वैशिष्ट्यीकृत पोस्ट

निपून सभी शस्त्रों में हम !

  ना मशीनगन में ही कौशल  निपून सभी शस्त्रों में हम ! डिसेंबर १९४७ : पुंछ,कोटली,झांगर, राजौरी,माचोई आणि नौशेरा उंच हिमालय पर्वतावरील एक ब...

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांचे सुरक्षा कवच : अनुच्छेद ३२

भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांचे सुरक्षा कवच : अनुच्छेद ३२


२०२१ मध्ये जयभीम नावाचा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९३ मधील एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये न्यायमूर्ती के. चंद्रू यांनी लढलेल्या एका खटल्याचा समावेश आहे. हा खटला इरूलर नावाच्या आदीवासी जमातीतील एक जोडपे संगनी आणि राजकन्नू यांच्याशी संबंधित आहे. राजकन्नूला तमिळनाडू पोलीस अटक करतात, आणि नंतर तो पोलीस ठाण्यातून बेपत्ता होतो. संगनी आपल्या पतीसाठी न्याय मिळवण्यासाठी चंद्रू या वकिलाची मदत घेते. मद्रास उच्च न्यायालयात चंद्रू हेबियस कॉर्पस खटला दाखल करतो आणि सत्य न्यायालयासमोर ठेवतो. 

     हेबियस कॉर्पस हा एकप्रकारचा रिट असून भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराच्या अनुच्छेद ३२ मध्ये वर्णित आहे. उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालयात अनेकदा हेबियस कॉर्पस रिट दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु न्यायालयीन खटल्यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. जयभीम या बहुचर्चित चित्रपटाने भारतीय संविधानात अंतर्भूत अनुच्छेद ३२ ची माहिती सार्वजनिक केली. 

    संविधानातील अनुच्छेद ३२ चे महत्त्व सांगताना संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, "ज्या कलमावाचून घटना निरर्थक ठरली असती असे सर्वात महत्त्वाचे कलम कोणते? असे जर कोणी मला विचारले तर कलम ३२ शिवाय दुसऱ्या कोणत्याही कलमाचा निर्देश मला करता येणार नाही." नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांना संविधानात्मक संरक्षण नसेल तर ते हक्क निरर्थक ठरतील, म्हणून कलम ३२ हे संविधानाचे ह्रदय आणि आत्मा आहे." असे बाबासाहेब म्हणाले.

         डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिस्वातंत्र्याचे भोक्ते होते. कोणत्याही वैधानिक कारणाशिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच त्यांना अमान्य होता. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा जन्मतः अधिकार आहे असे त्यांचे ठाम मत होते. केवळ हाडामांसाने जिवंत राहणे म्हणजे जगणे नव्हे. जगण्याचे बहुआयामी पैलू आहेत. संविधानाच्या अनुच्छेद २१ मधील 'जीवन' म्हणजे केवळ श्वास घेण्याची शारीरिक क्रिया नाही. हे केवळ प्राण्यांचे अस्तित्व किंवा जीवनात सतत कष्ट करत नाही. त्यात मानवी सन्मानाने जगण्याचा अधिकार, उपजीविकेचा अधिकार, आरोग्याचा अधिकार, प्रदूषणमुक्त हवेचा अधिकार इत्यादींचा समावेश होतो. 

     अनुच्छेद २१ मध्ये नमूद करण्यात आलेला मूलभूत अधिकार असा आहे, 'कायद्याद्वारे स्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज, कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित अथवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यांपासून वंचित केले जाणार नाही.'

       भारतात जाती, धर्म, पंथ, भाषा, पेहराव, रुढी, परंपरा, खानपानाची विविधता असल्यामुळे भारतीय संविधानाला साजेसा व विधायक आकार देणे कठीण कर्म होते. अधिक गुंतागुंत म्हणजे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांंच्यातील सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील शीतयुद्धाला विराम देऊन सर्व समाजातील लोकांच्या जीवन, व्यक्तिस्वातंत्र्य व मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. सर्व लोकांच्या मूलभूत हक्कांना संविधानात अंतर्भूत करणे हे महत्त्वाचे कार्य संविधानकर्त्यांनी केले. केवळ मूलभूत हक्क देऊनच ते थांबले नाहीत तर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी व्हावी म्हणून घटनात्मक उपाययोजना सुद्धा संविधानात सुनिश्चित करण्यात आली. भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क प्रदान करते जे घटनेच्या भाग ३ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क देखील अनुच्छेद ३२ नुसार एक मूलभूत हक्क आहे. घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या हक्काला संविधानाचा आत्मा असे संबोधले आहे. हे मूलभूत हक्क व या हक्कांचे संरक्षण कवच काय आहे ते पाहुया. सहा प्रकारचे मूलभूत हक्क नागरिकांसाठी आहेत.


१. समतेचा हक्क (अनुच्छेद १४ ते १८)
२. स्वातंत्र्याचा हक्क (अनुच्छेद १९ व २२)
३. शोषणाविरुद्धचा हक्क (अनुच्छेद २३ व २४)
४. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क (अनुच्छेद २५ ते २८) 
५. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (अनुच्छेद २९ व ३०)
६. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क (अनुच्छेद ३२)

२१(ए )सुधारित कायदा २००२ द्वारे घटनेत जोडण्यात आला होता, ज्यामध्ये अशी तरतूद आहे की राज्य कायद्याद्वारे ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत शिक्षण अनिवार्य करेल. या अधिकाराला व्यावहारिक स्वरूप देण्यासाठी संसदेत मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा २००९ मंजूर करण्यात आला. जो एप्रिल २०१० पासून लागू झाला. या सुधारित कायद्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा सातवा मूलभूत अधिकार भारतीय जनतेला बहाल करण्यात आला. व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेली आणि सर्व समाजाला देशाच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेणारी आधुनिक लोकशाही हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे भारतीय राज्यघटनेत जात, धर्म, संपत्ती, रंग, वंश, भाषा इ.पैकी कशाच्याही आधारे भेद न करता सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा सार्वत्रिक अधिकार आणि त्याचबरोबर इतर मूलभूत अधिकार देण्यात आले. लोकशाहीव्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय व्यवस्थेत हे शक्य नव्हते. " शोषणमुक्त मानवी सन्मानाने जगणे. अनुच्छेद २१ मध्ये अंतर्निहित मानवी सन्मानाने जगण्याचा हा अधिकार राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून आणि विशेषत: कलम ३९आणि कलम ४१ आणि ४२ च्या कलम (ई) आणि (एफ) मधून प्राप्त होतो. कामगार, पुरुष आणि स्त्रिया यांचे आरोग्य आणि सामर्थ्य यांचे संरक्षण आणि लहान वयातील मुलांचे अत्याचारापासून संरक्षण, मुलांना निरोगी रीतीने आणि स्वातंत्र्य आणि सन्मान, शैक्षणिक सुविधा, न्याय्य आणि मानवीय परिस्थितीत विकसित होण्याच्या संधी आणि सुविधा यांचा समावेश होणे आवश्यक आहे." ( न्यायमूर्ती पी.एन. भगवती, बंधुआ मुक्ती मोर्चा वि. युनियन ऑफ इंडिया )

    भारतीय नागरिकांचे जीवन आणि व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठीच अनुच्छेद ३२ व अनुच्छेद २२६ चा समावेश संविधानात करण्यात आला. 


अनुच्छेद ३२ नुसार सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क अशा प्रकारे अंतर्भूत आहे.


३२. या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याच्या उपाययोजना. 


(१) या भागाने प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याकरिता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे.


(२) या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणताही हक्क बजावण्याकरता समुचित असतील ते ते निदेश अथवा आदेश अथवा देहोपस्थिती (हेबियस कॉर्पस), महादेश (मॅडॅमस), प्रतिबंध (प्रोहिबिशन), क्वाधिकार (को वॉरंटो) व प्राकर्षण (सर्शिओराराय) या स्वरूपाच्या प्राधिलेखांसह प्राधिलेख काढण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार असेल.


(३ ) खंड (१) व (२) द्वारे सर्वोच्च न्यायालयास प्रदान केलेल्या अधिकारांना बाध न येता, खंड (२) अन्वये सर्वोच्च न्यायालयाला वापरता येतील असे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार अन्य कोणत्याही न्यायालयाला आपल्या अधिकारितेच्या स्थानिक सीमांच्या आत संसद कायद्याद्वारे अधिकार प्रदान करू शकेल.


(४) या संविधानाद्वारे अन्यथा तरतूद केलेली असेल तेवढी वगळता, या अनुच्छेदाद्वारे हमी दिलेला हक्क निलंबित केला जाणार नाही.

      अलिकडे साधनवंचित व साधनसंपन्न समूहातील दरी वाढत असून खासगीकरणामुळे कंत्राटसंस्कृती भयावह स्वरूपात दृग्गोचर होत आहे. अशा काळात भारतीय लोकांचे जीवन व त्यासाठी मूलभूत हक्कांसारख्या तयार करण्यात आलेल्या संविधानिक तरतुदी बाधित होऊ नये म्हणून संविधानाने न्यायपालिकेकडे ही जबाबदारी सोपविलेली आहे. कायदेमंडळ आणि कार्यपालिका जेव्हा जनतेच्या मूलभूत हक्कांच्या बाबतीत उदासीन असते किंबहुना त्या संस्थांकडूनच धोका निर्माण होतो तेव्हा अनुच्छेद ३२ व २२६ च्या आधारे मूलभूत हक्कांचे संरक्षण केले जाते. या कलमा नुसार जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. भारतीय संविधानाचे अनुच्छेद २२६ राज्यातील उच्च न्यायालयाला देखील या प्रकारचा अधिकार प्रदान करते. म्हणजेच भारतीय नागरिक सर्वोच्च न्यायालयात अथवा राज्याच्या उच्च न्यायालयात आपल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याकरिता दाद मागू शकतो. या दोन्ही कालामांतर्गत सर्वोच्च आणि उच्च न्यायालये काही साधनांचा वापर करतात त्यांना प्राधिलेख (writ)  असे म्हणतात. देहोपस्थिती (हेबियस कॉर्पस), महादेश (मँडमस), प्रतिबंध (प्रोहेबिशन), क्वा धिकार (को वॉरंटो), आणि प्राकर्षण (सर्शीओराराय) हे ते प्राधिलेख होत.


१. देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्‍यक्षीकरण :  याद्वारे एखाद्या व्यक्तीची अटक ही कायदेशीर आहे की नाही ते तपासण्यासाठी न्यायालय शासकीय अधिकाऱ्यांना अथवा इतर व्यक्तींना अटक केलेल्या व्यक्तीस, न्यायालयात हजर करण्याचा आदेश देतात.


२. महादेश किंवा परमादेश : यानुसार न्यायालय शासकीय अधिकाऱ्यास अथवा शासकीय विभागास त्यांचे काम करण्याचा आदेश देतात.


३. प्रतिषेध किंवा प्रतिबंध : कनिष्ठ न्यायालयाकडून त्याच्या अधिकार क्षेत्राचे उल्लंघन झाल्यास वरिष्ठ न्यायालय त्यांना तो खटला चालवण्यास मज्जाव करतात.


४. अधिकार पृच्छा किंवा क्वाधिकार : या आदेशाद्वारे सदर अधिकार पदावर राहण्याचा आपणांस अधिकार आहे का प्रश्न न्यायालय विचारते. 


५. प्राकर्षण : या आदेशान्वये वरिष्ठ न्यायालय एखाद्या खटल्यासंबंधीची कागदपत्रे कनिष्ठ न्यायालयाकडून स्वतःकडे मागवू शकतात.

      

              डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला दिलेला हा अप्रतिम व अमूल्य असा उपहार आहे. मॅग्ना कार्टा म्हणजे स्वातंत्र्याची सनद. याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे व्यवस्थेवर कायद्याचे राज्य. जगातील लोकशाही व्यवस्थेच्या विकासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा इंग्लंडचा कायदेशीर दस्तऐवज आहे जो १५ जून १२१५ मध्ये प्रसृत करण्यात आला. मॅग्ना कार्टामध्ये इंग्लंडचा राजा जॉन याने सरंजामदारांना काही अधिकार दिले. काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करण्याचे वचन दिले आणि त्याची इच्छा कायद्याच्या मर्यादेत राहतील हे मान्य केले. या अंतर्गत, राजाच्या प्रजेचे काही अधिकार स्वीकारले गेले, ज्यामध्ये हेबियस कॉर्पस याचिकेचा समावेश होता. राजाने कायद्याचा आदर केला पाहिजे हा संकेत यात आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हा एकप्रकारे मॅग्ना कार्टाच आहे. भूतलावरील कोणताही व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे. तो वर्ण, वंश,भाषा आणि सर्व अंगाने सारखा आहे. कोणतीही व्यवस्था या माणसाचे भेदभावाच्या तत्त्वाधारे स्तरीकरण करू शकत नाही. १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी सर्वव्यापक मानवाधिकारांची घोषणा केली. त्यामुळे १९५० पासून १० डिसेंबर हा ‘ मानवाधिकार दिन ’ म्हणून जगभर साजरा केला जातो. १० डिसेंबर १९४८ मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा काढण्यात आला. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्या मध्ये एकंदर ३० कलमे नमूद करण्यात आली होती. समकालात ही सर्व कलमे भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आली हे विशेष आहेच किंबहुना ते भारतीयांना भूषणावह सुद्धा आहे. संविधानातील अनुच्छेद २१ व ३२ नुसार न्यायपालिका न्याय देईलच पण, आम्ही भारताचे लोक या आमच्या हक्कांची व या हक्कांच्या घटनात्मक उपाययोजनांची माहिती करून घेणार आहोत की नाही? भारतीय उद्देशिकेतही (Preamble) लोकांचे जीवन व व्यक्तिस्वातंत्र्याला जाणीवपूर्वक अधोरेखित करण्यात आले आहे. 

   आम्ही भारताचे लोक संविधान स्वतःप्रती अर्पण करताना उद्देशिकेत म्हणतो," आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता " असे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ संविधानाने व्यक्तीची प्रतिष्ठा ही लाखमोलाची मानलेली आहे. प्रसिद्ध वकील, समाजसुधारक आणि भारतीय संसदेचे सदस्य पंडित ठाकूर दास भार्गव यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेला संविधानाचा आत्मा म्हटले होते. न्यायमूर्ती पी.एन.भगवती यांनी सुद्धा ,“एखाद्या व्यक्तीला मानवी सन्मानाने जगता यावे यासाठी या किमान गरजा अस्तित्वात असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही राज्याला केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारला या मूलभूत गोष्टींच्या आनंदापासून वंचित ठेवणारी कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार नाही." असे म्हटले.

   एडीएम जबलपूर विरुद्ध एस.शुक्ला [xcviii] , ज्याला हेबियस कॉर्पस केस म्हणून ओळखले जाते, यात सर्वोच्च न्यायालयाने असे मानले की "अनुच्छेद २१ हे जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे एकमेव भांडार आहे." समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुभाव या मूल्यांवर अधिष्ठित भारतीय संविधानाने मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार, सरकारी व संवैधानिक संस्थांची कर्तव्ये, मूलभूत अधिकार , मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट तयार केली. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. प्रस्तुत लेखातून संविधानातील जीवन व व्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षक अनुच्छेद ३२ यावर प्रकाश टाकलेला आहे. जयभीम चित्रपटाने अनुच्छेद ३२ ची ओळख करून दिली परंतु भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत ही त्यांच्या हक्कांची सनद पोहोचेल असे उपक्रम राबविले पाहिजे.


                                  -  ॲड. आनंद गायकवाड 

                                                  9422167299

रविवार, २५ जून, २०२३

कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!

 कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!



                क्रिकेट विषयी बरेच जण बोटं मोडताना दिसतात. मोजकेच देश हा खेळ खेळतात. मला क्रिकेट हा खेळ आवडतो, हे सांगायला काही लाज वाटण्याचे कारण नाही. अगदी विद्यार्थी दशेपासून मी क्रिकेट पाहिले.( खेळलो सुद्धा ). क्रिकेट मधील काही क्षण मला फार भावले. विश्वनाथ सारख्या कोवळ्या बुटक्या पोराने शतक ठोकल्या बरोबर त्याच्या पेक्षा दीडपट उंच असणाऱ्या टोनी ग्रेग ने त्याला कवट्यात धरून वर उचलले तो क्षण मला जागतिक सौहार्दाचा क्षण वाटला. दिवसभर वन डे खेळून फक्त ३६ धावा काढून नाबाद राहणाऱ्या सुनील गावसकरची चीडही आली. चंद्रा बेदी प्रसन्नाच्या फिरकीचे वादळ पाहिले. सैय्यद किरमानीचे लाजवाब यष्टिरक्षण. एकनाथ सोलकरचे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण. डॉन ब्रॅडमनच्या शतकांशी  सुनील गावसकरच्या शतकांची स्पर्धा. कपिलदेवचे मुंगूस बॅटने मारलेले आडवे फंटे आणि त्याच्याच कप्तानीमध्ये टीम इंडियाने जिंकलेला विश्वकप हा कळस होता. कपिलदेव क्रिकेट मधील माझा आवडता खेळाडू. विश्वचषकातील झिम्बाब्वे विरुद्ध ठोकलेल्या त्याच्या नाबाद १७५ धावा व अंतिम सामन्यातील व्हिव्हियन रिचर्ड्सचा अशक्यकोटीतील झेल आपल्या हातात विश्वचषक देऊन गेला. या विश्वविजयासाठी आम्ही बॅंड लावून मोहल्ल्यात फेरी मारली होती. नंतरच्या काळातील अब्दुल कादर सारख्या फिरकी पटुला मनमुराद ठोकणारा सचिन पाहिला. चेतन शर्माला अंतिम चेंडूवर सामना जिंकून देणारा जिद्दी जावेद मियांदाद, अझहरची लागोपाठ तीन शतके, विनोद कांबळीचा वादळी खेळ, सेहवागचे त्रिशतक, मायकल होल्डींग, अँडी रॉबर्ट्स, डेनिस लिलीची तुफानी गोलंदाजी, व्हिव्हियन रिचर्ड्स, ब्रायन लाराचा झंझावात, चेंडूवर लागलेला माईक गॅटिंगच्या नाकाच्या हाडाचा  चिपोरा, रमण लांबाचा मैदानावरील मृत्यू......असे असंख्य क्षण स्मृतीत आहेत. फुटबॉल सुद्धा मला आवडतो. दिएगो मॅराडोना, नेयमार, मॅस्सी, रोनाल्डो, बॅकहॅम, जिनेदीन झिदान यांचा खेळ मी पाहिला. नेयमार माझा आवडता खेळाडू. मला लॉन टेनिसही आवडते, अगदी पुर्वी पासून. जॉन मॅकेन्रोची सर्विस तुफानच. जिमी कॉनर्स, बोरीस बेकर, एडबर्ग, फेडरर, नदाल, जोकोविच,मरे यांचे पदलालित्य व फटके म्हणजे मेजवानीच.बियान बोर्ग व बिली जीन किंगचे सामने पाहायला मिळाले नाहीत पण मार्टीना नवरातिलोवा विरुद्ध गॅब्रिएला सॅबाटिनी विरुद्ध सौंदर्यवती स्टेफी ग्राफ यांच्या सामन्यात चुरस असायची,ॲना कुर्निकोव्हा पाहिली. ग्रॅन्ड स्लॅम मध्ये पहिल्यांदा अपसेट घडवून आणून विंबल्डन जिंकणारे मायकेल चँग व अरांझा सांचेज अजूनही लक्षात आहे माझ्या. खेळ माणसाला जवळ आणतो. देशालाच नव्हे विश्वालाही मिठीत घेतो. बाळू पालवणकर या चांभार समाजातील कर्तबगार क्रिकेटपटूचा सत्कार खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. खेळात जात धर्म पाहिला जात नाही पण पालवणकर बंधूंच्या बाबतीत तो पाळल्या गेला. भारतीय खेळाडू जातीधर्माच्या प्रभावाखाली असायचे. अलिकडे हा प्रकार कमी झाला. पण क्रिकेट मध्ये लॉबिंग चालतेच आणि क्रिकेट शिवाय इतर खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही ही खंत आहेच. छोटासा क्रोएशिया फुटबॉल वर्ल्डकप फायनल मध्ये पोहचतो आणि १३५ करोड लोकसंख्या असलेल्या देशात एक सक्षम टीम तयार होत नाही हेही दुःख आहे. ऑलिम्पिक मध्ये आपला नन्नाचा पाढा आहे.  भोयाचा पोरगा मासळी सारखा पोहतो, भिल्लाची तिरंदाजी व भालाफेक लाजवाब असते, पारध्याच्या पोरासारखं कुणी धावतं का ? रबर सारखे लवचिक शरीर असलेली डोंबारीची पोरगी तारेवर कसरत करताना आपण पाहतो ना? अशा अनेक जाती आहेत ज्यांच्या जीन्स मध्येच खेळ आहे. फक्त त्यांना प्रशिक्षण हवंय. पण असा " जातीचा " विचार कुणी करीत नाही. सरकार तर नाहीच नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे खेळ देशभावनेला पुरक आहे.  मुसलमान मोहम्मद सिराज जेव्हा हिंदू ऋषभ पंतच्या पाठीवर हर्षातिरेकाने बसतो तेव्हा एक अतूट भारत जन्म घेतो. देश जिंकल्याचा आनंद तुमच्या जातीधर्माच्या पलिकडचा असतो हे ' पंत - सिराज ' च्या फोटोवरून आपल्या लक्षात येईल. ज्यांना असा एकजीव झालेला देश नको आहे ते सतत जयकारे लावून एकमेकांना टार्गेट बनवत असतात.  सद्यःस्थितीत हिंदू-मुस्लीम-दलित असा हंगामा सुरू आहे. तरीही देशबुडव्यां टिनपाट लोकांना, पक्षपाती मिडियाला व फडतूस राजकीय धेंडांना भीक न घालता देशावर प्रेम करणाऱ्यांनी आपले देशहिताचे कार्य सुरूच ठेवले पाहिजे. आज आपल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकासाठी कपिलदेवच्या नेतृत्वातील टिमला सलाम! कपिलदेव तुस्सी ग्रेट हो भाई!
जयभीम !

- आनंद गायकवाड

गुरुवार, १५ जून, २०२३

बलिदानाचं कफन डोक्याला बांधून

बलिदानाचं कफन डोक्याला बांधून
झेंड्यासह दांडा हातात घेऊन आम्ही !


- आनंद गायकवाड

--------------------------------------------------------------------------

कार्यकर्ते कधी निराश होतात तर  काही तग धरून राहतात, पण ये जीना भी क्या जीना है यार,असं टोचून त्याचंच आयुष्य त्याला बोलतं असतं. जगावं तर लागते, चार घासाची सोय करण्यात त्याची फरफट होते.  मजुरीच्या भरोशावर कधीतरी तो आपला परिवार उभा करतो. बायकोसह धबधब्याच्या फव्वाऱ्यात चिंब भिजण्याचा आनंद त्याला मिळत नाही मात्र फुटलेल्या कवेलूतून , टिनपत्र्यातून गळणारे धबधबे घरातल्या भांड्यात जमा करण्याची कवायत त्यांना करावी लागते. कमी अधिक प्रमाणात कार्यकर्ते असेच जगतात आणि या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर लाथ देऊन नेते पद, प्रतिष्ठा व पैशाचे पहाड बनतात.
--------------------------------------------------------------------------

दोस्ता ! आजही तू रस्त्यात उभा आहेस
झेंडा हातात घेऊन
म्हणून मी शीतल हवेत बसून
कविता लिहितोय.

अरुण काळे या पँथर ,मास मुव्हमेंट असा चळवळीचा प्रवास करून नोकरीत स्थिरावलेल्या कार्यकर्त्या कवीच्या खंत या कवितेतील ही कबुली आहे. अरुण आता नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा झेंडा हातात घेऊन शासन, प्रशासन व जातियवादी मनोवृत्तीच्या समूहाला भिडणारा हा कार्यकर्ता नावाचा प्राणी सर्वबाजूंनी टोचून टोचून मारल्या जाताना आज दिसतोय.

दोस्ता ! तुझ्यामुळे निर्विघ्न सावली भोगणारे
कृतघ्नपणे तुला बोल लावतात.

ही बोलकी ओळ कार्यकर्त्यांची अवस्था विशद करायला पुरेशी आहे. कुणी त्याला वर्गणीचोर म्हणतो तर कुणी मवाली. कुणी दलाल म्हणतो तर कुणी सेल्समन. कुणी भाकऱ्या तर कुणी बेवडा म्हणून त्याचा उद्धार करतो. कार्यकर्त्यांच्या अश्रू, घाम, रक्त सांडण्यातून ज्यांचे जीवन सुखमय व गाल गुलाबी झाले ते लेखणीबहाद्दर सुद्धा लेखणीने त्याची चामडी सोलतात. त्याचा दोष एवढाच की ऐन तारुण्यात त्याचा ट्रॅक बदलला. आपल्या बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठताना त्याला आपल्या भविष्याचेही भान राहिले नाही. शिक्षण सुटले, नोकरी नाही, दिवसरात्र समाज... समाज... समाज. शेजारची मधुबाला, तेरी दो टकियाँ दी नौकरी में मेरा लाखों का सावन जाये , म्हणत म्हणत कायमची दूर जाते. कार्यकर्ता आपली शबनम लटकवून पुन्हा सडकेवर उतरतो आणि आकाशात समग्र क्रांतीचे स्वप्न रंगवत बसतो. जशी गरिबी बालपण मोडीत काढते तसे आंदोलनही तारुण्य हिरावून घेते. कार्यकर्त्याला चालता फिरता मिळणाऱ्या शेकडो जयभीमची कमाई सोडली तर जयभीम करता करता टाचा घासून मरणे त्याच्या वाट्याला आलेले मी पाहिले आहे.

पॅंथर दिवे लागण्या आधी
घरी परतलेलं बरं !
कुठल्या चौकात;
केव्हा दगडफेक होईल
सांगता येत नाही.

अनिल कांबळे या कार्यकर्त्या कवीची ही भीती आणि खबरदारीही. पँथरच्या कार्यकर्त्यांचे बलिदान आपल्या सर्वांना माहिती असेलच. त्यासाठी पँथर भागवत जाधव आठवावा लागेल. कार्यकर्ते कधी निराश होतात तर  काही तग धरून राहतात, पण ये जीना भी क्या जीना है यार,असं टोचून त्याचंच आयुष्य त्याला बोलतं असतं. जगावं तर लागते, चार घासाची सोय करण्यात त्याची फरफट होते.  मजुरीच्या भरोशावर कधीतरी तो आपला परिवार उभा करतो. बायकोसह धबधब्याच्या फव्वाऱ्यात चिंब भिजण्याचा आनंद त्याला मिळत नाही मात्र फुटलेल्या कवेलूतून,टिनपत्र्यातून गळणारे धबधबे घरातल्या भांड्यात जमा करण्याची कवायत त्यांना करावी लागते. कमी अधिक प्रमाणात कार्यकर्ते असेच जगतात आणि या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर लाथ देऊन नेते पद, प्रतिष्ठा व पैशाचे पहाड बनतात. 

       काही दुसऱ्या प्रकारचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या उपकारामुळे अनेक बाबुसाहेब जन्माला आलेत. आयुष्यभर नोकरी चाकरी करतांना जे कधी समाजाकडे ढुंकूनही पाहत नाही. जात लपवतात, सामाजिक कार्यासाठी श्रम व पैसाही देत नाहीत ते निवृत्त झाल्यावर कोणत्यातरी धार्मिक संघटनेशी जुळवून घेतात आणि गुडघेदुखीच्या या वयात शूभ्र वस्त्र घालुन गुडघ्यावर वाकून नमो तस्स करताना आढळतात. किंवा राजकीय संधान साधून थेट पदाधिकारी होतात. हे कार्यकर्ते अलिकडे मोठ्या प्रमाणात आढळतील. 

मुरलीधर जाधवांनी जो कार्यकर्ता रेखाटला तो आपल्याला पँथर चळवळीपासून ते खैरलांजी हत्याकांड विरोधी आंदोलनात पाहायला मिळतो. नामांतर आंदोलनात हे कार्यकर्तेच कवी,लेखक सुद्धा होते. बरेचदा कवी आणि कार्यकर्ता एकच असतो. तो जे जगतो ते कवितेत मांडतो. 

त्याच्यासाठी.............

कविता होत असते
पावसात गळणाऱ्या झोपडीचं मजबूत छप्पर
शेवटी कविता असते.
पोटाला पालवं बांधून खडी फोडणारे असंख्य हात

अनिल कांबळे या कार्यकर्त्या कवीची ही रचना आहे. वाशीम जिल्ह्यातील पारडी टकमोर या गावात झोपडी नंबर बारा मध्ये तो मजुरी करणाऱ्या मायबापाच्या पोटी जन्माला आला. शिकताना दलित पँथरच्या प्रवाहात सामील झाला. जिंदाबाद मुर्दाबाद चे नारे द्यायला शिकला. नामांतराच्या आंदोलनात लाॅंगमार्च मध्ये सहभागी झाला. तुरुंगात गेला. पक्का कार्यकर्ता झाला. पेटलेल्या वर्तमानाचा पलिता हातात घेऊन खांद्यावरची शबनम सांभाळत मार्गस्थ झाला. आंबेडकरी चळवळीची वाट चालताना स्वतःचे भविष्य पायाखाली कधी दबले याची जाणीवच अनिलला झाली नाही. पोट भरण्यासाठी गुजरात मधील खाणीतील दगडं फोडतानाही जातियतेचे चटके बसलेच. तिथूनच अनिलच्या कवितेचा प्रवास सुरू झाला.

मी एक दरवेशी, आयुष्याचं अस्वल
घेऊन दारोदार फिरणारा
अनुभूतीची कविता उधारीत वाटणारा.

आपलं आयुष्य विषाचा प्याला झालंय याची खंत कवितेत व्यक्त करताना आपल्या सहचारिणी मुळे फाटलेलं आयुष्य शिवता आलं असं अनिल म्हणतो. उसवलेल्या  कार्यकर्त्यांच्या वाट्याला सुई दोरा घेऊन उभी ठाकलेली पत्नी नावाची एक माऊली असते ही एक जमेची बाजू म्हणायची. अनिलच्या कविता उशिरा प्रकाशित झाल्यात. मित्रांनी पुस्तक प्रकाशनासाठी दिलेले पैसे अनिल ने कविता नावाच्या मुलीच्या लग्नासाठी कामी लावले. कविता कागदावरच राहिली. ज्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला ते भराभर व भाराभार लिहिते झाले. पण माझी भाकरीचा प्रश्न सोडविण्यात अर्धी जिंदगी बर्बाद झाली. अशी खंत ते व्यक्त करतात. झोपडी नंबर बारा, हा अनिलचा काव्यसंग्रह अखेर प्रकाशित झाला. कार्यकर्ते कसे जगतात , कार्यकर्त्यांचा वापर करून नेते कसे मोठे झालेत यावर प्रकाश टाकताना स्वतःच्या आयुष्याचा आलेखही ते कवितेतून चितारतात. आंबेडकरी चळवळीशी निष्ठा ठेवून ते प्रतिक्रियावाद्यांवरही तुटून पडतात. 

गांधीजींच्या काठीला धरून
संघवाल्याची चड्डी सांभाळत बसणारा
या ग्लोबलायझेशनच्या काळात
मी अविरत चालतच जाणार
मनुच्या पिलावळीला पायाखाली तुडवत.

असा निर्धार अनिलची कविता व्यक्त करते. ब्राह्मणवाद व भांडवलशाहीच्या अनैतिक संबंधातून जन्माला येऊ घातलेली चड्डीवाल्यांच्या स्वप्नातील महासत्ता वांझ ठरली असून ही महासत्ता कुणाची रखेल आहे असा जळजळीत सवाल अनिल करतो. या कवितेला वर्तमानातील धोके माहीत आहेत तर भविष्यातील संकटांची चाहूल लागलेलीच आहे म्हणून ती मुक्याचे सोंग घेऊन मख्खपणे रिलायन्सच्या टॉवरवर उभ्या असलेल्या वांझ महासत्तेवर शरसंधान करते. स्वतःच्या आयुष्याशी दोन हात करताना , खांद्यावरची शबनम व हातात पकडलेला चळवळीचा झेंडा सांभाळून अनिल कांबळे शब्दांचे भीमास्त्र चौफेर फेकतो. या माऱ्यात कार्यकर्त्यांचा वापर करून मोठे झालेले नेतेही सुटत नाही. नेत्यांना कार्यकर्ते मिळतच असतात. वर्षानुवर्षे नेत्यांचे आदेश शिरोधार्य मानून कार्यकर्ता आंदोलनात उतरतो, झेंडा घट्ट धरून ठेवतो, शत्रूंवर दांडाही चालवतो, प्रसंगी पोलिसांचे दंडुके खातो, तुरुंगात जातो, घरात चूल पेटली की नाही याकडे दुर्लक्ष करतो. नेता एकदिवस त्याला घराचा रस्ता दाखवतो.  अनिल गेला की नेत्याला अशोक मिळतो, अशोक सुटला की सिद्धार्थ मिळतो. कार्यकर्ते असे बर्बाद होत राहतात. आंबेडकरी म्हटल्या जाणाऱ्या संघटनेचा/ राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असा वाळीत पडतो. कार्यकर्ता निराशेच्या पेल्यात बुडतो तरी शत्रूंच्या झुंडीवर फेकण्यासाठी दगड हातात घेतो. नव्यानेच शुभ्र वस्त्र परिधान करून धम्ममय झालेली नीतीमान व शीलवान मंडळी कार्यकर्त्याला बेवडा संबोधून बौद्ध मानण्यासही नकार देते. दलितांच्या उद्योगपतींनी उभी केलेली संघटनाही उद्योजक कार्यशाळेकरिता  कार्यकर्त्यांसाठी दारे बंद करते. सगळीकडून टाकल्या गेलेला हा कार्यकर्ता नवा अस्पृश्य म्हणून आकार घेऊ लागतो. आयुष्यात गमावलेल्या वेळकाळाचे गणित जुळवत शिल्लक राहिलेल्या बाकीतील शून्य, शून्यात पाहत पाहत शून्यातच विलीन होऊन जातो. कार्यकर्त्यामुळे नेत्यांचं जीवन बदलते, आंबेडकरी कार्यकर्ता बदललेल्या नेत्याला कवितेच्या कठड्यात उभा करतो, अनिलने ही तसेच केले....बघा ! 

बदल


आमच्या अस्तित्वाला छेद देऊन
तुमच्या खिशासह पोटाचा आकार वाढत गेला
आम्ही आमच्या पोटाचा
विचार न करता
तुमच्या पाठीमागं
बलिदानाचं कफन डोक्याला बांधून 
झेंड्यासह दांडा हातात घेऊन.

जागतिकीकरणाच्या रेट्यानं
वाढला तुमचा वेग.
लयभारी तुमची क्रेझ, बिझी तुमचं नेटवर्क
वेबसाईट तुमची होत नाही ओपन
सदानकदा असता तुम्ही नाॅट रिचेबल
कधीतरी मला मॅसेज येतो
नाऊ आय एम अनेबल

कालपरवा तुमच्या वाढदिवसाचा 
डिजिटल बॅनर चौकात झळकला
ईमेल ॲड्रेसवर तुमच्या 
बेस्ट कॉम्प्लीमेन्ट्स आल्याच असतील 
मी पोस्टानं पाठवलेल्या पत्राची
पोच मात्र आलीच नाही, नेव्हर माईन्ड

तुमची आठवण कायम राहावी म्हणून
वाढदिवसाचं डिजीटल बॅनर
मी आणलं घरी
आडवं बांधलं घराच्या कमजोर छतावर 
पावसाळ्यात आधार मिळावा म्हणून.

- अनिल कांबळे


शनिवार, १० जून, २०२३

जातिश्रेष्ठत्वाची स्पर्धा ? भाग चार !

             हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने आचरण अनुभव घेऊ.परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे. तो व त्यांच्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत. व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनांत देखील न येवो. -- मुक्ता साळवे       

           बौद्ध अथवा महारांच्या विरुद्ध ज्या पोस्ट मी फेसबूकवर पाहिल्यात त्यांचे प्रोफाईल तपासले असता त्यातील बहुतांश व्यक्ती मला जय श्रीरामवाले  भाजपाई आढळलेत. हिंदू मांग असण्याचा गर्व सांगून हे व्यक्ती महारांवर घसरलेत. सोबतच ते बाबासाहेबांना प्रश्नांकित करू लागलेत. बाबासाहेबांमुळे आम्हाला शिक्षण मिळाले नाही असा त्यांचा कांगावा पहायला मिळाला. बाबासाहेबांना कुणी शिकवले असा प्रश्नही ते नाक वर करून विचारतात. जणू हिंदू ब्राह्मणांनी मातंग समाजाला विशेष वागणूक देऊन शिक्षित केले असा या काही मातंगांचा समज असावा. ब्राह्मण वर्ग शुद्रांनाच शिक्षणाता हक्क द्यायला तयार नव्हता तिथे अस्पृश्यांना काय शिक्षण मिळणार ? पेशव्यांच्या काळात तर मनुस्मृतीचाच अंमल होता. हाच प्रभाव पुढे इंग्रजांच्या काळातही होता. पुढारलेल्या जाती आपल्या विरोधात जातील म्हणून ब्रिटीशही वचकून होते त्यामुळे १८१३‌ ते १८५४ पर्यंत दलितांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला नव्हता. १८५५ ला पहिली शाळा इंग्रज सरकारने उघडली ती अहमदनगर मध्ये. सैनिकी कॅम्पात शिक्षण घेणारी सैनिकांची मुले असायची पण सार्वजनिक शिक्षण खुले झाले ते १८२३ नंतर. इंग्रज सरकार दलितांना शिक्षण देण्यास मागेपुढे पहात असताना, दलितांना शिक्षण दिले ते ख्रिश्चनांच्या मिशनरी शाळांनी. या शाळांना पुर्वी अनुदान सुद्धा मिळत नव्हते तरीही या शाळांनी अस्पृश्यांना विद्यादान दिले. हे अस्पृश्य लाभार्थी केवळ महारच नव्हते.  हिंदू मांग म्हणण्याचा ज्यांना गर्व वाटतो त्यांनी अस्पृश्य वर्गाच्या शैक्षणिक वाटचालीचा इतिहास वाचावा. १८८१-८२ मध्ये उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणारा एकही दलित व आदिवासी विद्यार्थी नव्हता. ८० टक्क्यांच्या वर ब्राह्मणादी पुढारलेल्या जाती प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणात अग्रेसर होत्या. केवळ ०.८७ टक्के दलित वर्ग प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणात होता. १९८२ ला म. फुलेंनी हंटर कमिशन ला दिलेली साक्ष व बाबासाहेबांनी १९२८ ला संवैधानिक आयोगाला दिलेले निवेदन, काही उपटसुंभ मांग बंधुंच्या मेंदुची कवाडे उघडायला पुरेशी आहेत, पण ते वाचतील तेव्हा ना!  सैनिकी कॅम्पातील शाळेत बाबासाहेबांनी शिक्षणाची सुरुवात केली. पुढे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातील योजनेच्या मदतीने बाबासाहेबांनी आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली. आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग त्यांनी दलितोद्धारासाठी करून घेतला. ब्रिटीश हे त्रयस्थ आहेत त्यांच्याकडून जितका लाभ मिळवता येईल तितका दलितांच्या पदरात पाडून घेतला. प्रसंगी ते ब्रिटीशांशी भांडलेत. पहिल्या गोलमेज परिषदेत त्यांनी ब्रिटीश पंतप्रधानासमोर सरकारची कानउघाडणी केली. या भाषणामुळे सयाजीराव फार समाधानी झालेत. आपल्या मदतीचे सार्थक झाल्याचे त्यांनी आपल्या  राणीला सांगितले. सयाजीरावांचे सामाजिक कर्ज असे फेडले बाबासाहेबांनी. केवळ शिक्षणच दलितांना या गर्तेतून बाहेर काढू शकेल असे बाबासाहेबांचे मत होते. फक्त भाषणे वा निवेदने देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी, मांग महारवाड्याच्या निरुत्साही वातावरणाच्या बाहेर येऊन दलितांनी शिकावे म्हणून धारवाड, मुंबई व अहमदाबादला वसतिगृहे उघडलीत.  हे वसतिगृह केवळ महारांसाठी नव्हते. धारवाडच्या वसतिगृहात पैसा नसल्यामुळे तीन दिवस विद्यार्थी उपाशी आहेत हे कळताच आजारी असलेल्या रमाईने स्वतःच्या चार सोन्याच्या बांगड्या हनमंतराव वराळेंना तोडायला दिल्या. त्या रकमेतून विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली. कसे फेडाल हे उपकार कृतघ्न झालेल्या हरामखोरांनो ? या वसतिगृहात महार , चांभार, मांग , भंगी असे सर्व अस्पृश्य जातीचे विद्यार्थी असायचे.  आपल्या बुद्धीवैभवाच्या जोरावर बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कांसाठी कर्मठ हिंदूच्या विरोधात लढे दिलेत. केवळ महार सक्षम व्हावा व मांग वंचित राहावा असा या लढ्याचा उद्देश होता काय ? महारांनाच या लढ्याची गरज होती व मांगांना सवर्ण हिंदू मांडीवर घेऊन सोन्याचा घास भरवत होते काय? पाण्याचा हक्क साबीत करण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी, शैक्षणिक अधिकारासाठी सतत संघर्षशील राहून बाबासाहेबांनी समतेचा मार्ग दलितांच्या पायाखाली खेचून आणला. सवर्ण व काँग्रेस विरुद्ध असताना सायमन कमिशन समोर दलितांच्या मागण्या हिरिरीने मांडल्यात. पुढे इधूनच राखीव जागांची वाट खुली झाली. पुणे कराराच्या काळात जो विरोध बाबासाहेबांना झाला तो कल्पनातीत आहे. अखिल अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क खेचून आणताना जर बाबासाहेबांना काही दगाफटका झाला असता तर महारांवर कुऱ्हाड कोसळली असती, मांग चांभार नामानिराळे राहिले असते. व्यक्ती तावून सुलाखून कोहिनूर बनतो, कष्ट उपसावे लागतात, त्याग करावा लागतो, कबीरांचा संयम, अशोकाचा निश्चय,  शिवरायाचा करारी बाणा, जोतीबांचा आसूड, शाहुंचा बेडरपणा आणि बुद्धाची करुणा अंगी जो बाणवतो तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतो. नेता बनायला देविदास कांबळेही निघाला होता, के.के. सकटाने भोपटकरांच्या नेतृत्वात पुण्यात मातंग परिषद भरवून बाबासाहेबांना विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला पण काही मातंग बांधवांनी या परिषदेचा फोलपणा दर्शविणारे पत्र दीनबंधू वृत्तपत्राकडे पाठविले, त्यात ते म्हणतात, " त्या ठिकाणी आमच्या नावावर पोट भरणारे वायदंडे हे भटाच्या वतीने चालून‌आमचा मातंग समाज रसातळास जावा असा एक त्यांचा अंदाज दिसत आहे. तरीपण आमच्या मातंग वीरांनी थोडक्यात सावध राहून लोकांच्या भरवशावर न राहाता, आपल्या पायावर उभे रहावे हे आद्य कर्तव्य होय. "  या पत्रात वायदंडे व सकट यांना मातंग समाज फुकटही विचारत नाही, असे नमूद करून आपणच आपली गळकी घरे शाकारून घ्यावी मात्र दुसऱ्यांवर विसंबून राहू नये असा सल्लाही या पत्रात देण्यात आला आहे. या पत्रावर सिताराम‌ बाबाजी लांडगे, जानो बाबाजी भिंगारदेव, श्रीनाथ सदाशीव वैराठ, तुकाराम लक्ष्मण ढकपाळ व भिकाजी रामजी गायकवाड यांच्या सह्या आहेत. या पत्राच्या शेवटी हे मातंगवीर म्हणतात, "आमचे विद्वान रा.रा. डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची गदा नकली वीरांचे मांडीवर बसल्याखेरीज राहणार नाही. "    
           काल जे भोपटकरांचे होते ते आज गोळवलकरांचे नकली वीर बनून बौद्ध व मातंगात भांडणे लावण्याचे कृष्णकृत्य  करण्यासाठी  भुंकताहेत त्यांची मांडीच नव्हे तर पार्श्वभाग  फोडण्यासाठी अनेक मातंगवीर पुढे सरसावतील. माझ्या जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सारखणी गावामधील दीडशे मातंग कुटुंबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हेच खरे दुखणे आहे, या दुखण्यावरचा उपाय संघपरिवार शोधतो आहे. वस्ताद लहुजी साळवे यांना ते उपाय बनवू पाहताहेत पण लहुजींचा दांडपट्टा त्यांची शेंडी कापल्याशिवाय राहणार नाही, जोतीबांना सहकार्य करून आधीच त्यांनी शेंडीची वासलात लावली व मुक्ता ला लेखणी देऊन " आमचा धर्म कोणता ?" असा खणखणीत सवाल विचारायला लावला. मी हिंदू मांग आहे असे म्हणणाऱ्या नकली मातंगांना हा मुक्ताचा सवालच नंगा करील. पुढील भागात पाहू !

 -- आनंद गायकवाड 

वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील ?

वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील ?

सफाई कामगार अर्थात भारतातील भंगी समाज. हजारो वर्षापासून उच्चवर्णीयांच्या घाणीला साफ करण्याचे काम करताहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सफाईच्या कामाची निंदा केली आहे. " भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील . त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की , त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात पसरून ते सारी वस्ती नामशेष करण्यास कारणीभूत होऊ शकतील " [ बहिष्कृत भारत : २३ डिसेंबर १९२७ ] …. या विधानात त्यांचा धंदा " नीच ' आहे असा शब्द वापरण्यात आलेला आहे. यावरून असे म्हणता येईल कि बाबासाहेब सफाईच्या या धंद्याला उच्च मानीत नव्हते . महार वतनामध्ये गावात स्वच्छता ठेवण्याचे काम जे महारांच्या शिरावर ठेवण्यात आले होते ते कसे बेकायदेशीर आहे हे सांगतांना बाबासाहेब म्हणतात ठराव क्र. ६ … " गावात स्वच्छता ठेवणे हे महारांचे एक काम आहे असे ता. २८ जून १८८८ च्या ४२७३ च्या सरकारी ठरावाने ठरविण्यात आले. परंतु वतनदार कामदारासंबंधाच्या कायद्याच्या चौथ्या कलमाशी हा ठराव विसंगत आहे , तरी तो सरकारने ताबडतोब रद्द कारवां , अशी या परिषदेची आग्रहपुरःसर सुचना आहे " …ठराव क्र ७ …. " हे वतनदार कामदारासंबंधांच्या कायद्याच्या चौथ्या कालमावरून व सदरील ठरावावरून स्पष्ट होते . तरी महारांना रयतेच्या खाजगी कामाच्या जबाबदारीतून मुक्त करणे अवश्य आहे. असे या परिषदेचे मत आहे " [ बहिष्कृत भारत : २ सप्टेंबर १९२७ ] ' ठराव ताबडतोब रद्द करावा ' आणि " जबाबदारीतून मुक्त करणे " हे वाक्य सफाई कामाच्या निषेधाचे द्योतक आहे. सफाई काम अथवा भंगी काम , ' भंगी काम करणाऱ्या गर्भवती महिलेला आपल्या मुलासाठी सफाई कामगाराच्या पदाची भूल पडते ' अश्या आशयाचे उदगार बाबासाहेबांनी काढले आहे. हजारो वर्ष उच्चवर्णीयांची घाण साफ करण्याची भंगी समाजाची मानसिकता महात्मा गांधींना प्रिय होती. म्हणून त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाईच्या कामाचे उदात्तीकरण केले. भंगी समाजाने हे काम कधीच सोडू नये या साठी गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन भंगी समाजाला मानसिकरीत्या 'ब्लॅकमेल ' केले. नरेंद्र मोदी तेच करताहेत. हा कट्टर मनुवादी संघीय माणूस भंगी समाजाला उच्च पदे देऊ शकत नाही कारण त्याचा धर्म तशी मुभा देत नाही. त्याची धर्मसंसद समस्त दलितांच्या उत्थानाच्या विरुद्ध आहे. म्हणून तो भंगीकामाचे उदात्तीकरण करतोय. आमच्या गृहिणी किंवा आम्ही सफाई काम घरात करतोच पण …समाजकार्य म्हणजे फॅशन समजणारे , अंबानी , आमीर , अमिताभ इत्यादी गर्भश्रीमंत माणसे मोदीच्या या वर्णव्यवस्था मजबूत करण्याच्या आणि भंगीकामाच्या पावित्र्याच्या जातीयवादी कामात हातभार लावताहेत. फक्त एक दिवस सफाई करून ही माणसे पुन्हा शेकडो वर्ष भंगीलोकांना त्याच कामात गुंतवून ठेवण्याच्या कामात लागले आहेत. नरेंद्र मोदी म्हणतात … कलम को झाडू बनावो , आणि बाबासाहेब झाडूला कलम बनवायला सांगतात …. हाच फरक आहे गांधी, मोदी आणि बाबासाहेबांमध्ये. बाबांना झाडूवाला जज पाहायचा आहे आणि गांधी व मोदीला झाडूवाला भंगी जगाच्या अंतापर्यंत हवा आहे …कारण हाच हिंदू धर्मशास्त्रांचा संकेत व कायदा आहे जो कोणताही हिंदू स्वप्नातही तोडू शकत नाही आणि धर्ममार्तंड ते तोडू देत नाही. ज्या दिवशी वाल्मिकी आणि सुदर्शन समाजाला बाबासाहेब समजतील तेव्हा गांधी व मोदी जमीनदोस्त होतील. - आनंद गायकवाड

शुक्रवार, ९ जून, २०२३

जातिश्रेष्ठत्वाची स्पर्धा ? भाग तीन !

गेले मेले मनु पेशवे            आंग्लाई आली 
बंदी मनुची विद्या घेण्या      होती ती उठली ! 
ज्ञानदाते इंग्रज आले          विद्या शिकुनि घ्या रे 
ऐसी संधी आली नव्हती      हजार वर्षे रे ! 
असे गर्जूनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा 
परंपरेच्या बेड्या तोडुनि      शिकण्यासाठी उठा ! 

-- सावित्रीबाई फुले     


      अलिकडे मातंग समाजातील काही विद्वतजनांना पेशवाईचा फार पुळका आलेला दिसतो. वस्ताद लहुजी साळवेंचे पुर्वज पेशव्यांच्या बाजुने होते म्हणून पेशवाई खतम करणाऱ्या इंग्रजांवर आणि त्यांच्या सैन्यात असणाऱ्या महारांवर मातंग बांधवांचा विशेष राग आहे. वस्तुतः या सैन्यात मराठे, महार , मांग व पठाण सुद्धा होते. किंबहुना मातंग असलेल्या लहुजींनी लो. टिळक, सावरकर, चाफेकरादी पुढाऱ्यांना लाठीकाठी शिकवून इंग्रजांविरुद्ध उभे केल्यामुळे " आम्ही " देशभक्त व महार लोक देशद्रोही असा नथीतून तीर मारण्याचा उपदव्याप काही मातंगांनी चालविलेला आहे. हा केवळ देशभक्त व‌ देशद्रोही असा खेळ‌ नसून सनातनी उग्रवादी कट्टर ब्राह्मणी धर्माच्या पाठीशी मातंगांना उभे करण्याचा डाव आहे. त्यासोबतच ब्राह्मण्यवादाच्या विरोधात वैचारिक लढा उभारणाऱ्या बौद्धांच्या विरुद्ध त्यांच्याच मातंग बांधवांना उकसंविण्याचे षडयंत्र आहे.  या उठाठेवीतून संघपरिवार, बदनाम व अमानुष पेशव्यांना हिरो ठरविण्याचा प्रयास करताना दिसत आहे. गोडसेच्या बाबतीत हा खटाटोप सुरूच आहे.    

    या पेशव्याला सावित्रीबाईंनी " मनु पेशवा " असे संबोधित केले आहे. तर लहुजींची पुतणी मुक्ता साळवे पेशवाई संपल्याने काय काय बदल झाला व कशाकशाची बंदी झाली ते सांगते.  " शुरपना  दाखविणारे व् गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे,त्रिकमजी, आंधळा, पांसरा, काळ,  बोहार इत्यादि मांग महारांवर स्वारया  घालून विहिर भरित होते, व गरोदर बायकांसाहि देहांत शासन करीत होते, ती  बंदी झाली  आणि पुणे प्रांती मांग महारांचे कल्याण करणारे दयालु बाजीराव महाराजांच्या राज्यात असि अंधाधुंधी होती, कि ज्याच्या मनास वाटेल त्याने मांग महारांवर नाना प्रकारची तूफ़ाने घेवून शेंदाड़ शिपायासारखा जुलुम करीत होते, ती  बंदी झाली (किल्ल्याच्या ) पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंश ही वाढत चालला मांग महार यातून कोणी बारीक पांघरूण पांघरले असता, ते म्हणत कि याने चोरी करुण  आणिले हे पांघरूण तर ब्राह्मणानिच पांघरावे जर मांग महार  पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारित, पण  आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकानी (चा ) अपराध केला असता मांगाचे किंवा महारांचे डोके मारित  होते ती  बंदी झाली. जुल्मी बिगारी गेली अंगाचा स्पर्श होवू देण्याची मोकळीक कोठे कोठे झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू डांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. " -- आता बोला , हा घरचा आहेर मातंगांसाठी झणझणीत अंजन ठरणार नाही काय ?   पेशव्यांची कड घेउन इंग्रजांशी खेटे घेणाऱ्या लहुजींसोबत जोतिबा सावित्रींचे कसे पटले असेल ? केवळ लहुजी जोतीबांच्या पाठीशी नव्हते तर दक्षिणा कमिटीच्या वादाच्या ( हा‌ वाद फार मजेशीर आहे ) वेळेस २०० महार , मांग, चांभार जोतीबांच्या दिमतीला सशस्त्र उभे होते. जोतीबांच्या शाळेत मुलींना आणण्याचे काम जसे लहुजींनी केले तसे तेवढ्याच हिंमतीने मर्दगडी राणबा महारानेही केले. ज्या धर्मशास्त्रांनी मांगामहारांची दुर्गती केली त्या धर्मशास्त्राच्या बाजूने लहुजी कसे उभे राहतील ? जोतीबा, सावित्री व मुक्ता ज्या पेशवाईचे धिंडवडे काढतात ती पेशवाई लहुजींना कशी प्रिय असेल ? दोन भावात तेढ निर्माण करून एकमेकांना आपसात लढविण्यासाठी वस्ताद लहुजींना जाणीवपूर्वक तसे रंग तर देण्यात आले नसावे ना ? प्रबोधनकार ठाकरे या पेशव्यांना " पायपोस किमतीचे " म्हणतात. मुक्ता साळवे , पेशवाईनंतर जी संधी आली तिचा फायदा घ्यायला सांगते, इंग्रज सरकार मुळे काही मोजके ब्राह्मण बंधू मांगामहारांना शिकवायला तयार झालेत , ते जोतीबांनाही मदत करायचे, याचा उल्लेख करून ती पुढे म्हणते , "आमच्या प्रिय बंधूनी  मांग महारांच्या मुलांच्या शाळा  मांडल्या  आहेत व या शाळांना दयालु इंग्रज सरकारही मदत  करतात, म्हणून या मांडलेल्या शाळाना  फारच  सहाय आहे. अहो दरिद्राणी व् दुःखानि  पिडलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात,  तर तुमच्या बुद्धीला द्यानरूपी औषद दया,  म्हणजे तुम्ही चांगले दयानी होवून तुमच्या मनातील कुकल्पना जावून  तुम्ही नीतिमान व्हाल ,तर तुमच्या रात्रदिवस  ज्या  जनवाराप्रमाणे हजरया घेतात त्या  बंद होतील तर आता अभ्यास करा म्हणजे तुम्ही दयानी व्हाल कुकल्पना करणार नाही. "     

सन १८१३ मध्ये इंग्रजांनी  शिक्षण खुले केले होते. मांगामहारांना मात्र ब्राह्मणांचा जीवघेणा विरोध होता. इंग्रजी अंमल असल्यामुळे जोतीबा शिकू शकलेत. अस्पृश्यांंना शिक्षण घेण्यासाठी ज्या दिव्यातून जावे लागले ते वाचून अंगावर काटा उभा राहतो. इंग्रजी अंमलातच लहानग्या भीमरावने अक्षर गिरवले. ज्ञानाच्या अत्युच्च टोकावर भीमराव पोहचला आणि स्वतेजाने जग दिपवून टाकले. कुणी कुणाला महान बनवित नाही , व्यक्ती स्वकर्तृत्वाने मोठा होतो. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर , बाबासाहेब झालेत ; या नावाने अनेकांच्या लाठ्याकाठ्या, दांडपट्टे , गोलंदाजी, कलमबाजी , पोपटपंची व गांधीगिरी गळून पडली.  बाबासाहेबांनी केवळ महारच नाही तर अखिल अस्पृश्यांच्या भल्यासाठी सनातनी हिंदूशी दोन हात करताना तटस्थ असलेल्या इंग्रजांनाही खडे बोल सुनावले तर स्वतःला मांगाचा भावी पुढारी समजणार्‍या देविदास कांबळेचेही कान उपटले. तसेच अस्पृश्यांचा कट्टर दुश्मन असलेल्या भोपटकरांच्या नेतृत्वात मातंग परिषद घेणाऱ्या के.के.सकटाचा बॅन्ड,  बाबासाहेबांना आपला नेता मानणाऱ्या मातंगांनीच कसा वाजविला ...? ते पुढील भागात पाहू !

- आनंद गायकवाड 


जातिश्रेष्ठत्वाची‌ स्पर्धा ? भाग दोन !

तुमच्या मनातील अभिमान कोणत्या सैताना ने काढून नेला असेल.......? - मुक्ता साळवे ‌‌‌‌‌     


            देशभक्त लाला लजपतराय यांचे घराणे आर्य समाजिस्ट होते. त्यांचे भारतीय क्रांतिकारकांशी जवळचे संबंध होते तर हिंदी राजकारणातही त्यांचे मोठे नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट लालाजींसोबत अमेरिकेत झाली. लालाजींनी बाबासाहेबांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी विनम्रपणे त्यांना नकार देऊन आपले शिक्षण पूर्ण करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. त्यावेळी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पुढे समाजपरिवर्तनाची स्वतंत्र वाट चोखाळावी असे बाबासाहेबांचे मत होते. ही धारणा पक्की व्हायला , अमेरिकेच्या राज्यघटनेत गुलामगिरी प्रथेला मुठमाती देणारी  १४ वी दुरुस्तीची घटना घडणे व पीडित निग्रो समाजाचा तारणहार बुकर टी वाशिंग्टन याचे निधन या घटना कारणीभूत ठरल्या. बाबासाहेब व म. जोतीबा फुले यांच्यात साम्य दर्शविणारी बाब गुलामगिरी या ग्रंथातून जोतीबांनी मांडली. जोतीबा कसरत करायचे, दांडपट्टा व गोळी निशाण मारण्याचे शिकायचे त्यावेळेस " सुधारले भट " त्याना इंग्रजांविरुद्ध दंड थोपटण्यासाठी उकसावित होते. या प्रकारातून जोतीबांनी स्वतःची सोडवणूक करून घेतली. गुलामगिरी मध्ये धोंडिबा जोतीबांना प्रश्न करतो व त्याचे उत्तर जोतीबा देतात. हा संवाद मुळातूनच वाचला पाहिजे. 

धों. : --- तर मग तुम्ही लहानपणी दांडपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरिता करीत होता ? 

जो. :--- आपल्या दयाळू सरकारास पालथे घालण्याकरिता . 

धों. :--- परंतु तुम्ही असली दुष्ट मसलत कोठून शिकला..? 

जो. :--- चार सुधारल्या भट विद्वानांपासून. 
( हा संवाद लांबलचक आहे, जिज्ञासुंनी तो ग्रंथात पाहावा ) या संवादात जोतीबांनी सुधारल्या भटांचे वाभाडे काढले. टॉम्स पेन्स यांच्या ग्रंथांचा हवाला देऊन जोतीबांना इंग्रजांविरुद्ध चिथावण्याचा प्रयत्न भटांनी करून पाहिला. काही दिवस मी तसे वेडेचारही केले ,असे जोतीबा सांगून पुढे म्हणतात ," परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलो तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतींचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला." पुढे जोतीबा म्हणतात " इंग्रज लोकांच्या आणि तसल्या परोपकारी लोकांस म्हणजे आपल्यास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या लोकांस , आपल्या देशातून हाकून देण्याविषयी त्या विद्वानांची मसलत कोणाच्याने घेववेल ? असा कोण मूर्ख आहे की,ज्याच्याने आपल्या तारणाऱ्यावर आपला हात उगारवेल ? परंतु मी तुला सांगतो की, इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहीत, ते आपल्या जन्मास पुरतील म्हणोन कोणाच्याने खास करून सांगवत नाही. यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे , तोच आपण सर्व शुद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे. " इतकी स्पष्ट भूमिका जोतीबांची होती.  सामाजिक समतेच्या बाबतीत टिळकांची भूमिका कचखाऊच नव्हे तर कट्टर धर्माभिमानी होती.  इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंडाचे बोधामृत पाजणारे लोकमान्यपंथी, गुलामीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांच्या जीवनात ( अस्पृश्यच नव्हे तर अखिल शुद्रांच्याही ) जीवनात सुधार व्हावा यासाठी कोणतेच पाऊल उचलत नव्हते म्हणून जोतीबांनी सुधारल्या भटांना नाकारले. १८५७ च्या बंडाला जोतीबांनी भटपांड्याचे व भटनानांचे बंड म्हटले. हे बंड अयशस्वी झाले म्हणून ईश्वराचे आभारही मानले. साहजिक आहे, गाय व डुकराच्या चरबीचे निमित्त करून धर्म बुडाल्याची बोंब ठोकून सशस्त्र उठाव करणाऱ्यांनी ढोराडुकरांपेक्षाही नरकातले जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांकडून काय अपेक्षा ठेवावी ? अस्पृश्यांचा खरा पाठीराखा हा धन्य जोतीबा कसा भटशाहीला चिरंजीव होऊ देणार? महाड आंदोलनात अस्पृश्यांना मरेस्तोवर मारणाऱ्या स्पृश्यांना जेव्हा तुरुंगवासाची‌ शिक्षा झाली तेव्हा बाबासाहेब म्हणालेत " पेशवाई असती तर यांना शिक्षा झाली असती का ? उलट त्यांना निर्दोष सोडल्या गेले  असते व त्यांचा धर्मवीर म्हणून सत्कार झाला असता." आज लोकतंत्र असूनही साध्वी प्रज्ञा ठाकूर व तत्सम धर्मवीरांना सत्ताधारी कशी सन्मानजनक वागणूक देताहेत हे दिसतच आहे.  जर इंग्रजांचे राज्य नसते तर?    
   प्रत्येक आक्रमकांच्या दरबारी ज्यांच्या पूर्वजांनी आपल्या पोटापाण्याच्या सोयी करून घेतल्या, सर, रावबहादूर, दीवान बहादूर सारख्या प्रतिष्ठित पदव्या मिळवल्या, प्रत्येक परकीय सत्तेकडून सोयी सवलती पदरात पाडून आपल्या उद्योगांचे साम्राज्य उभे केले ते देशभक्त व हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्तता करून घेण्यासाठी धडपडणारे ते इंग्रजधार्जिणे ही बनवाबनवी आता चालणार नाही. म्हणून भिमा कोरेगाव घडविणारेही देशभक्तच व इंग्रज सरकारला दयाळू म्हणणारेही देशभक्तच ! वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे आपल्या " मांग महाराचे दुःख " या निबंधात म्हणतात,"हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ! हा जुलुम विस्तराने लिहू लागले तर मला रडू  येते. या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळु  इंग्रज सरकारास इथे पाठविले!"  जो कोणी वीर लहुजींचा आधार घेऊन शुद्रातिशुद्रांच्या संघर्षमय चळवळीला नख लावण्याचा प्रयत्न करेल तो निश्चितच उताणा पडेल. मुक्ता साळवे पुढे काय म्हणतात हे वाचून , पेशवाई म्हणजे केवळ महारांना जाचक पण मांगांना नाही असे म्हणणाऱ्यांची जीभ घश्यातच जाईल....पुढील भागात पाहू..

- आनंद गायकवाड