जो जल रहा है , वतन हैं किसका ?
- आनंद गायकवाड
................................................................................
परकीय मुस्लिम दहशतवाद्यांचा हवाला देऊन भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी अनेक फंडे राबविण्यात आले आहे. त्यातून सुशिक्षीत मुस्लिम तरुणांना जीवे मारण्यात आले किंवा तुरुंगात जेरबंद करण्यात आले. गोमांस बंदीचा कायदा मुसलमानांच्या जीवावर उठला. तीन तलाक वा अनुच्छेद ३७० हटविणे हाच जणू भारतीयांच्या उन्नतीचा महामार्ग असून मंदिर निर्माण हे प्रगतीचे महाद्वार आहे हे ठसविण्यात येत आहे. एका भयग्रस्त वातावरणात मुसलमान जगतो आहे. आणि स्वतःच्या मदहोशीत जगणारा सुद्धा एक वर्ग आहे जो जगाकडे दुर्लक्ष करून आपल्याच कोषात बंदिस्त झाला आहे.
.....................................................................................
मुस्लीम मराठी साहित्याचा पसारा मोठा असला तरी अलीकडे त्याचा आवाज क्षीण झाला की काय असे वाटायला लागले. उर्दू हिंदीत लिहिणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ईशस्तुती अर्थात हम्द आणि पैगंबरांच्या स्मरणार्थ केलेली पद्यरचना म्हणजे नात अनेकांनी लिहिल्यात. नज्म, गज़ल व मुक्तछंदातील रचना पण आपण अलिकडे पाहतोय. जनाना ते मयखाना पर्यंत गझलांची भरमार आहे. तसं पाहिलं तर गज़ल म्हणजे स्त्री सौंदर्याची स्तुती असाच पारंपरिक अर्थ आहे. नंतर त्याचे स्वरूप बदलले. काही बोटावर मोजण्याइतपत कवी सोडले तर सामाजिक जाणिवेच्या रचना फारशा दिसत नाहीत. क्रांतिकारक विचार तर फारच दूर आहे. मराठीतील अमर शेख, अजीज नदाफ, बाबा महंमद अत्तार, जावेद पाशा, मुबारक शेख, बदिउज्जमा बिराजदार, अजीम नवाज़ राही, फ.म.शहाजिंदे, नसीमा पठाण,बदिउज्जमा खावर, रफीक शेख, सिराज मुजावर, अंजुम मोमीन, कलीम खान यासारखे अनेक कवी आहेत ज्यांनी सामाजिक परिवर्तनाची सशक्त कविता लिहिली. सत्ताधीशांच्या अन्यायी धोरणावर टीका, फॅसिझमचा प्रतिरोध करून सर्वसामान्यांच्या वेदनांना सर्जनशील करणारे काव्यलेखन हिंदी उर्दू भाषिक फैज़ अहमद फैज़ पासून ते साहिर लुधियानवी, मुनव्वर राणा, राहत इंदौरी पर्यंतच्या कवींनी ताकदीने केले. दुष्यंत कुमार, पाश, धुमिल, चीमा, गदर, राजू यांच्या कवितांनी जनतेच्या आंदोलनाला आवाज दिला. आज फासीवादाचा बीभत्स चेहरा आपल्या नजरेसमोर आहे. धर्मांध व धनिकशहांच्या झुंडशाहीने वर्तमान भयकंपित झाले आहे. गरीब, दलित, आदिवासी हे या झुंडशाहीचे बळी आहेतच पण या वर्गाचे ब्रेन वॉश करून त्यांना सोबत घेऊन हिंदू राष्ट्र घडवण्यासाठी अल्पसंख्याक मुसलमान लक्ष्य केल्या जात आहे हे गुजरातच्या सुनियोजित दंगलीने दाखवून दिले. परकीय मुस्लिम दहशतवाद्यांचा हवाला देऊन भारतीय मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी अनेक फंडे राबविण्यात आले आहे. त्यातून सुशिक्षीत मुस्लिम तरुणांना जीवे मारण्यात आले किंवा तुरुंगात जेरबंद करण्यात आले. गोमांस बंदीचा कायदा मुसलमानांच्या जीवावर उठला. तीन तलाक वा अनुच्छेद ३७० हटविणे हाच जणू भारतीयांच्या उन्नतीचा महामार्ग असून मंदिर निर्माण हे प्रगतीचे महाद्वार आहे हे ठसविण्यात येत आहे. एका भयग्रस्त वातावरणात मुसलमान जगतो आहे. आणि स्वतःच्या मदहोशीत जगणारा सुद्धा एक वर्ग आहे जो जगाकडे दुर्लक्ष करून आपल्याच कोषात बंदिस्त झाला आहे. दुष्यंत कुमारच्या शब्दात सांगायचे तर;
इस शहर में वो कोई बारात हो या वारदात
अब किसी भी बात पर खुलती नहीं हैं खिड़कियां।
लोकं इतके कसे निगरगट्ट झाले असावेत ? ही अवस्था लोकशाहीसाठी घातक आहे. शेजारचा अखलाक झुंडशाहीचा शिकार होतो त्यांच्याचकडून ज्यांच्या सहवासात तो जगला. म्हणून मन्सूर एजाज जोश लिहितो,
आधी रात को नींद से उठकर
अपने सोते बच्चे के सर पर
हाथ फेर कर सोचा मैने
घर में सबकुछ ठीक है मेरे
खिड़की-दरवाजों से लेकिन
रोज हवा टकराती है
अकसर मुझे डराती है !
आपल्याच बांधवांमध्ये ही भीती कुणी व का निर्माण केली ? या दहशतीच्या वातावरणात व्यवस्थेकडे डोळे रोखून पाहणाऱ्या कवितांचा जन्म होणे स्वाभाविक होते. शत्रूंवर चाल करून येणाऱ्या साऱ्या सशस्त्र दलांचा लवाजमा क्षितीजावर वादळ उठवताना दिसतोय. त्यांचा आवाज ऐकू येतोय........आवाज़े जरस येत आहे, येईल.
आवाज़े जरस हा मुक्तछंदातील कवितांचा संग्रह आहे कवी मन्सूर एजाज़ जोश यांचा. मुंबई व गुजरात दंगल आणि एकूणच मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध हा कवितासंग्रह आपला आवाज बुलंद करतो. जोश यांचे नुकतेच निधन झाले. अत्यंत हळवा व संवेदनशील मनाचा हा कवी फॅसिस्टांविरूद्ध आक्रमक होतो. अलिकडच्या काळात इतक्या ताकदीने लिहिणारे कवी फार कमी आहेत. जोश त्यातील एक. मन्सूर एजाज़ हे त्यांचे मूळ नाव असून नंतर जोश हे नाव जोडले. अत्यंत प्रेमळ स्वभावाचे कवी जोश हे उर्दू शिक्षक होते. वणी मध्ये त्यांचा बराचसा काळ गेला. पुरोगामी विचारांचे जोश साम्यवादाने प्रभावित होते. त्यांच्या कविता अत्यंत प्रखर व आक्रमक असण्याचे कारण साम्यवादी विद्रोहाचा तो परिणाम असावा. देशातील धर्मांध शक्तीवर त्यांचा प्रचंड राग होता हे त्यांच्या कवितेतून दिसून पडतो. मन्सूर एजाज जोश केवळ कविताच करीत नव्हते ते आंदोलकही होते. फुले - आंबेडकरी चळवळीशी त्यांची नाळ जुळलेली होती. यवतमाळच्या प्रत्येक पुरोगामी, परिवर्तनवादी व आंबेडकरी आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. सीएए व एनआरसी विरोध, ओबीसींची पदभरती, अनुसूचित जाती व बौद्धांवरील अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ते सडकेवर उतरायचे. जोपर्यत मुस्लिम समाज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आत्मसात करणार नाही तोपर्यंत त्यांचा अभ्युदय होणार नाही, हे वाक्य ते नेहमीच माझ्याशी बोलताना उच्चारायचे. बहुजन समाजातील अनेक चळवळ्यांशी त्यांचे एक आंदोलक म्हणून घट्ट नाते होते. यवतमाळच्या सर्वच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.कवी म्हणून त्यांची राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होती. पाकिस्तान , दुबई सारख्या ठिकाणी त्यांच्या कवितांचे चाहते होते. आंतरराष्ट्रीय नियतकालिक शायर मध्ये त्यांच्या कविता नेहमी यायच्या. ते इतरांच्याही कविता उर्दू मध्ये अनुवादित करून प्रकाशित करायचे. माझी कविता सुद्धा त्यांनी शायर मध्ये छापून आणली. देशभर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा गोतावळा आहे. त्यांचे काव्यसंग्रह नागपूर व जळगाव विद्यापीठात अभ्यासक्रमाला आहेत. तर उर्दू मध्ये दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते महाराष्ट्र राज्याच्या उर्दू साहित्य अकादमी चे सदस्य होते. एकूणच भारतीय दमनव्यवस्थेचे चित्र त्यांनी त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात रेखाटले आहे. ' आवाज़े जरस ' हा त्यांचा पहिला हिंदी उर्दू काव्यसंग्रह. याच काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद प्रख्यात कवी लोकनाथ यशवंत यांनी " ज़ेरबंद" च्या रुपाने प्रसिद्ध केला. जोश यांच्या कवितांवर भाष्य करताना प्रसिद्ध उर्दू शायर निदा फाज़ली म्हणतात, " सोप्या भाषेत घायाळ करणारे तीक्ष्ण शब्दास्त्र हे आपल्या कवितांचं सौंदर्य आहे." जोश यांच्या कवितांवर बोलताना असे म्हणता येईल की, ही कविता विकृतीला जेरबंद करून सुंदरतेचं सृजन करणारी कलाकृती आहे. ते केवळ धर्मांध आणि मनुवादी वृत्तीवरच कोरडे ओढत नाहीत तर या व्यवस्थेत लपून वार करणाऱ्या राजकीय धेंडांवरही हल्लाबोल करतात. वर्तमान परिस्थितीत त्यांचे कवन पुरेपूर लागू पडते.
भारतीयत्व आपल्या काळजात जपणारा हा कवी आपल्या नजरेसमोर निरपराध मुसलमान मारले जात असताना अशांत होतो. उपरोधाचे शस्त्र उगारून जोश म्हणतात,
मै इन्सान
भारत का मुसलमान
अन्य किसी भी मौत से
मुझे इनकार है
हिंदुस्तानी पुलिस की गोली सें मरना
मेरा जन्मसिद्ध अधिकार है !
पोलीस आणि तमाम त्या यंत्रणा ज्या लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्माण झाल्या त्यांचा गैरवापर मुस्लिम समाजाविरुद्ध केला जातो याची चीड जोश यांच्या कवितेतून ध्वनित होते. एकीकडे हिंदू व मुसलमान यांचा डीएनए एक आहे म्हणायचं आणि दुसरीकडे मुस्लिमांचे जगणे मुश्किल करायचे ही मनुवादी नीती जोश यांच्या कवितांना अपरिचित नाही. भारतात मुस्लिमांनी उभ्या केलेल्या ऐतिहासिक इमारती, इथंच जन्म घेऊन इथल्याच मातीत दफन झालेले मुस्लिम राज्यकर्ते व त्यांचे वंशज हे तुझ्याच रक्ताचे नाही का ? असा सवाल उपस्थित करून लाल,हिरवे झेंडे घेऊन आंदोलन करणारे तुझेच पूत्र असूनही त्यांचा द्वेष का ? सर्व धर्मीय लोक जर तुझीच लेकरे असतील तर हा या भूमीवर त्यांच्या रक्ताचे सिंचन कसे ? अनेक मुस्लिम सैनिक देशासाठी लढत असताना त्यांच्यावर वार का ? सर्व भारतीय बांधव असतील तर आम्हीच का आमचे रक्त पिऊन का जगत आहोत ? आम्ही तुझे नसू तर संपवून टाक सर्वांना असा टोकाचा संताप व्यक्त करून, आज स्वतःच्याच आगीत जळणारा हा देश कुणाचा असा जळजळीत प्रश्न मन्सूर एजाज़ जोश भारतमातेला करतात. ही देशभक्ती नव्हे तर दुसरे काय आहे ?
लहू
जमीन पर लहू के ये छींटे
तेरे ही बेटों का खून हैं मां
ये लाल झंडे ,ये सब्ज परचम
तेरे ही आंचल के रंग है मां
हरे भरे ये शजर, ये परबत
ये लाल किला , ये जामा मस्जिद
जो ताज जमना के तट खडा है
वो सब सलातीन , उनकी नसलें
तुझी सें जनमे ,तुझी में खोये
ये तेरे बेटे नही तो क्या है ?
अगर नहीं ...तो उगल दे उनको
जो नक्श हैं सब कुचल दे उनको
नहीं तो फिर ये जवान बुढ़े
ये हिंदू- मुस्लिम, ये सिख - इसाई
ये सारी धरती, ये सब सिपाही
तेरे नहीं तो लहू हैं किसका
यह आग खूं से वुजु हैं किसका
भरी है नफरत सुबु हैं किसका
उज़ड़ रहा है चमन ये किसका
जो जल रहा है वतन हैं किसका
ये कैसा जीना है......जी रहें है
लहू हम अपना ही पी रहें है !
( सब्ज - हिरवा/ परचम- ध्वज/ शजर- वटवृक्ष/ सलातीन- सुलतान,राजा/ नसले-वंशज/ नक्श- चित्र/ वुजु- नमाजापुर्वी हातपाय धुणे /सुबु - प्रमाण ,पुरावा )
जयभीम भाऊ
उत्तर द्याहटवाजयभीम
उत्तर द्याहटवा