्वस्त झाले. असले वाईट दिवस केवळ उच्चवर्णीयांच्या "मनुवृत्तीमुळे" अस्पृश्यांच्या वाट्याला आले. म्हणजे महारांची लायकी असतांनाही उच्चवर्णीय लोकांना अस्पृश्य विशेषतः महार जातीचा माणूस चालत नसतो याची प्रचिती वरील उदाहरणात दिसून येते. आज नोकरीत आरक्षण आहे म्हणून अनुसूचित जाती व जमातींचे कर्मचारी सरकारी नोकरीत दिसतात, अन्यथा सवर्ण हिंदूंच्या धर्माधिष्ठित जातीभेदाने अस्पृश्यांना पार देशोधडीला लावले असते. महार हे किती सक्षम आहेत याचा दाखला सर रॉबर्ट रिसले यांच्या "दि पीपल ऑफ इंडिया" ह्या ग्रंथाने दिला आहे. मानव विकास शास्त्राच्या दृष्टीने राॅबर्ट रिसले यांनी " डोक्याच्या व नाकाच्या पुराव्यावरून देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांपेक्षाही महार लोक अधिक श्रेष्ठ आहेत" असे त्यांच्या टेबलवरून दर्शवून दिले. अलेक्झांडर राॅबर्टसन म्हणतात, "महारांचा दक्षिणेतील ग्राम व्यवस्थेतील, दक्षिणेतील राज्यशास्त्रीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून, मराठी संत वाङमयाच्या दृष्टीकोनातून निःपक्षपाती अभ्यास केला तर व महाराला योग्य संधी दिली तर सर रॉबर्ट रिसले साहेबांच्या आकडेवारीने त्यांना जे उच्च स्थान दिलेले आहे त्याच योग्यतेचा तो महार आहे." पुढे ते म्हणतात, "महारांमधील मागासलेपण हे शैक्षणिक सामर्थ्याच्या अभावाने नव्हे तर संधीच्या अभावाने आले आहे."          
        संधी मिळाली की महार समाज आकाशाला गवसणी घालू शकतो, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. बाबासाहेबांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमातून आणि व्यवस्थेशी संघर्ष करताना त्यांनी भोगलेल्या यातनामय वाटचालीतून आजचा बौद्ध उभा राहिला. आरक्षणाने संधी प्राप्त करून दिली आणि धम्मदीक्षेने मानसिक बळ दिले. भारतीय संविधान लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर रॉबर्ट रिसले यांच्या टेबलची आकडेवारी खरी करून दाखवली.      
             महार रेजिमेंटचा अत्यंत गौरवशाली इतिहास आहे, आणि महार हे महाराष्ट्रीयन असतानाही दैनिक लोकमत सारख्या वर्तमान पत्राच्या दि. १६ जून २०२२ च्या अग्रलेखात महार रेजिमेंटला अनुल्लेखाने मारले जाते हे जातियवादाचेच लक्षण नव्हे काय ? लोकमत म्हणते, "आपल्या देशात मुळातच लष्करी सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक हळवा व संवेदनशील आहे. मराठा रेजिमेंटबरोबरच जाट, राजपूत व शीख रेजिमेंट यांचा पराक्रमी इतिहास आहे."या संपादकांना महार रेजिमेंट दिसली नाही. कुणी काहीही लिहिले तरी आपण आपला इतिहास स्मरून उज्ज्वल भविष्याची वाट चोखाळली पाहिजे. आता आपली परीक्षा आहे. 

  - आनंद गायकवाड 

संदर्भ : 
1. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड ८ लेखक - चांगदेव भवानराव खैरमोडे ( मूळ संदर्भ -  The Mahar MG Regiment, The Times of India २६.१०.१९५२,  नवशक्ती ११.१.१९६३, ३०.६.१९६५)
2. शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास लेखक - डॉ. अनिल कठारे 3. महार लोक लेखक - अलेक्झांडर रॉबर्टसन ( मूळ संदर्भ - कास्ट्स ॲन्ड ट्राईब्ज ऑफ बॉम्बे व्हॉल्यूम १ ) 

जो जल रहा है , वतन हैं किसका ?

 जो जल रहा है , वतन हैं किसका ?

- आनंद गायकवाड


................................................................................

परकीय मुस्लिम दहशतवाद्यांचा हवाला देऊन भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी अनेक फंडे राबविण्यात आले आहे. त्यातून सुशिक्षीत मुस्लिम तरुणांना जीवे मारण्यात आले किंवा तुरुंगात जेरबंद करण्यात आले. गोमांस बंदीचा कायदा मुसलमानांच्या जीवावर उठला. तीन तलाक वा अनुच्छेद ३७० हटविणे हाच जणू भारतीयांच्या उन्नतीचा महामार्ग असून मंदिर निर्माण हे प्रगतीचे महाद्वार आहे हे ठसविण्यात येत आहे. एका भयग्रस्त वातावरणात मुसलमान जगतो आहे. आणि स्वतःच्या मदहोशीत जगणारा सुद्धा एक वर्ग आहे जो जगाकडे दुर्लक्ष करून आपल्याच कोषात बंदिस्त झाला आहे.

.....................................................................................

मुस्लीम मराठी साहित्याचा पसारा मोठा असला तरी अलीकडे त्याचा आवाज क्षीण झाला की काय असे वाटायला लागले. उर्दू हिंदीत लिहिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ईशस्तुती अर्थात हम्द आणि पैगंबरांच्या स्मरणार्थ केलेली पद्यरचना म्हणजे नात अनेकांनी लिहिल्यात. नज्म, गज़ल व मुक्तछंदातील रचना पण आपण अलिकडे पाहतोय. जनाना ते मयखाना पर्यंत गझलांची भरमार आहे. तसं पाहिलं तर गज़ल म्हणजे स्त्री सौंदर्याची स्तुती असाच पारंपरिक अर्थ आहे. नंतर त्याचे स्वरूप बदलले. काही बोटावर मोजण्याइतपत कवी सोडले तर सामाजिक जाणिवेच्या रचना फारशा दिसत नाहीत. क्रांतिकारक विचार तर फारच दूर आहे. मराठीतील अमर शेख, अजीज नदाफ, बाबा महंमद अत्तार, जावेद पाशा, मुबारक शेख, बदिउज्जमा बिराजदार, अजीम नवाज़ राही, फ.म.शहाजिंदे, नसीमा पठाण,बदिउज्जमा खावर, रफीक शेख, सिराज मुजावर, अंजुम मोमीन, कलीम खान यासारखे अनेक कवी आहेत ज्यांनी सामाजिक परिवर्तनाची सशक्त कविता लिहिली. सत्ताधीशांच्या अन्यायी धोरणावर टीका, फॅसिझमचा प्रतिरोध करून सर्वसामान्यांच्या वेदनांना सर्जनशील करणारे काव्यलेखन हिंदी उर्दू भाषिक फैज़ अहमद फैज़ पासून ते साहिर लुधियानवी, मुनव्वर राणा, राहत इंदौरी पर्यंतच्या कवींनी ताकदीने केले. दुष्यंत कुमार, पाश, धुमिल, चीमा, गदर, राजू यांच्या कवितांनी जनतेच्या आंदोलनाला आवाज दिला. आज फासीवादाचा बीभत्स चेहरा आपल्या नजरेसमोर आहे. धर्मांध व धनिकशहांच्या झुंडशाहीने वर्तमान भयकंपित झाले आहे. गरीब, दलित, आदिवासी हे या झुंडशाहीचे बळी आहेतच पण या वर्गाचे ब्रेन वॉश करून त्यांना सोबत घेऊन हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी अल्पसंख्याक मुसलमान लक्ष्य केल्या जात आहे हे गुजरातच्या सुनियोजित दंगलीने दाखवून दिले. परकीय मुस्लिम दहशतवाद्यांचा हवाला देऊन भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी अनेक फंडे राबविण्यात आले आहे. त्यातून सुशिक्षीत मुस्लिम तरुणांना जीवे मारण्यात आले किंवा तुरुंगात जेरबंद करण्यात आले. गोमांस बंदीचा कायदा मुसलमानांच्या जीवावर उठला. तीन तलाक वा अनुच्छेद ३७० हटविणे हाच जणू भारतीयांच्या उन्नतीचा महामार्ग असून मंदिर निर्माण हे प्रगतीचे महाद्वार आहे हे ठसविण्यात येत आहे. एका भयग्रस्त वातावरणात मुसलमान जगतो आहे. आणि स्वतःच्या मदहोशीत जगणारा सुद्धा एक वर्ग आहे जो जगाकडे दुर्लक्ष करून आपल्याच कोषात बंदिस्त झाला आहे. दुष्यंत कुमारच्या शब्दात सांगायचे तर;


इस शहर में वो कोई बारात हो या वारदात
अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियां।


लोकं इतके कसे निगरगट्ट झाले असावेत ? ही अवस्था लोकशाहीसाठी घातक आहे. शेजारचा अखलाक झुंडशाहीचा शिकार होतो त्यांच्याचकडून ज्यांच्या सहवासात तो जगला. म्हणून मन्सूर एजाज जोश लिहितो, 

आधी रात को नींद से उठकर 
अपने सोते बच्चे के सर पर 
हाथ फेर कर सोचा मैने
घर में सबकुछ ठीक है मेरे
खिड़की-दरवाजों से लेकिन 
रोज हवा टकराती है
अकसर मुझे डराती है !

आपल्याच बांधवांमध्ये ही भीती कुणी व का निर्माण केली ? या दहशतीच्या वातावरणात व्यवस्थेकडे डोळे रोखून पाहणाऱ्या कवितांचा जन्म होणे स्वाभाविक होते. शत्रूंवर चाल करून येणाऱ्या साऱ्या सशस्त्र दलांचा लवाजमा क्षितीजावर वादळ उठवताना दिसतोय. त्यांचा आवाज ऐकू येतोय........आवाज़े जरस येत आहे, येईल.

       आवाज़े जरस हा मुक्तछंदातील कवितांचा संग्रह आहे कवी मन्सूर एजाज़ जोश यांचा. मुंबई व गुजरात दंगल आणि एकूणच मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा कवितासंग्रह आपला आवाज बुलंद करतो. जोश यांचे नुकतेच निधन झाले. अत्यंत हळवा व संवेदनशील मनाचा हा कवी फॅसिस्टांविरूद्ध आक्रमक होतो. अलिकडच्या काळात इतक्या ताकदीने लिहिणारे कवी फार कमी आहेत. जोश त्यातील एक. मन्सूर एजाज़ हे त्यांचे मूळ नाव असून नंतर जोश हे नाव जोडले. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे कवी जोश हे उर्दू शिक्षक होते. वणी मध्ये त्यांचा बराचसा काळ गेला. पुरोगामी विचारांचे जोश साम्यवादाने प्रभावित होते. त्यांच्या कविता अत्यंत प्रखर व आक्रमक असण्याचे कारण साम्यवादी विद्रोहाचा तो परिणाम असावा. देशातील धर्मांध शक्तीवर त्यांचा प्रचंड राग होता हे त्यांच्या कवितेतून दिसून पडतो. मन्सूर एजाज जोश केवळ कविताच करीत नव्हते ते आंदोलकही होते. फुले - आंबेडकरी चळवळीशी त्यांची नाळ जुळलेली होती. यवतमाळच्या प्रत्येक पुरोगामी, परिवर्तनवादी व आंबेडकरी आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. सीएए व एनआरसी विरोध, ओबीसींची पदभरती, अनुसूचित जाती व बौद्धांवरील अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ते सडकेवर उतरायचे. जोपर्यत मुस्लिम समाज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आत्मसात करणार नाही तोपर्यंत त्यांचा अभ्युदय होणार नाही, हे वाक्य ते नेहमीच माझ्याशी बोलताना उच्चारायचे. बहुजन समाजातील अनेक चळवळ्यांशी त्यांचे एक आंदोलक म्हणून घट्ट नाते होते. यवतमाळच्या सर्वच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.कवी म्हणून त्यांची राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होती. पाकिस्तान , दुबई सारख्या ठिकाणी त्यांच्या कवितांचे चाहते होते. आंतरराष्ट्रीय नियतकालिक शायर मध्ये त्यांच्या कविता नेहमी यायच्या. ते इतरांच्याही कविता उर्दू मध्ये अनुवादित करून प्रकाशित करायचे. माझी कविता सुद्धा त्यांनी शायर मध्ये छापून आणली. देशभर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा गोतावळा आहे. त्यांचे काव्यसंग्रह नागपूर व जळगाव विद्यापीठात अभ्यासक्रमाला आहेत. तर उर्दू मध्ये दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते महाराष्ट्र राज्याच्या उर्दू साहित्य अकादमी चे सदस्य होते. एकूणच भारतीय दमनव्यवस्थेचे चित्र त्यांनी त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात रेखाटले आहे. ' आवाज़े जरस ' हा त्यांचा पहिला हिंदी उर्दू काव्यसंग्रह. याच काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद प्रख्यात कवी लोकनाथ यशवंत यांनी " ज़ेरबंद" च्या रुपाने प्रसिद्ध केला. जोश यांच्या कवितांवर भाष्य करताना प्रसिद्ध उर्दू शायर निदा फाज़ली म्हणतात, " सोप्या भाषेत घायाळ करणारे तीक्ष्ण शब्दास्त्र हे आपल्या कवितांचं सौंदर्य आहे." जोश यांच्या कवितांवर बोलताना असे म्हणता येईल की, ही कविता विकृतीला जेरबंद करून सुंदरतेचं सृजन करणारी कलाकृती आहे. ते केवळ धर्मांध आणि मनुवादी वृत्तीवरच कोरडे ओढत नाहीत तर या व्यवस्थेत लपून वार करणाऱ्या राजकीय धेंडांवरही हल्लाबोल करतात. वर्तमान परिस्थितीत त्यांचे कवन पुरेपूर लागू पडते.

भारतीयत्व आपल्या काळजात जपणारा हा कवी आपल्या नजरेसमोर निरपराध मुसलमान मारले जात असताना अशांत होतो. उपरोधाचे शस्त्र उगारून जोश म्हणतात, 

मै इन्सान 
भारत का मुसलमान
अन्य किसी भी मौत से
मुझे इनकार है
हिंदुस्तानी पुलिस की गोली सें मरना
मेरा जन्मसिद्ध अधिकार है !

पोलीस आणि तमाम त्या यंत्रणा ज्या लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्माण झाल्या त्यांचा गैरवापर मुस्लिम समाजाविरुद्ध केला जातो याची चीड जोश यांच्या कवितेतून ध्वनित होते. एकीकडे हिंदू व मुसलमान यांचा डीएनए एक आहे म्हणायचं आणि दुसरीकडे मुस्लिमांचे जगणे मुश्किल करायचे ही मनुवादी नीती जोश यांच्या कवितांना अपरिचित नाही. भारतात मुस्लिमांनी उभ्या केलेल्या ऐतिहासिक इमारती, इथंच जन्म घेऊन इथल्याच मातीत दफन झालेले मुस्लिम राज्यकर्ते व त्यांचे वंशज हे तुझ्याच रक्ताचे नाही का ? असा सवाल उपस्थित करून लाल,हिरवे झेंडे घेऊन आंदोलन करणारे तुझेच पूत्र असूनही त्यांचा द्वेष का ? सर्व धर्मीय लोक जर तुझीच लेकरे असतील तर हा या भूमीवर त्यांच्या रक्ताचे सिंचन कसे ? अनेक मुस्लिम सैनिक देशासाठी लढत असताना त्यांच्यावर वार का ? सर्व भारतीय बांधव असतील तर आम्हीच का आमचे रक्त पिऊन का जगत आहोत ? आम्ही तुझे नसू तर संपवून टाक सर्वांना असा टोकाचा संताप व्यक्त करून, आज स्वतःच्याच आगीत जळणारा हा देश कुणाचा असा जळजळीत प्रश्न मन्सूर एजाज़ जोश भारतमातेला करतात. ही देशभक्ती नव्हे तर दुसरे काय आहे ?


लहू


जमीन पर लहू के ये छींटे
तेरे ही बेटों का खून हैं मां
ये लाल झंडे ,ये सब्ज परचम
तेरे ही आंचल के रंग है मां
हरे भरे ये शजर, ये परबत
ये लाल किला , ये जामा मस्जिद
जो ताज जमना के तट खडा है
वो सब सलातीन , उनकी नसलें
तुझी सें जनमे ,तुझी में खोये
ये तेरे बेटे नही तो क्या है ?
अगर नहीं ...तो उगल दे उनको
जो नक्श हैं सब कुचल दे उनको
नहीं तो फिर ये जवान बुढ़े
ये हिंदू- मुस्लिम, ये सिख - इसाई
ये सारी धरती, ये सब सिपाही
तेरे नहीं तो लहू हैं किसका
यह आग खूं से वुजु हैं किसका
भरी है नफरत सुबु हैं किसका
उज़ड़ रहा है चमन ये किसका
जो जल रहा है वतन हैं किसका
ये कैसा जीना है......जी रहें है
लहू हम अपना ही पी रहें है !


( सब्ज - हिरवा/ परचम- ध्वज/ शजर- वटवृक्ष/ सलातीन- सुलतान,राजा/ नसले-वंशज/ नक्श- चित्र/ वुजु- नमाजापुर्वी हातपाय धुणे /सुबु - प्रमाण ,पुरावा )


केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला ?

 

केवळ महारांनीच बौद्ध धम्म स्वीकारला ???


➡ २०११ ची जनगणना सैर करताना मी कर्नाटकात घुसलो . तिथे अनुसूचित जाती १ कोटी ४ लाख ७४ हजार ९९२ आहेत . त्यापैकी १ कोटी ४ लाख १८ हजार ९८९ हिंदू आहेत , शीख २१०० तर बौद्ध ५३ हजार ९०३ आहेत . इथे महार , तराळ , धेगुमेगु ६६ हजार ६८ आहेत . पण यापैकी केवळ ५ हजार ७०१ बौद्ध आहेत तर हिंदू [ ज्यांनी बौद्ध नोंदविले नाही ते ] ६० हजार ३४८ असून शीख फक १९ आहेत . माझ्यासाठी धक्कादायक बाब अशी की , इथे सर्वाधिक धम्म स्वीकारणारी जात महार नसून , होलया , होलेर , होलेया ही आहे . यांची संख्या ७ लाख ९२ हजार ७८५ असून हिंदू ७ लाख ५५ हजार २६६ , शीख १६१ आणि बौद्ध ३७ हजार ३५८ आहे . आदी कर्नाटका या जातीच्या २ हजार ३४९ लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला . आदी द्रविडा २८७ / भोवी ओड , ओद्डे , वड्डर २१९ तर जेनेरिक जाती ४०६४ .बौद्ध आहेत.
➡ गुजरात मध्येही महार , तराळ , धेगुमेगु ही जात आहे . ती २८ हजार ४१७ असून हिंदू [ बौद्ध न नोंदविलेली ] २० हजार ६८२ आहे , शीख १०८ तर बौद्ध ७ हजार ६२७ आहे . इथे भाम्बी , भाम्भी व चमार ह्या जातीगटातील १०२४ लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला.
➡ पश्चिम बंगाल मध्ये महार ही जात आहे . ३४ हजार ७९३ पैकी हिंदू [ ज्यांनी बौद्ध नोंदविले नाही ते ] ३४ हजार ४५५ , शीख १७ तर बौद्ध केवळ ३२१ आहे . नामशुद्र ही सर्वात मोठी जात असून ३५ लाख ४ हजार ६४२ आहे . त्यात फक्त ३१० बौद्ध आहेत.
➡ गोवा राज्यात सुद्धा महार आहेत , त्यांची एकूण संख्या १२ हजार ८१८ आहे त्यापैकी १२ हजार ६७७ हिंदू असून बौद्ध केवळ १४० नोंदलेले आहेत.
➡ मध्य प्रदेशात एकूण १ लाख ९९ हजार ४२६ बौद्धांपैकी महार , मेहरा व मेहर या जातीतून आलेले १ लाख ६० हजार ६२२ लोक आहेत . त्याबरोबर चमार , चमारी या जातीगटातील २८ हजार २५६ / डोहोर मधून ३ हजार ७०९ , बलाही , बलाई २९५ / भंगी, मेहतर, बाल्मिकी २९२ / खनगर , कनेरा , मिर्धा १२५ / मांग , मांग गारोडी ३१३ / पासी ५७ / कोली , कोरी ३१० / डोम , डूमार ८४ / बसोर , बुरुड , बंसोर ८४ , बरहर , बसोड ७१ / होलीया ९१ / कटिया , पठारीया ९९ व जेनेरिक जाती ४६६८ आदी बौद्ध आहेत.
➡ पंजाबात आदी धर्मी १८ हजार ७७८ / बाल्मिकी , चुहडा १५८८ / मझबी , मजहबी शीख १६० हे बौद्ध आहेत . कबीरपंथी , जुलाहा ३९ / कोरी . कोली २२ / डुम्मा , महाशा , डुर २७ / बाजीगर ३९ / खाटिक १० / बौरिया बावरिया १० / पासी १८ / सांसी , भेडकुल १८ / महत्तम , राय सिख ६० इत्यादी बौद्ध आहेत.
➡ आंध्र प्रदेशात महार ३६ हजार २३८ आहेत त्यापैकी ११ हजार २६० जणांची बौद्ध म्हणून नोंद आहे . त्यापेक्षा माला या जातीतून १२ हजार ७२९ बौद्ध झालेत , माले साले , नेटकनी ४६८ / मादिगा १००३ / मांग ९७ / मेहतर ५३ बौद्ध आहेत .…. ती माणसे मूर्ख आहेत जी म्हणतात केवळ महारांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

- आनंद गायकवाड

माणसं भडकली की देश भडकायला उशीर लागत नाही.

 

माणसं भडकली की
देश भडकायला उशीर लागत नाही.

- आनंद गायकवाड 

----------------------------------------------------------------

सत्ताकारणाची वाट धार्मिक दंगलीतून जाते, आता ती वहिवाट झाली आहे. जंतरमंतर वरील परवाचा धर्मधिंगाना पाहिल्यावर हाच तो देश आहे का जो परकियांच्या अत्याचाराविरुद्ध लढला असा प्रश्न निर्माण होतो. देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन पुढ्यात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण एक वर्षाने साजरा करणार आहोत. तरीही आम्हाला एक होता येत नाही वा एक होऊ दिले जात नाही. कोणते रेशमाचे ( की रेशीमबागेतील) किडे जय श्रीरामच्या घोषात आमची एकतेची वीण उधडायला निघाले आहेत.

-----------------------------------------------------------

काल परवा दिल्लीच्या कॅन्ट भागात एका नऊ वर्षांच्या वाल्मिकी समाजाच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार करून तिचे शव जाळून टाकण्याची घृणास्पद व चीड आणणारी घटना घडली. हाथरस मधील मनिषाच्या दाहसंस्काराचा ताप कमी होत नाही तोच ही घटना घडली. जोपर्यंत शेकडोंचा समूह पोलीस स्टेशनवर चाल करून गेला नाही तोपर्यंत ढिम्म बसलेल्या पोलीसांनी या बलात्कार व खून प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. जनता व समाज माध्यमातून दबाव निर्माण झाल्यामुळे अखेर या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. यात प्रमुख आरोपी घाटावरचा पुजारी आहे. देवादिकांच्या नावाने धंदा करणाऱ्या अशा पुजाऱ्यांवर आणि दगडांच्या दैवतांवर विश्वास का ठेवतात ही पददलित माणसं जी हजारो वर्षांपासून देवादिकांची गुलामी करुनही आपल्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची पखरण करू शकली नाही ? हा देव रक्षा करू शकत नसेल तर तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही कसा बनू शकेल ? जर असे होत नसेल तर त्याला बाद का करू नये. लक्ष्मीकांत घुमे आपल्या कवितेत ठासून सांगतो..

कुठल्याही देवळात
सामूहिक बलात्कार झालेल्या केस साठी
आय विटनेस म्हणून सर्वप्रथम
दगडाच्या मुर्तीलाच कोर्टात हजर करावे
पुजाऱ्याला दोषी ठरवावे.

देवळात देव जर जागृत असेल तर भोळ्याभाबड्या भक्तांना अभय मिळायला पाहिजे. भक्तांचे मन शांत व्हायला हवे पण असे होत नाही. कारण देवळांची निर्मितीच जनतेचे शोषण करण्यासाठी झाली आहे. पंडे, पुजारी व बडव्यांची ही धर्ममान्य कंपनी आहे. धर्म कधी नव्हे इतका जनतेच्या जीवावर उठला आहे. अलिकडे तो माणसांत विद्वेषाची दाहक रेघ आखतो आहे. सत्ताकारणाची वाट धार्मिक दंगलीतून जाते, आता ती वहिवाट झाली आहे. जंतरमंतर वरील परवाचा धर्मधिंगाना पाहिल्यावर हाच तो देश आहे का जो परकियांच्या अत्याचाराविरुद्ध लढला असा प्रश्न निर्माण होतो. देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन पुढ्यात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण एक वर्षाने साजरा करणार आहोत. तरीही आम्हाला एक होता येत नाही वा एक होऊ दिले जात नाही. कोणते रेशमाचे ( की रेशीमबागेतील) किडे जय श्रीरामच्या घोषात आमची एकतेची वीण उधडायला निघाले आहेत. मखमुर सईदी म्हणतो,

कितनी दिवारे उठी है इक घर के दरमियाॅ
घर कहीं गुम हो गया दिवारोंदर के दरमियाॅ

परंतु देश विस्कटला तरी धर्मांधांना त्याचे काही सोयरसुतक नाही. कानपूरच्या अफसारला घरातून ओढत आणून बेदम मारहाण केली व जय श्रीराम चे नारे द्यावे म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न बजरंग दलाच्या तालिबान्यांनी केला. नॅशनल दस्तकच्या अनमोल प्रीतम वर झुंडशाहीने असाच दबाव टाकला. पण तो बधला नाही, कारण तो जयभीमवाला होता. हे असे का घडत आहे. शम्बूक व वालीची हत्या धर्ममान्य असणाऱ्या रामराज्याची ही सुरुवात आहे असे निर्लज्जपणे भगवा गमछा खांद्यावर घेतलेले भारवाही भक्त खुलेआम बोलायला लागलेत. हे सतत घडणार आहे, लक्ष्मीकांत म्हणतो,

अर्धी रात्र उलटून गेल्यावर
जळत असतात सभा
कटाचे स्मशानबेट आखून
त्यांचे काढले जातात प्लस - मायनस
जाळणारे आणि मारणारे हात
ज्ञात - अज्ञाताचे विनम्र सेवक होतात
आणि त्यांच्या षडयंत्री सस्पेन्सीव्ह ब्रॅन्चेस
आता गावोगावी त्यांचे प्लॅटफॉर्म
तयार झाले आहेत.

या शाखा कालपर्यंत गुप्त होत्या आज मात्र त्या जाहीरपणे कट रचतात आणि अंमलात आणतात. या शाखांच्या विनम्र सेवकांना कशाचेच भय राहिले नाही कारण सत्ता त्यांच्या पाठीशी उभी आहे. पण या सत्तेला आव्हान देणारा एक नीडर वर्गही देशात आहे याकडे लक्ष्मीकांत अंगुलीनिर्देश करतो,

पार्लमेंट मध्ये बसणाऱ्या लोकांनी
आता सावधान असलं पाहिजे
त्यांच्या खुर्ची जवळचा ध्यानस्थ बुद्ध
केव्हाही खवळून उठू शकतो
याचे भान राखले पाहिजे.

लक्ष्मीकांतची कविता मर्यादा संपलेल्या सहनशीलतेचा एल्गार आहे. हा एल्गारही ज्वलज्जहाल आहे. लक्ष्मीकांत भाकरीच्या शोधात निघालेला एक अत्यंत संवेदनशील कवी. जे जे भाकरीच्या शोधात आहेत त्यांच्याशी सख्य जपणारा व आपल्या हक्काच्या प्रदेशासाठी बलदंड सत्ताधीशांना ललकारणारा कार्यकर्ता आहे. इतकेच नव्हे तर बापालाही उद्देशून लिहिलेल्या या ओळी त्याच्या अंतर्मनातील विस्फोटक तगमग खूप काही सांगून जाते.

मी माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो
या वस्तीतल्या कोणत्याही बापाने
लेकराच्या दोन सांजेची सोय केल्याशिवाय
उगाच निष्पाप लेकरांना जन्म देऊ नये

कवीच्या अस्थिर आयुष्याला थांबाच नव्हता. प्रत्येक चौक त्याला भाकरीसाठी खुणवायचा. भाकरीच्या शोधात एकाकीपणे कधी बस स्थानकाच्या बेंचवर तो रात्र काढायचा. मनातील सुप्त सरोज कधीतरी त्याला जागे करायची मात्र भाकर तिथेही त्याचा मेंदू कुरतडायची,

तू अचानक माझ्या बाहुपाशात समावलीस
तेव्हा तुला हसता आलं नाही
अन् मला तुझे गुलाबी ओठही
मागता आले नाही..
मला वाईट वाटलं
तु म्हणालीस..
नाराज आहेस माझ्यावर ?
क्षणार्धात फुललो, तुही हसलीस
आणि एकाएकी विलग होत म्हणाली
तुझ्याकडे एखाद्या भाकरीचं पिठ असेल काय रे...?

एका सांजेच्या पिठासाठी छप्परावरचे पत्रे विकल्या जातात, जवान पोरी बिल्डिंग मध्ये नाईटला जातात हे पाहून कवीचा उर फाटून जातो. मग एखाद्या महापुरुषासारखे भाकरीचे फोटो चौकाचौकात लावायची तो घोषणा करतो. आपल्याच कष्टकरी हातांनी या देशातील शिल्पाकृती घडवल्या नि आपलेच हात कलम केल्या गेले. तरीही आपण पेटून उठत नाही. यावर तो भडकतो. पोट भरलेल्या लीडरवर तो चिडतो. संसदेच्या भिंतीआड बसलेले नेते त्याला कावळ्यासारखे भासतात. पक्षी संसदेवरून उडत जातात आणि संसद माणसांवरून रोलर सारखी, या शब्दांत कवी आपला संताप व्यक्त करतो. आजही मोठ्या प्रमाणात दलित शोषितांच्या हत्या होत असताना संसदेत कुणाला कशा मस्कऱ्याचारोळी सुचत असतील ? भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तात्त्विक संताप पाहून ज्या संसदेच्या भिंती कधीकाळी थरथर कापल्या असतीत त्याच भिंती बाबासाहेबांच्या नावावर संसदेत पोहचलेल्यांचे भंकस बोल ऐकून आपलेच डोके आपल्याच भिंतीवर आपटून घेत नसतील, कशावरून ? तेव्हाची लक्ष्मीकांतची चीड न्याय्यच आहे. कवी असा संतप्त होतो. तो स्वातंत्र्याचीही समीक्षा करतो. त्याच्या आईच्या पदरावर तीन रंगांचे ठिगळ लावून घरीच राष्ट्रध्वज फडकताना तो पाहतो. फुटपाथवर भिकाऱ्यांना डंडे मारणारे पोलीस / बिमार बापासाठी धंदा करणारी मुन्नी / चिंध्यात झाकलेली आई / कडेकपारीतल्या बहिणी / भुकेलेल्यांची जगप्रसिद्ध सर्कस / जातीय दंगली / धर्मग्रंथांच्या पानातील अस्पृश्यता हे सर्व या हळव्या कवीला अस्वस्थ करतात पण तो अश्रू गाळत बसत नाही तो देशाकडे डोळे फाडून बघतो आणि विचारतो,

आपल्या देशाचा नकाशा बघ सरोज
कसा दिमाखात मिरवतोय
त्यात रोज उपाशी झोपणाऱ्या
कंगालांचा प्रदेश कसा दिसत नाही ?

या व्यवस्थेने मोर्चेकऱ्यांच्या उद्ध्वस्त केलेल्या झोपड्या व गरीबांसाठी नसलेली मायभूमी त्याच्या क्रोधात भर घालते. मी या व्यवस्थेच्या पाठीवरून बुलडोझर सारखी फिरवीन माझी कविता , या शब्दांत तो व्यक्त होतो. लक्ष्मीकांत घुमे याची कविता गरीबांच्या, भुकेल्यांच्या, निराश्रितांच्या , पददलितांच्या पाठीवरून हात फिरवते तर मुजोर, बेईमान, भांडवलशाही व दलाल लोकप्रतिनिधींच्या छाताडावर बुलडोझर फिरवते. लक्ष्मीकांत हा यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा या खेडेगावात जन्मलेला बहुजन समाजातील कवी. रोजीरोटी साठी वणी या शहरात त्याने बस्तान ठोकले. अधिक शिकला नसल्याने काबाडकष्ट करून गुजरान करु लागला. कटिंग सलून टाकले पण मन रमेना. वाचनाची प्रचंड आवड असल्याने कविता लेखनाकडे तो वळला आणि घरच्या गरिबीमुळे त्याच्या कवितेत अंगार फुलला. भाकरीच्या शोधात हा त्याचा पहिला दीर्घ काव्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. या काव्यसंग्रहाला शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार मिळाला. संचारबंदी हा लक्ष्मीकांतचा दुसरा काव्यसंग्रह. १९६० नंतरच्या दलित साहित्याच्या झंझावाताने समकालीन लेखक कवी कलावंत यावर प्रभाव टाकला त्यातून लक्ष्मीकांतही सुटला नाही. दलित शोषितांच्या व्यथा आणि वेदनेची अभिव्यक्ती लक्ष्मीकांतच्या कवितेत पदोपदी जाणवते. लक्ष्मीकांतच्या शब्दांचा वस्तरा शोषकांच्या तत्वज्ञानाची शेंडी छाटण्यासाठी सरसावला. भांडवली लोकशाहीने सामान्य माणसांची जी दुर्दशा केली त्याची चीड कवितेतून व्यक्त व्हायला लागली. ही चीड त्याला मार्क्स कडे घेऊन गेली. त्याला भगतसिंगांचे प्रचंड आकर्षण. फासावर लटकलेल्या भगतसिंगात त्याला स्वतःचा व्याकूळ प्राण अटकलेला दिसतो. मार्क्स गिरवताना पोथीनिष्ठ मार्क्सवादी त्याच्या पचनी पडले नाही. मार्क्स व आंबेडकर असा समन्वय साधताना कवीने तोल बिघडू दिला नाही. तो म्हणतो,

भगतसिंगा
तुझे बलिदान पसरावे दारादारात
डॉ. आंबेडकरा
तुझ्या विचाराने जातीयवाद
तुडवून निघावा मळ्यामळ्यात

जातीयवाद व भांडवलशाही यावर लक्ष्मीकांतची कविता घणाघात करते. एकीकडे तात्त्विक सौंदर्य लेवून या कवीच्या कविता प्रभावीपणे आपल्या समोर येतात तर दुसरीकडे हीच कविता अत्यंत उग्र रूप धारण करून वाचकाला अस्वस्थ करते. हा प्रतिभाशाली कवी सद्या आपल्यात नाही पण सर्वसामान्यांना उठाव करण्यास बाध्य करणारी त्यांची कविता भूक, बेरोजगारी, स्त्रीवरील अत्याचार, बेगडी स्वातंत्र्याचा समाचार घेत शांतीप्रिय बुद्धानुयायांना आवाहन करते,

डॉ. आंबेडकरांचा फडकता ध्वज
हातात घेऊन
एक संतप्त मोर्चा सर्वप्रथम
बुद्धाकडेच घेऊन जावा
बुद्धाच्या शांततेचा भंग करावा
आणि यापुढे आम्ही शांत राहणार नाही
असे निवेदन सादर करावे.
कवी असे अफलातून आवाहन का करीत असावा ? 

कवीला, बुद्ध नेहमी शांत असतात असे वाटते म्हणून की आंबेडकरी राजनेते ढिसाळ आहे म्हणून. कवी आवाहने, लिंबोणीतील अत्याचाराचा उल्लेख करतो, तो उत्तर भारतातील दलित हत्याकांडाचा हवाला देतो. असं सगळं होऊनही आंबेडकरी माणूस शांत कसा असे त्याला वाटत असावे. स्वातंत्र्य हे कोणत्या गाढवीचे नाव हे काल नामदेव ढसाळ बोलले नि आज , स्वातंत्र्य म्हणजे नुकत्याच अॅबाॅर्शन करून आलेल्या कुवाऱ्या पोरीने, पोटच्या अर्भकाचा घेतलेला बळी, असं घुमे बोलतो. हे स्वातंत्र्यच बजरंगींच्या हातात शस्त्र देत असेल तर आम्ही गप्प राहून चालणार नाही. पक्षी सुद्धा एका झाडाला बांधील राहात नाही, ते बंड करतात पण आपण माणसं असूनही आपली मुक्ती कोणत्या धर्मशाळेत आपण बंदिस्त ठेवली आहे असा प्रश्न कवीला पडतो. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही माणसं जातीच्या पोत्यात कणसं भरल्या सारखी राहत असतील आणि जातयुद्धाची जमीन तयार करीत असतील तर लढलेच पाहिजे, कसेही करून.....! लक्ष्मीकांत म्हणतो...


मी पेटवतोय सुरूंग


मी पेटवतोय सुरूंग
तुम्ही मला बारुद आणून द्या.
माझ्या वस्तीत निष्पाप लेकराचे बळी जातात
जवान पोरीला रस्त्यात घेराव होतात
मी त्यांना 
डायनामाईट पेरण्याचे शिक्षण देणार आहे.
पूर्वी चिंध्या विकून
चार पैसे कमविणारी बाई
किंवा मिल सुटल्यानंतर
चिंध्यात झाकलेली आई
आणि कडेकपारीतल्या वावरातून
येणाऱ्या माझ्या बहिणी
मी कोणाकोणाच्या शोकांतिकेचे निवेदन
इथल्या व्यवस्थेच्या गळ्यात अडकवू ?
उद्ध्वस्ततेच्या टोकावर येऊन 
ठेपलेलं आयुष्य घेऊन
कोणत्या दिशेनं जाऊन करू
पार्लमेंटचा पाठलाग
इथली माणसं सुखी समाधानी नाहीत
म्हणून 
माणसांनी पाहू नये माणसांचा अंत
माणसं भडकली की
देश भडकायला उशीर लागत नाही.


--------------------------------------------------------