एखादा प्रोफेसर लास्की या नेत्यांना चळवळ समजून सांगेल काय ?
आंबेडकर भवन पाडण्यास रामदास आठवले , राजेंद्र गवई , सुलेखा कुंभारे आणि जोगेंद्र कवाडे हे अनुकूल होते हे रत्नाकर गायकवाड यांनी सांगितले . हे ऐकून धक्काच बसला . जेव्हा चळवळ आणि पोटभरू अधिकारी यांच्यात लढाई सुरू होते तेव्हा चळवळीतल्या आठवले , कवाडे , कुंभारे आणि गवई यांनी चळवळीची बाजू घेतली पाहिजे पण हे राजकारणी फार विरुद्ध वागताहेत, अश्या प्रसंगी या आंदोलकांनी जनभावनेची कदर करून आणि लोकशाहीला सशक्त करण्यासाठी आपापले मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवून या फ्लॅशमारू अधिकाऱ्यांना धारेवर धरणे गरजेचे असतांना हे तकलादू नेते चळवळीच्या विरोधात गेले हा त्यांच्या बेअकली आणि मूर्खपणाचा पुरावा आहे . या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार मला महत्वाचे वाटतात , बाबासाहेब लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी म्हणतात ", दुसरे एक उदाहरण मी देतो . आठव्या एडवर्डची कहाणी तुम्हाला माहीत असेल . गोलमेज परिषदेसाठी मी लंडनला गेलो होतो . राजाने त्याला हव्या असलेल्या स्त्रीशी लग्न करावे की नाही , आणि त्याने तसे लोकमताच्या व ठरलेल्या संकेतांच्या विरुद्ध जाऊन लग्न केल्यास त्याला सिंहासनावर ठेवायचे की नाही या प्रश्नावर त्या देशात त्यावेळी मोठे रण माजले होते . लग्नाच्या बाबतीतील हे एवढे वैयक्तिक स्वातंत्र्यही द्यायचे की नाही ? हाही प्रश्न उपस्थित झाला होता. मि. बाल्डविन [ त्यावेळेचे हुजूर पक्षीय पंतप्रधान ] अर्थातच राजाच्या ह्या लग्नाविरुद्ध होते . तो राजाला म्हणत होता , तू जर माझे ऐकले नाहीस तर तुला राजपद सोडावे लागेल . " मि. चर्चिल हे राजा एडवर्डचे मित्र होते व त्याच्या पाठीशी उभे राहण्यास तयार होते . लेबर पार्टी [ मजूर पक्ष ] विरोधी पक्ष म्हणून त्यावेळी होता . मला पक्के आठवते की हुजूर पक्षातील ह्या प्रश्नावरील फाटाफुटीचा फायदा उचलून बाल्डविनचा पराजय करायचा की नाही या बद्दल मजूर पक्षात विचार चालू होता कारण हुजूर पक्षातील कित्येक सभासद राजनिष्ठेमुळे एड्वर्डची बाजू घेण्यास तयार होते . त्यावेळी प्रोफेसर लास्की [ मजूर पक्ष ] ' हेराल्ड ' या नियतकालिकांत लेखामागून लेख लिहून मजूर पक्षाने तसे करू नये म्हणून बजावीत होते, अशा हालचालींचा निषेध करीत होते . ते म्हणत होते , " आपण घटनात्मक संकेताने एक गोष्ट मान्य केली आहे की , पंतप्रधानांचा सल्ला राजा मानील , आणि त्याने तसा तो न मानल्यास पंतप्रधान राजाला घालवून देऊ शकेल. हा असा संकेत असल्याने, ज्यायोगे राजाचे अधिकारक्षेत्र वाढेल अशी वर्तणूक करून या प्रश्नावर बाल्डविनचा पराजय करणे चुकीचे ठरेल . " मजूर पक्षाने हा सल्ला मानला . संकेत खिलाडू वृत्तीने पाळलेच पाहिजेत असे त्यांनी ठरविले. इंग्लंडचा इतिहास वाचताना अशी कित्येक उदाहरणे तुम्हाला आढळतील की, जेथे तात्पुरत्या सत्तेच्या विलोभनास बळी पडून पक्षनेत्यांनी आपल्या विरोधकास, मग ते सत्तेवर असोत किंवा विरोधीपक्ष म्हणून काम करीत असोत, कैचीत पकडण्याचे प्रसंग संविधानाची [ घटनेची ] व लोकशाहीची हानी होऊ नये म्हणून कटाक्षाने टाळले आहेत . "
---- यावरून असे दिसते किती जेव्हा न्यायाची बाजू व चळवळीच्या सशक्ततेची भूमिका घेतांना तकलादू नोकरशाही हावी होतांना दिसते तेव्हा रामदास आणि समस्त कवाडे, गवई कंपूंनी बाळासाहेब आंबेडकरांची बाजू घेतली पाहिजे अन्यथा उद्या हीच पाळी त्यांच्यावर येऊ शकते. तेव्हा त्यांना हीच नोकरशहा चमको मंडळी त्रास देऊ शकते हे या राजकीय मुखंडांनी लक्षात घेणे गरजेचे आहे , सत्याच्यासाठी यांनी आपले फडतूस राजकारण बाजूला ठेवावे . आणि लोकशाहीसाठी व चळवळीसाठी बाळासाहेबांना समर्थन द्यावे हीच समृद्ध आंबेडकरी चळवळीची वर्तमानातील विजयाची नांदी ठरेल, एखादा प्रोफेसर लास्की या नेत्यांना चळवळ समजून सांगेल काय ????
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा