हे भगवान, तुजकडून आलेला कोणता धर्म तो आम्हास कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने आचरण अनुभव घेऊ.परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे. तो व त्यांच्यासारिखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होवोत. व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनांत देखील न येवो. -- मुक्ता साळवे
बौद्ध अथवा महारांच्या विरुद्ध ज्या पोस्ट मी फेसबूकवर पाहिल्यात त्यांचे प्रोफाईल तपासले असता त्यातील बहुतांश व्यक्ती मला जय श्रीरामवाले भाजपाई आढळलेत. हिंदू मांग असण्याचा गर्व सांगून हे व्यक्ती महारांवर घसरलेत. सोबतच ते बाबासाहेबांना प्रश्नांकित करू लागलेत. बाबासाहेबांमुळे आम्हाला शिक्षण मिळाले नाही असा त्यांचा कांगावा पहायला मिळाला. बाबासाहेबांना कुणी शिकवले असा प्रश्नही ते नाक वर करून विचारतात. जणू हिंदू ब्राह्मणांनी मातंग समाजाला विशेष वागणूक देऊन शिक्षित केले असा या काही मातंगांचा समज असावा. ब्राह्मण वर्ग शुद्रांनाच शिक्षणाता हक्क द्यायला तयार नव्हता तिथे अस्पृश्यांना काय शिक्षण मिळणार ? पेशव्यांच्या काळात तर मनुस्मृतीचाच अंमल होता. हाच प्रभाव पुढे इंग्रजांच्या काळातही होता. पुढारलेल्या जाती आपल्या विरोधात जातील म्हणून ब्रिटीशही वचकून होते त्यामुळे १८१३ ते १८५४ पर्यंत दलितांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला नव्हता. १८५५ ला पहिली शाळा इंग्रज सरकारने उघडली ती अहमदनगर मध्ये. सैनिकी कॅम्पात शिक्षण घेणारी सैनिकांची मुले असायची पण सार्वजनिक शिक्षण खुले झाले ते १८२३ नंतर. इंग्रज सरकार दलितांना शिक्षण देण्यास मागेपुढे पहात असताना, दलितांना शिक्षण दिले ते ख्रिश्चनांच्या मिशनरी शाळांनी. या शाळांना पुर्वी अनुदान सुद्धा मिळत नव्हते तरीही या शाळांनी अस्पृश्यांना विद्यादान दिले. हे अस्पृश्य लाभार्थी केवळ महारच नव्हते. हिंदू मांग म्हणण्याचा ज्यांना गर्व वाटतो त्यांनी अस्पृश्य वर्गाच्या शैक्षणिक वाटचालीचा इतिहास वाचावा. १८८१-८२ मध्ये उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणारा एकही दलित व आदिवासी विद्यार्थी नव्हता. ८० टक्क्यांच्या वर ब्राह्मणादी पुढारलेल्या जाती प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणात अग्रेसर होत्या. केवळ ०.८७ टक्के दलित वर्ग प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणात होता. १९८२ ला म. फुलेंनी हंटर कमिशन ला दिलेली साक्ष व बाबासाहेबांनी १९२८ ला संवैधानिक आयोगाला दिलेले निवेदन, काही उपटसुंभ मांग बंधुंच्या मेंदुची कवाडे उघडायला पुरेशी आहेत, पण ते वाचतील तेव्हा ना! सैनिकी कॅम्पातील शाळेत बाबासाहेबांनी शिक्षणाची सुरुवात केली. पुढे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातील योजनेच्या मदतीने बाबासाहेबांनी आपली शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवली. आपल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग त्यांनी दलितोद्धारासाठी करून घेतला. ब्रिटीश हे त्रयस्थ आहेत त्यांच्याकडून जितका लाभ मिळवता येईल तितका दलितांच्या पदरात पाडून घेतला. प्रसंगी ते ब्रिटीशांशी भांडलेत. पहिल्या गोलमेज परिषदेत त्यांनी ब्रिटीश पंतप्रधानासमोर सरकारची कानउघाडणी केली. या भाषणामुळे सयाजीराव फार समाधानी झालेत. आपल्या मदतीचे सार्थक झाल्याचे त्यांनी आपल्या राणीला सांगितले. सयाजीरावांचे सामाजिक कर्ज असे फेडले बाबासाहेबांनी. केवळ शिक्षणच दलितांना या गर्तेतून बाहेर काढू शकेल असे बाबासाहेबांचे मत होते. फक्त भाषणे वा निवेदने देऊन ते थांबले नाहीत. त्यांनी, मांग महारवाड्याच्या निरुत्साही वातावरणाच्या बाहेर येऊन दलितांनी शिकावे म्हणून धारवाड, मुंबई व अहमदाबादला वसतिगृहे उघडलीत. हे वसतिगृह केवळ महारांसाठी नव्हते. धारवाडच्या वसतिगृहात पैसा नसल्यामुळे तीन दिवस विद्यार्थी उपाशी आहेत हे कळताच आजारी असलेल्या रमाईने स्वतःच्या चार सोन्याच्या बांगड्या हनमंतराव वराळेंना तोडायला दिल्या. त्या रकमेतून विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याची सोय झाली. कसे फेडाल हे उपकार कृतघ्न झालेल्या हरामखोरांनो ? या वसतिगृहात महार , चांभार, मांग , भंगी असे सर्व अस्पृश्य जातीचे विद्यार्थी असायचे. आपल्या बुद्धीवैभवाच्या जोरावर बाबासाहेबांनी दलितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कांसाठी कर्मठ हिंदूच्या विरोधात लढे दिलेत. केवळ महार सक्षम व्हावा व मांग वंचित राहावा असा या लढ्याचा उद्देश होता काय ? महारांनाच या लढ्याची गरज होती व मांगांना सवर्ण हिंदू मांडीवर घेऊन सोन्याचा घास भरवत होते काय? पाण्याचा हक्क साबीत करण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी, शैक्षणिक अधिकारासाठी सतत संघर्षशील राहून बाबासाहेबांनी समतेचा मार्ग दलितांच्या पायाखाली खेचून आणला. सवर्ण व काँग्रेस विरुद्ध असताना सायमन कमिशन समोर दलितांच्या मागण्या हिरिरीने मांडल्यात. पुढे इधूनच राखीव जागांची वाट खुली झाली. पुणे कराराच्या काळात जो विरोध बाबासाहेबांना झाला तो कल्पनातीत आहे. अखिल अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क खेचून आणताना जर बाबासाहेबांना काही दगाफटका झाला असता तर महारांवर कुऱ्हाड कोसळली असती, मांग चांभार नामानिराळे राहिले असते. व्यक्ती तावून सुलाखून कोहिनूर बनतो, कष्ट उपसावे लागतात, त्याग करावा लागतो, कबीरांचा संयम, अशोकाचा निश्चय, शिवरायाचा करारी बाणा, जोतीबांचा आसूड, शाहुंचा बेडरपणा आणि बुद्धाची करुणा अंगी जो बाणवतो तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतो. नेता बनायला देविदास कांबळेही निघाला होता, के.के. सकटाने भोपटकरांच्या नेतृत्वात पुण्यात मातंग परिषद भरवून बाबासाहेबांना विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला पण काही मातंग बांधवांनी या परिषदेचा फोलपणा दर्शविणारे पत्र दीनबंधू वृत्तपत्राकडे पाठविले, त्यात ते म्हणतात, " त्या ठिकाणी आमच्या नावावर पोट भरणारे वायदंडे हे भटाच्या वतीने चालूनआमचा मातंग समाज रसातळास जावा असा एक त्यांचा अंदाज दिसत आहे. तरीपण आमच्या मातंग वीरांनी थोडक्यात सावध राहून लोकांच्या भरवशावर न राहाता, आपल्या पायावर उभे रहावे हे आद्य कर्तव्य होय. " या पत्रात वायदंडे व सकट यांना मातंग समाज फुकटही विचारत नाही, असे नमूद करून आपणच आपली गळकी घरे शाकारून घ्यावी मात्र दुसऱ्यांवर विसंबून राहू नये असा सल्लाही या पत्रात देण्यात आला आहे. या पत्रावर सिताराम बाबाजी लांडगे, जानो बाबाजी भिंगारदेव, श्रीनाथ सदाशीव वैराठ, तुकाराम लक्ष्मण ढकपाळ व भिकाजी रामजी गायकवाड यांच्या सह्या आहेत. या पत्राच्या शेवटी हे मातंगवीर म्हणतात, "आमचे विद्वान रा.रा. डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याची गदा नकली वीरांचे मांडीवर बसल्याखेरीज राहणार नाही. "
काल जे भोपटकरांचे होते ते आज गोळवलकरांचे नकली वीर बनून बौद्ध व मातंगात भांडणे लावण्याचे कृष्णकृत्य करण्यासाठी भुंकताहेत त्यांची मांडीच नव्हे तर पार्श्वभाग फोडण्यासाठी अनेक मातंगवीर पुढे सरसावतील. माझ्या जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील सारखणी गावामधील दीडशे मातंग कुटुंबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हेच खरे दुखणे आहे, या दुखण्यावरचा उपाय संघपरिवार शोधतो आहे. वस्ताद लहुजी साळवे यांना ते उपाय बनवू पाहताहेत पण लहुजींचा दांडपट्टा त्यांची शेंडी कापल्याशिवाय राहणार नाही, जोतीबांना सहकार्य करून आधीच त्यांनी शेंडीची वासलात लावली व मुक्ता ला लेखणी देऊन " आमचा धर्म कोणता ?" असा खणखणीत सवाल विचारायला लावला. मी हिंदू मांग आहे असे म्हणणाऱ्या नकली मातंगांना हा मुक्ताचा सवालच नंगा करील. पुढील भागात पाहू !
-- आनंद गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा