यवतमाळचे मूळ !
- आनंद गायकवाड
माला या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ होतो हार म्हणजे फुलांचा वगैरे. माळ असा शब्द संस्कृत मध्ये दिसत नाही त्याऐवजी माला असा शब्दप्रयोग केला जातो. मराठी मध्ये माळ असा शब्द आहे. त्याचा अर्थ खडकाळ किंवा नापीक असा भूमीचा उंच व विस्तृत प्रदेश;मैदान;डोंगरमाथा; सपाटी; पठार असा अर्थ होतो. संस्कृत पूर्वी या देशात प्राकृत भाषांचा प्रभाव होता. पाली प्राकृत मध्ये माळ शब्द नसून माला हा शब्द आहे. त्याचा माळा अथवा मजला असा अर्थ आहे. माळ या शब्दाचा अर्थ जंगल किंवा पठार असा केवळ मराठी मध्येच आहे. संस्कृत मध्ये जंगल करिता वन अथवा कानन असे शब्द आहेत. माळ म्हणजे जंगलातील पठारी भाग हा अर्थ मी सांगितलाच आहे फक्त त्याची उत्पत्ती कुठून झाली यावर मी भर दिला. अनेक गावांच्या मागे नगर हा शब्द लागलेला आहे. नगर या शब्दाची उत्पत्ती नाग या गणांच्या लोकांपासून झाली आहे. त्यांनी अनेक गावे बसवली. नाग हे अनार्य होते. तर पूर हा शब्दही अनेक गावांमागे आहे. या शब्दाचा थेट संबंध अनार्य संस्कृतीशी येतो. आदिवासी गणांचा अभ्यास केला तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. जंगल आणि डोंगरी भागात आदिवासी लोकांशिवाय आणखी कोणत्या जमाती वास करायच्या ? गोंड पासून गण या शब्दाची निर्मिती आहे.मराठी पूर्वी गोंडी बोलीभाषा गोंडवाना भागात बोलली जायची तसेच विदर्भ, छत्तीसगढ,मध्यप्रदेश इथे मोठ्या प्रमाणात गोंड समाज ही भाषा बोलतो. त्यांची स्वतंत्र लिपी सुद्धा आहे.पण कालौघात ती मागे पडली. जिथे जिथे गोंड आदिवासी समाज राहतो तिथे तिथे गोंडी बोली बोलल्या जायची. माळ या शब्दाचा उगमच गोंडी भाषेतून झालेला दिसतो.गोंडीत मरा, मळा, मडा, माड असे शब्द आहेत. त्यांचा अर्थ वृक्ष असा होतो.गोंडीच नव्हे तर सर्व आदिवासी समाज वृक्षाला देवतूल्य मानतो. वृक्षांपासून जंगल हा अर्थ ध्वनित होतो. अबुझमाड(नारायणपूर,छत्तीसगढ+महाराष्ट्र +आंध्रप्रदेश) हे नाव आपण ऐकले असेल. अगदी तसेच यवतमाळ हे नाव.माळ याचा अर्थ आपण मराठी वा गोंडीतून समजून घेतल्यावर प्रश्न उरतो तो "यवत" या शब्दाचा. असा शब्द मराठीत नाही. यावत याचा अर्थ जेवढा तेवढा असा होतो. उदा. यच्चयावत. यव असा शब्द मराठीत नाही. यंवत्यंव असं आपण बोलतो म्हणजे असेतसे पण यानेही यवतमाळचा अर्थबोध होत नाही. प्रत्येक गावाच्या नावाला अर्थ असतो.जर ते गाव फार प्राचीन वा मध्ययुगीन काळातील असेल तर निश्चितच अर्थ आहे. यवन असा एक शब्द आहे ज्याचा अर्थ सरस्वती कोशात ग्रीक, मुसलमान किंवा अनार्य असा दिलेला आहे. पण यवन मुळे यवतमाळ हे नाव आकाराला आले नसावे, असे वाटते. यवतमाळ हा जिल्हा आदिवासी जमातींचा जिल्हा आहे. यवतमाळच्या ( आजच्या शहरी भागात ) या जंगली भागात पूर्वी गोंड व इतर आदिवासी मोठ्या प्रमाणात असतील. गोंडांना कुयव, कुयवत, कोई,कोया, कोईतूर या शब्दाने ओळखले जाते. कुयव गोंडाचा उल्लेख ऋग्वेद या प्राचीन ग्रंथामध्ये आलेला आहे.
शुष्णं पिप्रुं कुयवं वृत्रं इंद्र यदावधी विपुरः शंबरस्य । तन्नोमित्रो वरूणोमास हन्तामदिति : सिंधू पृथिवी उत द्यौ ।। ( ऋग्वेद ऋचा १/१०३/८)
हे इन्द्रा । शुष्ण,पित्रु(विपु),कुयव,वृत्र इत्यादींचा वध करून शंबराची गढयुक्त नगरे उद्ध्वस्त केली तेव्हा आमची प्रार्थना सफल झाली. मित्र ,वरूण,अदिती, समुद्र,धरा व क्षितिज आमच्या प्रार्थनेचे अनुमोदन करावे. या ऋचेतील शंबर हा गोंडांचा आद्यदेव यालाच आदिवासी शंभू ,शंभो,शंभूशेक, बडादेव, महादेव म्हणतात. कुयव, कोया, कोई, कोईतूर ही गोंडांचीच संबोधने होत. ऋग्वेदात कुयव हा शब्द अनेकदा आला आहे. हे यासाठी मी सांगतो की,कोईतूर अथवा कुयवत + माळ मिळून कुयवतमाळ झालेला आहे. काही काळानंतर पहिले अक्षर लोप पावले असावे त्यामुळे यवतमाळ हेच नाव रूढ झाले असावे. अर्थ होतो गोंडांचे जंगल. तसे माळ हा शब्द गोंडी भाषेत विपूल प्रमाणात आहे. या शब्दाचे अंत्यप्रत्यय लावून गोंडीतील क्रियापदे तयार होतात. मराठी भाषेवरही गोंडीचा फार प्रभाव आहे. पाल्हाळ/ हुकमाळ/वामाळ/आमाळ/लेस्कमाळ /उस्कमाळ/वारमाळ/उममाळ/नांदमाळ/उचमाळ/ताडकमाळ/दलिमाळ/बोळस्माळ/मुहुचमाळ/जकमाळ/तारमाळ/अस्कमाळ/ वारमाळ/करीदमाळ इत्यादी अनेक क्रियापदे गोंडीत आहेत. वल्लाआमाळ म्हणजे पुष्कळ होणे.जिथे गोंड भरपूर आहेत ती जागा म्हणजे(कुयव+आमाळ)कुयवामाळ,कोयामाळ अर्थात गोंडसदृश्य होणे असे म्हणता येईल. जसे अहमदनगर ला केवळ नगर या नावाने ओळखले जाते तसेच कुयवचे 'कु' लोप पावले. मुंबई चे बंबई वा बाॅम्बे असा अपभ्रंश होतो, हिंदीत यावतमल झाले तसे कुयवमाळ, कुयवतमाळ, कोईआमाळ,कोईतूरमाळ यातूनच यवतमाळ झाले असावे. आईने अकबरीत " योत लोहारा" असे नाव आहे. तो हा यवतचा अपभ्रंश आहे. यवतमाळला प्राचीन नसेलही पण इतिहासच नाही असे म्हणणे धाडसाचे होईल. आइने अकबरी मध्ये योत-लोहारा चा उल्लेख आहे. हे पुस्तक इ.स. १६०० च्या शतकात लिहिण्यात आले. त्याही पेक्षा या लेखाच्या वरील फोटोत केदारेश्वर व कमलेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे, जे किमान ८०० ते १००० वर्षापुर्वीचे आहे. विस्तीर्ण पाण्याचे टाके असलेले एक महादेव मंदिर यवतमाळच्या मध्यभागी आहे. दुसऱ्या महादेव मंदिरात विहीर आहे.आदिवासी समाज शिकार व कंदमुळे खाऊन दऱ्याखोऱ्यात राहायचा त्याला सुपीक जमीनीची काय गरज ? राहिला पाण्याचा प्रश्न तर त्याला मंदिराच्या आसपास पाणी कुठेही मिळत असावे. विदर्भात यवतमाळ पर्यंत कधीकाळी समुद्र होता हे अलिकडच्या संशोधनातून पुढे आले आहे. कुणाला माहीत होते की कोलमणार खडकांचे खांब जिल्ह्यात सापडतील. यवत हे नाव फार पूर्वीपासून असावे असे वाटते. ( हे माझे स्वतःचे मत आहे. मतभेद असू शकतात. चर्चा करायला आवडेल. आपली मते स्वागतार्हच )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा