ना मशीनगन में ही कौशल
निपून सभी शस्त्रों में हम !डिसेंबर १९४७ : पुंछ,कोटली,झांगर, राजौरी,माचोई आणि नौशेरा उंच हिमालय पर्वतावरील एक बर्फाच्छादित रणक्षेत्र.पाकी टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घातला होता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महार बटालियनच्या विविध तुकडींनी पराक्रमाची शर्थ केली. झांगर या रणक्षेत्री ६००० हजार पाकिस्तानी शत्रू सैन्याचा मुकाबला केवळ ५० महार सैनिकांनी केला. शत्रू सैन्याच्या तावडीतून आपल्या सहकाऱ्यांची सुटका व्हावी म्हणून हवालदार रावू कांबळे आणि नाईक बारक्या कांबळे यांनी मोर्चा सांभाळला. आपले सहकारी शत्रूंच्या तावडीत सापडू नये म्हणून त्यांनी गोळ्यांचा वर्षाव सुरू ठेवला. पण अनेक सहकारी धारातिर्थी पडल्यावर उरलेल्या या दोन वीरांना पकडून शत्रू सैनिकांनी त्यांचा शिरच्छेद केला. अशाही परिस्थितीत त्या दोन वीरांची मशीनगन चार पाच सेकंद धडधडत राहिली. या दोन वीरांची नावे बटालियनच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. ६ फेब्रुवारी १९४८ ला नौशेरच्या लढाईत झांगरचा बदला घेतल्या गेला. या लढाईतील तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या नाईक कृष्णा सोनवणे आणि पुंडलिक महार यांच्या अंगात शत्रूंच्या गोळ्या घुसल्या असतानाही त्यांनी शत्रूंचे १००० सैनिक ठार मारलेत. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित भागात सतत १७ महिने शत्रू सैन्याचा मुकाबला करून त्यांना परास्त करणाऱ्या महार बटालियनच्या शूर शिपायांना विविध किताब देऊन गौरविण्यात आले. शौर्याची कमाल केलेल्या या महार सैनिकांविषयी अनेकांनी गौरवोद्गार काढले. या वीरांमध्ये कृष्णा नाईक सोनवणे यांना "महावीर चक्र" आणि हविलदार अमृत गंबरे, धोंडू जाधव, नाईक आबा किरतकुडे, नाईक बळीराम साळवी, पुंडलिक महार या पाच सैनिकांना "वीर चक्र" बहाल करण्यात आले. हा किस्सा बटालियन क्रमांक १ महार मशीनगन रेजिमेंटच्या बहादुर शिपायांचा आहे.
महार बटालियनने अनेक मोहिमा फत्ते केल्यात. त्याविषयी इथे सविस्तर मांडतो म्हटलं तर हे पेज कमी पडेल. तरीही थोडं सांगावं म्हणून, १९४२ मध्ये इटालियन कैद्यांना रांचीहून बंगलोरला नेण्याचे धोकादायक काम या सैनिकांनी यशस्वीपणे पार पाडले. १९४३ मध्ये कडाक्याच्या थंडीत वजिरीस्तान मध्ये वजिरी टोळ्यांना परतवून लावले. या कामी मलप्पा वाघमारे व बळवंत मोरे या जवानांनी स्वतःचे बलिदान दिले. ११ सप्टेंबर १९४७ ला दिल्लीतील २५-३० हजार मुसलमानांना पाकिस्तानात सुरक्षितपणे पोहोचविण्याचे काम महार बटालियनच्या मिडियम गन च्या सुभेदार गायकवाड आणि दुसरीकडे सुभेदार के.मोरे यांनी हल्लेखोरांवर बंदूका रोखून पुर्णत्वास नेले. तब्बल २२ आगगाड्या भरून हे महार सैनिक मुस्लिमांना नेत होते. उक्रल, इंफाल व भीष्मपूर तसेच अक्याब व ब्रह्मदेशातील युद्ध आघाडीवर महार बटालियनच्या शूर जवानांनी पराक्रमाची शर्थ केली. चार महारवीरांना विशेषत्वाने गौरविण्यात आले.त्यात सगन सोनवणे, संपत भिसे, जमादार रघुनाथ मोरे आणि नाईक सखाराम चौरे यांचा समावेश होता.इराक मध्ये महार बटालियनच्या जवानांनी अतुलनीय पराक्रम केला.शस्त्रास्त्रे भरलेले ट्रक्स लुटणाऱ्या टोळ्यांना खतम करण्याचे काम सुभेदार मेजर बळवंत बंदसोडे व त्यांच्या दोन शिपायांनी केले. " या वीरांनी महार जातीचे नाव गाजविले " असे उद्गार फिल्ड मार्शल सर क्लॉड ॲचिनलेक यांनी काढले होते.
क्वेट्टा भागात मुसलमान आणि पठाणी टोळ्यांनी हिंदूंना ठार मारण्यासाठी मोहीमच उघडली होती. या भागात बटालियनच्या सैनिकांनी परिस्थिती आटोक्यात आणली. शेकडो हिंदू कुटुंबांना महार बटालियनच्या संरक्षणात दिल्लीला आणण्यात आले होते. हिस्सार पंजाब येथे मुस्लिमांच्या टोळ्यांनी जवानांच्या ट्रकवर हल्ला केला तेव्हा मुख्य सुभेदार बनसोडे यांनी यांनी मशीनगन चालवून हल्लेखोरांना पिटाळून लावले त्यात काही ठारही झालेत. हिस्सार मधील एक लाख हिंदू व मुसलमान यांना निर्वासित केंद्रावर नेण्याचे बिकट कार्य बटालियनने पार पाडले. फाळणीनंतरच्या उद्भवलेल्या अडचणींवर मात करीत महार बटालियनच्या सैनिकांनी रात्रंदिवस प्रवास करून पाच लाख मुसलमानांना पाकिस्तानात नेले तर मुलतान, मुझफ्फरगड आणि डेरा गाझीखान या पंजाब मधील जिल्ह्यातून सुमारे तीन लाख मुसलमानेतर अर्थात हिंदू व शीख लोकांना भारतात आणले. विशेष म्हणजे ज्या केंद्रात या निर्वासितांना ठेवण्यात आले त्यांची संपूर्ण जबाबदारी महार बटालियनकडे होती. ले. जनरल के.एस. थिमय्या यांनी या जवानांचा गौरव केला.
महात्मा गांधी यांचा नाथुराम गोडसे याने खून केला त्यावेळी दिल्लीत महार बटालियनच्या सैनिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा सांभाळला.इतकेच नव्हे तर खुद्द पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू व इतर मंत्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी महार बटालियनच्या सैनिकांवर सोपविण्यात आली. राष्ट्रकुलातील देश आणि तुर्कस्तान यांच्या वकिलातींच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा या बटालियनच्या सैनिकांवर सोपविण्यात आली आणि ती त्यांनी उत्तम रीतीने पार पाडली. पंडित नेहरू यांनी या सैनिकांविषयी गौरवोद्गार काढले. अनेक मोहिमा महार बटालियनने फत्ते केल्यात. पाकिस्तान व चीन सोबतच्या युद्धात महार सैनिकांनी सुद्धा पराक्रमाची शर्थ केली. चीनच्या आक्रमणाच्या वेळी नेफामधील लढाईत हवालदार गोविंद कांबळे यांच्या कडे मिडियम मशीनगन तुकडीचे नेतृत्व होते. त्यांच्या पायात गोळ्या घुसल्या असताना ते धडपडत खंदकात परतले, कंपनीला माघार घेण्याचा आदेश होता पण इतर जवानांना परत जाता यावे म्हणून गोविंद कांबळे यांनी आपला गोळीबार सुरू ठेवला. इतर जवान सुखरूप परतले परंतु हा भारतमातेचा सुपुत्र जखमांमुळे धारातिर्थी पडला. गोविंद कांबळे यांच्या असामान्य शौर्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांना मरणोत्तर अशोकचक्र बहाल केले. कच्छ युद्धातील वीर हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांना वीरचक्र जाहीर झाले.
केवळ पाच वर्षांच्या काळात या बटालियनच्या कामगिरीवर अनेक लष्करी अधिकारी व राजनितीज्ञांनी गौरवपूर्ण उद्गार काढले. फ्लॅन्डर्स , मेसोपोटेमिया, पॅलेस्टाईन, आफ्रिकेतील जंगले आणि गॅलिपोलीच्या टेकड्या असो की कोरियात लढल्या गेलेल्या युद्धात महार बटालियनच्या सैनिकांनी मर्दुमकी गाजविली. शिस्त, खेळ व परेड मध्ये नेहमी अव्वल स्थानावर राहणाऱ्या या महार बटालियनचे अनेकांनी कौतुक केले. "वीर शिवाजी के बालक हम,है महार सैनिक हम हम ना मशीनगन में ही कौशल,निपुण सभी शस्त्रों में हम" हे मार्चिंग सॉंग गात गात जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित शिखरांवर " जयभीमच्या "जयघोषात शत्रूसैन्याला पाणी पाजणाऱ्या या वीर महार बटालियनला कोटी कोटी कुर्निसात !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महार समाजाला मार्शल रेस म्हणजे योद्ध्यांचा वंश म्हणायचे. भारतीय सैन्यात भरीव कामगिरी करणाऱ्या या योद्ध्यांची नाळ,आर्यांशी थेट भिडणाऱ्या नाग वंशाशी जुळलेली आहे. एका भीषण युद्धात पराभूत झालेल्या नागांना तथागत गौतम बुद्धाच्या काळात पुनश्च वैभव प्राप्त झाले. पुष्यमित्र शृंगाने कपटनीतीने बृहद्रथाचा खून केला या प्रतिक्रांतीच्या काळात नागवंशी बौद्धांनी ब्राह्मणी चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेत शूद्र व्हायचे नाकारले म्हणून त्यांना अस्पृश्य बनविले गेले. शौर्य, चिवटपणा आणि प्रामाणिकता हे सद्गुण अंगी असणाऱ्या अस्पृश्य महारांना शस्त्र धारण करण्याची संधी मिळाली ती मुस्लिम आक्रमणाच्या वेळेस. मुगल, मुसलमान राज्यकर्त्यांनी आपली राजसत्ता कायम करण्यासाठी चारी बाजूंनी घेराबंदी झालेल्या व संधीची वाट पाहत असलेल्या अस्पृश्यांना आपल्या सैन्यात जागा दिली परंतु या सैनिकांना उच्च पदावर न नेमता खालची पदे दिली. कारण भारतातील उच्चवर्णीयांची सामाजिक व धार्मिक दहशत त्यांना माहीत होती. अस्पृश्यांना उच्च पदे दिली तर आपली राजसत्ता धोक्यात येऊ शकते याची जाणीव त्यांना होती. महार,मांग,चांभार आदी अस्पृश्यांनी आपल्या अस्तित्वासाठी व रोजीरोटीसाठी मुस्लिम राज्यकर्त्यांना साथ दिली. मात्र उच्चवर्णीयांनी परकीय आक्रमकांना आपल्या मुली देऊन नातेसंबंध प्रस्थापित करून आपले राज्य अबाधित ठेवले. ब्राह्मणांनी राजाला विष्णूचा अवतार घोषित करून परकीय राजांच्या राजदरबारी अनेक पदे आणि पैसा पदरात पाडून घेतला. हा दोन वर्गातील फरक नजरेत भरण्यासारखा आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुद्धा अस्पृश्यांना हिंदू समाजात योग्य दर्जा मिळावा म्हणून कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत.उलट अस्पृश्यांना मुसलमान बनविण्यासाठी मोहीम राबवली.आणि हिंदू धर्माभिमानी लोकांच्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून असंख्य अस्पृश्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला सुद्धा !
छ.शिवाजी महाराजांच्या काळात अस्पृश्यांना सैन्यात स्थान मिळाले. मराठा साम्राज्यात वैराटगड जिंकून देणारा नागनाक, खर्ड्याच्या लढाईत पठाणांच्या तावडीतून परशूरामभाऊ पटवर्धनांचा जीव वाचवून पेशवाईचे संरक्षण करणारा सिदनाक व बाजीप्रभू सारखी खिंड लढवून शिवरायांसाठी धारातिर्थी पडणारा रायनाक तसेच कोंडनाक, तुकनाक व माणिक महार या योद्ध्यांचे किस्से प्रसिद्ध आहेत. परंतु याही काळात अस्पृश्यांना योग्य दर्जा मिळाला नाही. छ. शिवाजी महाराजांच्या काळात किमान अस्पृश्यांची स्थिती ठीक होती पण पेशव्यांच्या काळात अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक मिळाली. यावर काय बोलणार? आपल्या सर्वांना भीमा कोरेगावचा संग्राम माहीत आहे. इंग्रज भारतात आले. त्यांनी अस्पृश्यांचा प्रामाणिकपणा व लढाऊ वृत्ती हेरली. त्यांना आपल्या सैन्यात स्थान दिले. मशीनगन चालविण्यासाठी कोण सक्षम आहेत याची जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने चाचणी घेतली तेव्हा महार माणूस अगदी योग्य आहे असे त्यांना आढळले. शहीद रावू व बारक्या कांबळेच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते. परंतु त्यांनीही अस्पृश्यांचा केवळ वापरच केला. सैनिकी पेशा मुळे महारांची सांपत्तिक स्थिती सुधारली होती. सैन्यात जातीनिहाय आरक्षण नव्हते, केवळ लढाऊ वृत्तीच्या गुणांमुळे महार, मांग व चांभार आदींना सैन्यात स्थान मिळाले.मात्र सवर्ण हिंदुंच्या जातीभेदामुळे व ते अस्पृश्य अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणे कमीपणाचे मानू लागल्यामुळे इंग्रजांना १८५७ च्या बंडाची पुनरावृत्ती होईल याची भीती वाटल्याने त्यांनी अस्पृश्यांची भरती बंद केली. अस्पृश्य अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले व जवानांना पेन्शनीत काढले गेले. पलटणीची पुनर्रचना रजपूत, शीख, मराठा, अशा सवर्ण जातीच्या पायावर केली. सैन्यातून काढल्यामुळे महार सैनिकांचे परिवार पार उद्ध्वस्त झाले. असले वाईट दिवस केवळ उच्चवर्णीयांच्या "मनुवृत्तीमुळे" अस्पृश्यांच्या वाट्याला आले. म्हणजे महारांची लायकी असतांनाही उच्चवर्णीय लोकांना अस्पृश्य विशेषतः महार जातीचा माणूस चालत नसतो याची प्रचिती वरील उदाहरणात दिसून येते. आज नोकरीत आरक्षण आहे म्हणून अनुसूचित जाती व जमातींचे कर्मचारी सरकारी नोकरीत दिसतात, अन्यथा सवर्ण हिंदूंच्या धर्माधिष्ठित जातीभेदाने अस्पृश्यांना पार देशोधडीला लावले असते. महार हे किती सक्षम आहेत याचा दाखला सर रॉबर्ट रिसले यांच्या "दि पीपल ऑफ इंडिया" ह्या ग्रंथाने दिला आहे. मानव विकास शास्त्राच्या दृष्टीने राॅबर्ट रिसले यांनी " डोक्याच्या व नाकाच्या पुराव्यावरून देशस्थ व कोकणस्थ ब्राह्मणांपेक्षाही महार लोक अधिक श्रेष्ठ आहेत" असे त्यांच्या टेबलवरून दर्शवून दिले. अलेक्झांडर राॅबर्टसन म्हणतात, "महारांचा दक्षिणेतील ग्राम व्यवस्थेतील, दक्षिणेतील राज्यशास्त्रीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून, मराठी संत वाङमयाच्या दृष्टीकोनातून निःपक्षपाती अभ्यास केला तर व महाराला योग्य संधी दिली तर सर रॉबर्ट रिसले साहेबांच्या आकडेवारीने त्यांना जे उच्च स्थान दिलेले आहे त्याच योग्यतेचा तो महार आहे." पुढे ते म्हणतात, "महारांमधील मागासलेपण हे शैक्षणिक सामर्थ्याच्या अभावाने नव्हे तर संधीच्या अभावाने आले आहे."
संधी मिळाली की महार समाज आकाशाला गवसणी घालू शकतो, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती. बाबासाहेबांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमातून आणि व्यवस्थेशी संघर्ष करताना त्यांनी भोगलेल्या यातनामय वाटचालीतून आजचा बौद्ध उभा राहिला. आरक्षणाने संधी प्राप्त करून दिली आणि धम्मदीक्षेने मानसिक बळ दिले. भारतीय संविधान लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर रॉबर्ट रिसले यांच्या टेबलची आकडेवारी खरी करून दाखवली.
महार रेजिमेंटचा अत्यंत गौरवशाली इतिहास आहे, आणि महार हे महाराष्ट्रीयन असतानाही दैनिक लोकमत सारख्या वर्तमान पत्राच्या दि. १६ जून २०२२ च्या अग्रलेखात महार रेजिमेंटला अनुल्लेखाने मारले जाते हे जातियवादाचेच लक्षण नव्हे काय ? लोकमत म्हणते, "आपल्या देशात मुळातच लष्करी सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक हळवा व संवेदनशील आहे. मराठा रेजिमेंटबरोबरच जाट, राजपूत व शीख रेजिमेंट यांचा पराक्रमी इतिहास आहे."या संपादकांना महार रेजिमेंट दिसली नाही. कुणी काहीही लिहिले तरी आपण आपला इतिहास स्मरून उज्ज्वल भविष्याची वाट चोखाळली पाहिजे. आता आपली परीक्षा आहे.
- आनंद गायकवाड
संदर्भ :
1. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड ८ लेखक - चांगदेव भवानराव खैरमोडे ( मूळ संदर्भ - The Mahar MG Regiment, The Times of India २६.१०.१९५२, नवशक्ती ११.१.१९६३, ३०.६.१९६५)
2. शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास लेखक - डॉ. अनिल कठारे 3. महार लोक लेखक - अलेक्झांडर रॉबर्टसन ( मूळ संदर्भ - कास्ट्स ॲन्ड ट्राईब्ज ऑफ बॉम्बे व्हॉल्यूम १ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा