" तत्त्वज्ञांनी जगाचे केवळ निरुपण केले आहे, प्रश्र्न आहे तो जग बदलण्याचा ", हे कार्ल मार्क्स यांचे विधान प्रसिद्ध आहे. हे असे असले तरी अनेक मार्क्सिस्टांनी तत्त्वज्ञानाचे गुऱ्हाळ सुरूच ठेवले. पारंपारिक मार्क्सिस्टांचे गुढवादी व शब्दबंबाळ विचार प्रत्यक्ष संघर्षाकडे कानाडोळा करतात. गोलमोल विधाने करण्यात हे तत्त्ववेत्ते फार हुशार असतात. अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दाखले देऊन आंबेडकरी जनतेला आकर्षित करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. अधिक क्लिष्ट विधाने केली की , विद्वान समजले जाऊ असा यांचा समज असतो.
इतक्यात चेतना यावर एक विधानाधारित लेख वाचला. " चेतनेचा स्तर " यावर भाष्य करताना " नोकरदार वर्गाला दोष न देता त्यांच्या चेतनेच्या स्तराला दोष दिला पाहिजे " असा काहीसा उपदेश या लेखातून करण्यात आला.तसाच राजकीय,आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक बाबतीतही करण्यात आला. हा चेतनेचा स्तर जणू देहाशी संबंधित नाही असा लेखकाचा समज असावा. मला "शिकलेल्या लोकांकडून" ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत असे बाबासाहेब जेव्हा बोलतात तेव्हा ते शिकलेल्या लोकांतील चेतनेच्या स्तराला दोष देतात की प्रत्यक्ष त्या वर्गालाच देतात ? लोकांमध्ये चेतना ( जागरूकता ) निर्माण व्हावी यासाठी जी उर्जा खर्च व्हावी लागते त्यावर कोणतेच भाष्य लेखात नाही. मध्यम वर्गाने ही उर्जा कुठे दडपून ठेवली ? उर्जा व चेतना यांचा परस्परसंबंध आहे. हे विसरता येणार नाही.
प्रत्यक्ष जमीनीवर काम करणाऱ्यांसाठी बाबासाहेब हेच तत्त्व व व्यवहार आहे. त्यामुळे त्यांना अधिक तात्त्विक समुद्राचा तळ गाठण्याची गरज नाही. जगातील नामवंत लोकांनी त्यांच्या देशात बोलल्या जाणाऱ्या भाषेतच पुस्तके लिहिलीत. मार्क्सनी दास कॅपिटल जर्मनी, माओनी गुरिल्ला वॉरफेअर मॅन्डेरिन, व्हॉल्टेअरनी लेटर फिलाॅसॉफिक फ्रेंच, लेनिननी स्टेट ऑफ रिव्होल्युशन रशियन, मुसोलिनीनी डॉक्ट्रीन ऑफ फॅसिझम इटालियन या भाषांत पुस्तके लिहिली आहेत. कारण त्यांची राष्ट्रभाषा तीच होती. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात म्हणून विश्व भाषा असलेल्या बाबासाहेबांनी आपली पुस्तके इंग्रजीत लिहिलीत परंतु लाखो जनसामान्यांच्या समोर मराठीतच भाषणे दिली. सर्वसामान्य माणसांकडे वा कार्यकर्त्यांकडे जाणारे वर्तमानपत्र सुद्धा मराठीतच होते. कुठे कोणती भाषा वापरायची हे अनेक भाषा अवगत असणाऱ्या बाबासाहेबांना कळत होते. चला आपण इंग्रजी मध्ये भाषण देऊ , कालांतराने लोकं समजून घेतीलच, अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतली असती तर जनतेची सारी कला अचेतन झाली असती.
या देशाला खंडणमंडणाची फार मोठी परंपरा आहे. जडवादी व चैतन्यवादी, बौद्धमत व न्यायवादी, श्रमण व ब्राह्मण, जैनमत व आजीवक अशा अनेक वैचारिक वादाच्या फैरी इथे झडलेल्या आहेत. पण सामान्य माणसं जिथच्या तिथंच राहिली. सामान्यांसाठी तथागतांनी पायपीट करून धम्म रुजवला. वर्णव्यवस्था मोडित काढून शुद्रांनाही सत्ता प्राप्त करण्याची वाट मोकळी करून दिली. पण पुढे सम्राट अशोकाचा काळ सोडला तर अनेक बौद्ध विद्वान भिक्खूंनी तात्त्विक काथ्याकूट करून वज्रयान, तंत्रयान पर्यंत मजल मारली. त्यामुळे समाज कुठे पोहोचला ? जगाची पुनर्रचना करण्याच्या, धम्माच्या उद्देशालाच हरताळ फासल्या गेली.
तत्त्वज्ञानाच्या पुढची पायरी काय असते ? की तत्त्वज्ञानाच्या भोवताल फुगडी करत बसायची. प्रत्यक्ष कृतीचा काही आराखडा तयार केला आहे का ? की, सर्व चेतना चिंतामणीचे गावी...????
- आनंद गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा