त्या प्रश्नांचा उगमच आपल्याला छाटता आला पाहिजे.
- आनंद गायकवाड
----------------------------------------------------------
बहुजन, दलित वा बौद्ध कुटुंबातील स्त्री-पुरुष एकमेकांशी शत्रुत्वाने वागत नाहीत तर दोघेही हातात हात घालून परिवार उभा करतात. सामाजिक विषमता व शोषणाच्या विरोधात दोघेही खांद्याला खांदा लावून काम करतात. सवर्णातील महानगरीय स्त्रीवाद कोणत्याही मूलभूत प्रश्नांवर भूमिका घेत नाही. त्यांच्या डोक्यात विदेशी स्त्रीवादी आंदोलने घर करून आहेत. परंतु नो ब्रा-डे च्या धर्तीवर ; दररोज ऐंशी बलात्कार होणाऱ्या या देशात नो रेप-डे साजरा करण्यास वाव आहे हे त्यांच्या लक्षात कां येतं नाही ?
-------------------------------------------------------------
स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री - शुद्रातिशूद्रांच्या वाट्याला काय भोग आले यावर आपण बोलू लागलो की जुने कशाला उकरून काढता , असा बोल लावणारे महाभाग अवतीर्ण होतात. आपण वर्तमानावर बोलू. बेलछी ,पिप्रा , पारसबिघा ,अरवल ते आवाहने लिंबोणी येथील दलित हत्याकांड बाजूला ठेवू. मात्र अलिकडच्या काळातील दलित - अल्पसंख्याक व स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना पाहिल्या तर काळ बदलला असे म्हणता येईल काय ? विशेष म्हणजे या अत्याचारामागील कारणे पाहिली तर डोकं चक्रावून जाते. हरियाणा मधील दुलिना गावात ,गाईचे चामडे सरकारी हर्रासात विकत घेणाऱ्या पाच दलितांना गाय मारल्याचा ठपका ठेवून पोलीस ठाण्यासमोर जीवे मारल्या गेले, थैलीत गोमांस आहे म्हणून देशसेवा करणाऱ्या जवानाच्या बापाला एक झुंड लाथाबुक्क्यांनी तुडवून मारून टाकतो ( उत्तर प्रदेश), ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतो म्हणून सेवाभावी ख्रिश्चन इसमाला त्याच्या दोन अल्पवयीन मुलांसह जीप मध्ये जाळून मारले जाते (ओरिसा), बौद्ध कुटुंबाचा स्वाभिमान व प्रगती डोळ्यात खुपत असलेल्या अख्ख्या खैरलांजी गावाने एक परिवार उद्ध्वस्त करून टाकला ( महाराष्ट्र ), आदिवासी महिलांवर लैंगिक अत्याचार करून पाच जणांना जमिनीत पुरण्यात आले (नेमावर, मध्य प्रदेश). ही केवळ काही उदाहरणे होत. यांचे आणि उना, उन्नाव, कठुआ, हाथरस, व दिल्ली मध्ये दलित, आदिवासी व दलित स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे सखोल निरीक्षण केले तर लक्षात येते की, या अत्याचारांमागे एकाच मानसिकतेची पण विविध मुखवटे धारण केलेली माणसे आहेत. याच मानसिकतेतून मुला-मुलींच्या एकत्र फिरण्याला विरोध, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी धुमाकूळ, पब मध्ये राडा ,ऑनर किलींग, आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहाला प्राणांतिक विरोध जन्माला आला आहे. या मुखवट्यांच्या संघटना आपल्या देवादिकांची नावे धारण करून आहेत. ते विविध संघटनात विभागल्या गेले असतील तरी त्यांची नाळ जुळलेलीच आहे व त्यांचे लक्ष्य एक आहे, ते म्हणजे मनुराष्ट्र ! हे मनुराष्ट्र घडवायचे असेल तर भारतीय संविधानाने भारतीय म्हणून एकत्र आणलेल्या माणसांना तोडावे लागेल. त्यासाठी ब्राह्मणवादी सुवर्ण काळातील परिस्थिती पुन्हा निर्माण करावी लागेल या विचाराने या समविचारी संघटना कार्यरत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे , ब्राह्मणांची बुद्धी , क्षत्रियांचे बळ व वैश्यांचे धन यांच्या जोरावर शुद्रांना नामोहरम करण्यात आले याची प्रचिती येते. हजार वर्षांपूर्वीचा भारत आम्हाला हवा आहे असे उगाच बोलत नाहीत संघप्रमुख. मनुराष्ट्रासाठी विविध कुख्यात आदर्श डोक्यावर घेऊन साधन संपन्न त्रैवर्णिकांच्या संघटना एकत्र आल्या मात्र त्याच वेळेस परिवर्तनवादी विविध आदर्शांना घेऊन चालणाऱ्या संघटना व व्यक्ती एकमेकांना पाण्यात पाहू लागल्यात. फक्त बाबासाहेब.. दुसरा नकोच, फक्त शिवराय.. दुसरा कशाला ? फक्त फुले..इतरांची गरजच काय ? फक्त बिरसा हवा बाकी नको, जय लहूच...जयभीम का ? रैदास महान बाकीच्यांचे नाही काम, अशा अनेक निरर्थक वादांनी समदुःखी साधनवंचितांचा संवादच बिघडवून टाकला. सामाजिक क्रांती एकेकट्याने होईल का ? अल्पसंख्य असूनही बलाढ्य असलेल्या त्रैवर्णिकांच्या चतुरंग सेनेला सैद्धांतिक बळ लाभलेली जनशक्तीच मात देऊ शकेल. कार्ल मार्क्स म्हणतो, " टीकेला शस्त्र हे अर्थातच शस्त्राने टीका अशी जागा घेऊ शकणार नाही. भौतिक शक्तीला उलथून टाकण्यासाठी भौतिक शक्तीच वापरली पाहिजे. पण जनमानसाची पकड घेताच सिद्धांत ही सुद्धा एक भौतिक शक्तीच बनते." समता , स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित प्रबुद्ध भारताची इमारत उभी करता येईल. भारताच्या पुनर्रचनेसाठी बुद्धांचा धम्म हा तावून सुलाखून निघालेला एक मानवतावादी सिद्धांतच आहे. हा सिद्धांत त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे हे जनसामान्यांच्या गळी उतरवावे लागेल. महात्मा फुल्यांना आदर्श मानणाऱ्या माळी माणसाला, ' तू आधी बौद्ध हो ' म्हटल्याने जनशक्ती कशी उभी होईल ? या जनशक्तीला उभे करण्याचे काम फुले - आंबेडकरी विचारांचे साहित्यिक सलगपणे करताना दिसत आहेत ही एक जमेची बाजू आहे. अशा प्रबोधनात्मक लेखनातून मनुराष्ट्राचे भूत जमिनीत नेहमीकरिता गाडून टाकण्यासाठी मदतच होईल.
संध्या सराटकर आपल्या कवितेत म्हणतात,
सख्या, तुझ्या कुशीत दिसतोय मला
हरएक गावाच्या वेशीवर टांगलेला एक नवा सूर्य
तुझ्या डोळ्यात अलिकडे आकाराला येत आहे
आंबेडकर- फुल्यांच्या चळवळीचे पर्व.
बहुजन समाजातील विविध घटक आपापले जातिवंत आदर्श घेऊन चालत असले तरी मनुविरोधी विचारांच्या छावण्यांशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
संध्या सराटकर या बहुजन समाजातील आहेत. त्यांना फुले- आंबेडकर यांच्या सोबतच शिवराय, जिजाऊ, सावित्रीबाई, पंजाबराव देशमुख यांचे कार्यकर्तृत्व महत्वाचे वाटते. एवढेच नव्हे तर शोषकांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे प्रत्येक व्यक्तिमत्त्व त्यांना आपले गणगोत वाटते. देश म्हणजे देशातील कष्टकरी जनता. आणि या जनतेसाठी लढणे म्हणजे देशप्रेमच. समाजवादी संरचना सर्वहारा समाजाच्या कल्याणासाठी आहे असे कवयित्रीला वाटते म्हणून ती म्हणते,
भगव्या रंगावरून
समाजवादी वाहत नसतात वारे
अपत्यापेक्षाही देशावर प्रेम करण्यासाठी
व्हावे लागते मार्क्सचे वारसदार खरे
समाजवाद बाबासाहेबांनाही हवा होता. पण आज सरकारी समाजवादाने भांडवलशाही कडे कुच केले आहे. या संरचनेचा रंग भगवा आहे आणि हा त्यागाचा रंग असला तरी अलीकडे तो अंधःकाराचे प्रतिनिधित्व करतो आहे.
म्हणून कवयित्री बोलते,
प्रकाश विकायला काढलेल्यांच्या
डोळ्यात सूर्य प्रसवत नसतो.
वर्तमान असे आहे की, देशच विकायला काढल्या जात असल्याचे पदोपदी जाणवते. असो...अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संध्या सराटकरांना सामाजिक चळवळीचे बाळकडू त्यांच्या पुर्वजांकडूनच मिळाले. माहेरचा फुले- आंबेडकर चळवळीचा वारसा आणि सासरचे डाव्या विचारसरणीचे वातावरण यातून त्यांची वैचारिक जडणघडण झाली. अनेक आंदोलने, शिबिरे आणि स्त्री सक्षमीकरण यासाठीच्या कार्यक्रमात त्यांचा प्रामुख्याने सहभाग असायचा. या सकल अनुभवातून त्यांच्या कविता साकारल्या. वेशीवरचा सूर्य हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. बुद्ध, फुले, बाबासाहेब, सावित्रीबाई, शिवराय, पंजाबराव देशमुख यांच्या महानतेचे मंडण करणाऱ्या कवितांसोबतच त्यांनी भरकटलेल्या बेगडी पुढाऱ्यांवरही वार केलेत. बाबासाहेब या कवितेत त्या नेत्यांवर ताशेरे ओढताना म्हणतात,
आमच्यापासून तुटून गेले
माळावरचे गुलाब झाले
आम्ही मात्र सावरतोय
तुझ्या विवेकाचे जग
ते बदलत असतात तऱ्हा
अत्तराच्या सुगंधात
लपवतात दुर्गंधीचा वारा.
संध्या सराटकरांची कविता अनेक विषयांना स्पर्श करते.
पुरुषी मानसिकता व स्त्रीमुक्ती यावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. पुरुषांच्या वैषयिक भावना केवळ शरीराशी जुळलेल्या असतात यावर कटाक्ष टाकताना कवयित्री पुरुषांच्या मुखातून बोलते ,
मॅडम, स्त्रीचा मेंदू आणि शरीराचा
तसाही मेळ जुळवायचा नसतो
अनेक घरांमधूनही
असाच बलात्कार चालू असतो.
स्त्रीला पेटवून देणाराच जेव्हा स्त्रीमुक्ती वर भाषण देतो तेव्हा , ' केतकीचं आणि केवड्याचं बीज अंकुरणाऱ्या मनात क्रांतीचे स्फोट होत नसतात ' अशा शब्दांत ती समाचार घेते. स्त्री ही कुठल्याही कवयित्रीच्या कवितेचा केंद्रबिंदू किंबहुना प्राण असतो. संध्या सराटकर भारतीय परिप्रेक्षात स्त्रीचा विचार करतात. स्त्री ही दलितांपेक्षाही दलित आहे हे मान्य केले तरी भारतीय स्त्री आधी स्वजातीय विचार करणारी आहे. भारतात ती दोन गटात विभागली गेली आहे. एक स्त्री तिच्याच हिताच्या हिंदू कोड बिलाला विरोध करते, ती आरक्षणाचा विरोध करते, ती गोरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक धर्ममार्तंडांचे समर्थन करते, कठुआत बालिकेवर बलात्कार करणाऱ्यांच्या सुटकेसाठी उभ्या ठाकलेल्या नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहते. दुसऱ्या बाजूला समतेसाठी लढणारी स्त्री आहे. ती कोणत्याही अत्याचारांचे समर्थन करीत नाही. खैरलांजीसह कोपर्डीतील बालिकेवर बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून ती आंदोलकांची सोबत करते. दोन्ही स्त्रियांवर पुरुष अधिसत्ता गाजवित असला तरी मनू महाराज दोघींना एकत्र येऊ देत नाही. कवयित्री म्हणतात,
एकदा भिंतीच बोलल्या माझ्याशी
मनुच्या मनोवृत्तीची गुलाम
म्हणून त्यांनी माझा निषेध केला.
या भेदभावाच्या भिंती फार पक्क्या आहेत, या भिंती आड तिला बडवल्या जाते कारण तिला ताडनाचाच अधिकार आहे हे धर्माने तिच्या मनावर बिंबवलेले असते.
हा काट्यांना उगवणारा प्रदेश
तरीही म्हणतोस भारत माझा देश
देश नव्हे पर्वत शिखरांच्या रांगा
देश नव्हे लाडक्या राजकुमारींनी
बसावयाचा टांगा.
एक लाडकी राजकुमारी तर दुसरी डोळ्याला झापडे लावून व्यवस्थेचा टांगा ओढणारी घोडी यापेक्षा स्त्रीचे आणखी कसे वर्गीकरण करता येईल. पोटासाठी चौकात गिऱ्हाईक शोधणारी स्त्री नि नोटा साठी इनोव्हात बसून ग्राहकांकडे जाणारी हाय सोसायटीतील हाय प्रोफाईल स्त्री, हा भेद कवयित्रीने मोठ्या खुबीने व्यवस्था या कवितेत मांडला आहे. पुरुष जिच्यावर रात्र उतरवून येतात तिलाच ते , गंदी है साली अशी शिवी हासडतात तर इनोव्हावाली कडे दुर्लक्ष करून, ' जाऊ दे राजा, हाय सोसायटीत हे सारं चालायचंच, ' अशी सावध टिप्पणी करतात. याचा अर्थ कवयित्री यावर तटस्थ आहे असे नाही मात्र तिला वरवरची छाटणी नको तर या प्रश्नांचा उगमच छाटला जावा असे वाटते. घर शाकारून काढावे तसा देश शाकारून काढावा आणि या पुनर्रचित देशात देश आणि माणूस एवढेच सूत्र असावे असा आशावाद संध्या सराटकर यांच्या कवितेत आलेला आहे. सोबतच त्यांनी दिलेला इशारा दुर्लक्षित करण्यासारखा नाहीच...! ही कविता पाहुयात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा